पुणे : गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी कोंढवा भागात घडली. खजुरा सुरेश सुनार (१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खजुरा आणि तिचा पती सुरेश हे मूळचे नेपाळचे आहेत. सुरेश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सुनार दाम्पत्याने कोंढवा भागात भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. खजुरा सात महिन्यंची गर्भवती होती.
सुरेश बुधवारी (२ जुलै) सकाळी कामावर गेला. त्या वेळी ती एकटीच घरात होती. पती कामावर गेल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी तिचा पती कामावरून घरी आला. त्याने दरवाजा वाजवला. तेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून पतीने प्रवेश केला. तेव्हा पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
खजुराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला. पोलिसांनी घराची पाहणी केली, तेव्हा आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. ‘मी जीवनाला कंटाळले आहे. माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही,’ असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे.