मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित खटल्याची सुनावणी येत्या दोन – तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे याने जामिनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाच्या विचारणेनंतर सीबीआयच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता एसीबीच्या जाळ्यात; साडेआठ लाख रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप

दाभोलकर हत्येशी संबंधित खटला सध्या पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीपुराव्यांच्या प्रती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ४ मे २०२२ रोजी आरोपीच्या वकिलांना दिले होते, असे सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचवेळी आतापर्यंत १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली.

त्यावर आतापर्यंत किती साक्षीदार फितूर झाले ? असा प्रश्न न्यायालयाने केला असता पाटील यांनी नकारार्थी उत्तर दिले. तसेच आता केवळ ७ ते ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवणे शिल्लक असल्याचे सांगितले. खटला पूर्ण होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल ? अशी विचारणा न्यायालयाने केली असता प्रकरणातील विशेष सरकारी वकिलांशी बोललो असून खटला जलदगतीने चालवण्यात आला, तर खटल्याची सुनावणी दोन – तीन महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा पाटील यांनी केला.

हेही वाचा >>> मुंबईत भर रस्त्यात मुलीच्या ओठांना लावली शंभराची नोट; रोडरोमियोला मिळाली एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सीबीआयच्या या वक्तव्यानंतर याचिकाकर्ता आणखी दोन-तीन महिने वाट पाहण्यास तयार आहे का ? अशी विचारणा न्यायालयाने तावडेच्या वकिलांकडे केली. त्याला तावडे याचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी नकार दिला. तसेच तावडे हा गेल्या सात वर्षांपासून कारागृहात असून त्याच्या जामीन अर्जावर गुणवत्तेच्या आधारे निकाल देण्याची विनंती केली. सीक्षादारांचे जबाब सादर करण्याचे सांगताना त्याचा तावडे याला फायदा होऊ शकले. मात्र त्यानिमित्ताने येथेच खटला चालवण्यासारखे होईल, असेही इचलकरंजीकर यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच तावडे याच्या जामीन अर्जावर गुणवत्तेच्या आधारे सुनावणी व्हावी, असे म्हटले.