Vande Bharat express Trains: पुण्यातून चार नव्या वंदे भारत ट्रेन सुरू होणार,अशी बातमी दोन दिवसांपूर्वी अनेक माध्यमांत झळकली होती. मात्र सदर बातमी चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पुणे रेल्वे विभाग आणि भारतीय रेल्वेने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे पुण्यातून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचा दावा रेल्वेने खोडून काढला आहे. ही बातमी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्या प्रतिक्रियेशिवायच चालवली गेली, असेही रेल्वेने सांगितले आहे. या बातमीमुळे प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचेही रेल्वेने म्हटले आहे.
पुण्याहून सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी अशा दोन मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात. आता आणखी चार नव्या ट्रेन सुरू होणार आहेत, अशी चुकीची माहिती माध्यमांतून प्रसारित झाली होती.
पुणे ते शेगांव, पुणे-वडोदरा, पुणे-सिंकदराबाद, पुणे-बेळगाव अशा चार मार्गांवर नव्या वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यात तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे.