After Trump’s Tariff Bomb India–China Closer: भारत आणि चीन असा एकत्र उल्लेख म्हणजे शेजारील शत्रू, सीमेवरचा तणाव असेच विचार आधी डोक्यात येतात. परंतु, त्यापलीकडेही या दोन देशांमधील सांस्कृतिक संबंध या देशांच्या इतिहासाइतकेच प्राचीन आहेत. या दोन्ही देशांची नाळ समुद्रमार्गाने जोडली गेलेली आहे. याच समुद्रमार्गे रेशीम आणि मसाल्यांची व्यापाराच्या माध्यमातून देवाणघेवाण होत होती. ही देवाणघेवाण केवळ व्यापारापुरतीच मर्यादित नव्हती, तर या मार्गावरून सांस्कृतिकही ऋणानुबंधही जोडले गेले. त्याचा परिणाम संपूर्ण आग्नेय आशियावर झाला. खरं पाहता हाच सुवर्णमार्ग होता, याच मार्गाने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. सध्या भारतीय राजकारणाच्या पटलावर चोल वंशाचे नाव भरपूर चर्चेत आहे. अलीकडेच तामिळनाडूत राजेंद्र चोल पहिला यांच्या जयंती सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते. याच चोलांच्या काळात चीन आणि भारताचे संबंध अधिक दृढ झाले होते, असं इतिहास सांगतो.

इतिहास बदलणारी चिनी नाणी

राजेंद्र चोल पहिला याच्या कारकिर्दीनंतर तब्बल १००० वर्षांनी तंजावर आणि तळ्लिकोट्टई येथे काही चिनी नाणी सापडली. विशेष म्हणजे ही चिनी नाणी राजेंद्र चोल पहिला याच्या कालखंडातील होती. म्हणजेच भारताच्या भूमीवर काही हजारो वर्षं प्राचीन चीनची नाणी वापरात होती. त्यामुळे देशा-विदेशातल्या संशोधकांना धक्काच बसला. तोपर्यंत चोल राजवंशाने केवळ दक्षिण भारतावरच राज्य केलं, असा समज होता. या शोधाने हाच गैरसमज खोडून काढण्यास मदत झाली.

भरभराटीच्या व्यापाराचे पुरावे

या नाण्यांनी तमिळ किनाऱ्यावरून चीनशी झालेल्या प्राचीन व्यापाराची अनेक कवाड उघडली. चोलांचा व्यापार फक्त बंगालच्या उपसागरापर्यंत मर्यादित नव्हता, तर त्यांनी समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापाराचं एक मोठं जाळं उभं केलं होतं. १९ व्या शतकात ‘सिल्क रोड’ हा शब्द वापरात आला, पण त्याआधीच हिंद महासागरातील समुद्रीमार्गांनी दक्षिण भारताला चीन आणि आग्नेय आशियाशी जोडून ठेवलं होतं. या नाण्यांच्या शोधामुळे दोन प्राचीन संस्कृतींमधील कधीकाळी भरभराटीस आलेल्या व्यापाराचे प्रत्यक्ष पुरावे हाती लागले.

गोल्डन रोड विरुद्ध रेशीम मार्ग

विल्यम डॅलरिंपल यांनी The Golden Road या आपल्या पुस्तकात हिंद महासागरातील व्यापारी मार्गांना गोल्डन रोड असं संबोधलं आहे. हेच मार्ग इ.स.पू. २५० पासून ते इ.स. १३ व्या शतकापर्यंत आग्नेय आशियातील देवाणघेवाणीचे मुख्य माध्यम होते. परंतु, चिनी इतिहासकारांनी चीन-केंद्रित सिल्क रोडचं म्हणजेच रेशीम मार्गाचं मिथकीकरण केलं. त्यामुळे इतिहासात केवळ चीनशी संबंधित रेशीम मार्गाचेच महत्त्व अधोरेखित झाले.

प्रत्यक्ष पुरावे काय सांगतात?

असं असलं तरी प्राचीन मंदिरं, नाणी, शिलालेख हे प्रत्यक्ष पुरावे दर्शवतात की, सागरी मार्गाने होणाऱ्या भारतीय व्यापाराचे युरेशियन व्यापारावर वर्चस्व होते. शिवाय चोल वंशाशी संबंधित अनेक स्थळांवर झालेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरीफ वाढीनंतर भारत आणि चीन या दोन संस्कृती पुन्हा एकमेकांच्या जवळ आल्या. परंतु, हे आजच घडतंय असंही नाही. हा संबंध शतकानुशतकं टिकून आहे. सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात चिनी प्रवाशांच्या आगमनापासून ते चोल-साँग देवाणघेवाणीपर्यंत झालेल्या घटनांना इतिहास साक्षीदार आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या या नात्याकडे मागे वळून पाहिलं, तर आजच्या काळातील परिस्थिती समजून घेण्यासाठी वेगळा दृष्टिकोन मिळतो.

पूर्वेकडे वाढत जाणारा व्यापार

रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर पाश्चिमात्य व्यापारमार्ग कमकुवत झाला. भारतातील दक्षिणेकडील राज्यांनी प्रथम पल्लवांनी आणि नंतर चोलांनी आपलं लक्ष पूर्वेकडे केंद्रित केलं. त्या कालखंडात मध्यपूर्वेत इस्लामी सत्ता वाढत होती आणि जुने संबंध कमी होत होते, त्यामुळे व्यापार आणि वाणिज्याचा विस्तार बंगालच्या उपसागरातून आग्नेय आशियाकडे होत होता. राजेंद्र चोल पहिल्याने धाडस करून आग्नेय आशियातील अनेक प्रदेश जिंकले. त्याच्याकडे मोठं आरमार होतं, त्यामुळे त्याच्या पूर्वेकडील मोहिमेला मोठी मदत झाली. मसाले, मौल्यवान दगड आणि इतर वस्तूंचा व्यापार वाढत गेला, या वस्तूंना पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात मागणी होती.

आज विद्वान आणि इतिहासकार केवळ एका मार्गाबद्दल नव्हे, तर संपूर्ण व्यापारी मार्गांच्या जाळ्याबद्दल चर्चा करतात. यात हंगामी वारे, व्यापारी आरमारं, मंदिरे, व्यापारी संघटना आणि राजकीय मोहिमा यांचा समावेश असतो. विल्यम डॅलरिंपल यांनी या धोरणात्मक बदलाचं वर्णन केलं आहे. “जेव्हा पश्चिमेकडील गोल्डन रोड बंद होऊ लागला, तेव्हा पूर्वेकडचा मार्ग अधिक महत्त्वाचा झाला, कारण भारतीय व्यापाऱ्यांच्या प्रचंड आरमारांनी पूर्वेकडे कूच केली.” भारताचा पूर्वेकडे होणारा हा प्रवास युरोपियन साम्राज्य उभे राहण्याच्या अनेक वर्षे आधी घडला होता.

पल्लव आणि चोल

दक्षिण भारताच्या इतिहासातील समुद्री व्यापाराच्या पहिल्या विस्ताराला पल्लवांच्या काळात (सुमारे इ.स. ६ वे–९ वे शतक) सुरुवात झाली. कांचीपुरम आणि मामल्लपुरम (महाबलीपूरम) ही पल्लवांची राजधानीची ठिकाणं होती. दहाव्या-अकराव्या शतकात चोलांनी मोठ्या प्रमाणावर समुद्रावर आपले अधिपत्य प्रस्थापित केलं. व्यापारी संघटना, सुसज्ज जहाजबांधणी केंद्रं आणि संघटित आरमार यांच्या मदतीने नागपट्टणम आणि कावेरीपट्टणम यांसारखी बंदरं श्रीलंका, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प आणि इंडोनेशियन द्वीपसमूहाशी जोडलेली महत्त्वाची केंद्रं ठरली.

संस्कृत साहित्य

त्या काळात बहरास आलेले संस्कृत साहित्य आंतरराष्ट्रीय संस्कृतीचं प्रतिबिंब दर्शवत होते. उदाहरणार्थ, पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा (इ.स. ६८०–७२०) यांच्या दरबारातील कवी दीन यांनी कांचीपुरमसारख्या गजबजलेल्या शहरातील दरबारी व नागरी जीवनाचं चित्रण केलं आहे. कोरोमंडल किनाऱ्यावरची पल्लव बंदरं आग्नेय आशियाशी व्यापार करत होती. त्यामुळेच हिंदू-बौद्ध कला व संकल्पना परदेशात पोहोचल्या.

राजेंद्र चोलाची आरमारी मोहीम

राजेंद्र चोल पहिला (इ.स. १०१४–१०४४) याने बंगालच्या उपसागरात आणि त्यापलीकडेही प्रचंड आरमार पाठवलं. त्यांचं आरमार सुमात्रा आणि मलाया द्वीपकल्पापर्यंत पोहोचलं होतं. इ.स. १०२५ मध्ये राजेंद्र चोलांच्या मोहिमेने श्रीविजय साम्राज्यावर (आजचं इंडोनेशिया/ मलेशिया) आक्रमण करून त्यांचा व्यापार एकाधिकार मोडीत काढला आणि सुदूरपूर्वेस व्यापारासाठी नवीन मार्ग खुले केले.

संकल्पना आणि संस्कृतीचाही प्रसार

दक्षिण भारताच्या किनाऱ्यावरून होणाऱ्या या समुद्री प्रवासातून केवळ वस्तूच नव्हे, तर संकल्पना आणि संस्कृतीचाही प्रसार होत होता. कावेरीपट्टणम आणि नागपट्टणमसारखी तमिळ बंदरं स्पाइस रूटवर अत्यंत महत्त्वाची ठरली. भारतातील बौद्ध भिक्षू पूर्वेकडे गेले आणि तिथूनही येथे आले. यावरून बौद्धिक देवाणघेवाणीचं समृद्ध जाळं दिसून येतं. बोधिधर्म नावाचे दक्षिण भारतीय भिक्षू इ.स. ६ व्या शतकात दक्षिण भारतातील बंदरातून निघून ग्वांगझू (चीन) येथे गेले आणि तेथे त्यांनी चान (झेन) बौद्धधर्माची पायाभरणी केली.

साँग चीन आणि तामिळनाडू : नाण्यांचा शोध

चोलांच्या काळात साँग चीनशी (९६०–१२७९ इ.स) थेट व्यापार सुरू झाला. चिनी नोंदी आणि तमिळ शिलालेखांमध्ये चोल दूतांनी चीनला दिलेल्या भेटींचा उल्लेख आहे. (राजेंद्र चोल पहिला यांनी १०१६, १०३३ आणि १०७७ मध्ये या मोहीम आखल्या होत्या). पुरातत्त्व अभ्यासकांनी या व्यापाराचे ठोस पुरावे उघड केले आहे. दक्षिण भारतात हजारो चिनी नाणी सापडली. केवळ तामिळनाडूतच तांग आणि साँग राजवंशांशी संबंधित नाण्यांचे साठे मिळाले आहेत.

उदाहरणार्थ:

  • तंजावर जिल्ह्यातील पट्टुकोट्टई येथे १०७३ ते १२३७ इ.स. दरम्यानची २० चिनी तांब्याची नाणी सापडली.
  • त्याच जिल्ह्यातील मन्नारगुडी तालुक्यातील तळ्लिकोट्टई येथे ७१३ ते १२६५ इ.स. दरम्यानची तब्बल १,८२२ नाणी सापडली.

ही नाणी १० ते १४ व्या शतकादरम्यानची असावीत, असे अभ्यासक मानतात. तर, काही अभ्यासक ही नाणी त्यापूर्वीची असावीत, असाही दावा करतात. के. ए. नीलकंठ शास्त्री लिखित A History of South India या पुस्तकात म्हटले आहे की, राजेंद्र चोल पहिला (१०१६–१०३३) आणि नंतर कुलोतुंग चोल पहिला (१०७७) यांच्या काळात चीनच्या दरबारात व्यापारी व राजकीय अशी दोन्ही दूत मंडळं पाठवण्यात आली होती.” सापडलेली चिनी नाणी (बहुतेक गोल आकाराची व चौकोनी छिद्र असलेली) दर्शवतात की, तमिळ बंदरांत चिनी चलन शतकानुशतकं वापरलं जात होतं. भारतीय नाणक विशारद एन. सुंदरराजन यांनी नमूद केलं आहे की, चिनी वार्षिक नोंदींमध्ये राजराजा चोल पहिला यांचं नाव ११ व्या शतकातील अभिलेखांमध्ये चिनी लिप्यंतरित स्वरूपात सापडतं.

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ‘इंडोस्फिअर’

  • व्यापारामुळे भारतीय संस्कृती आग्नेय आशियापर्यंत पोहोचली आणि एक ‘इंडोस्फिअर’ तयार झाला. जावा बेटांच्या जंगलांतून किंवा कंबोडियाच्या दगडी बोळांमधून चालताना संस्कृतचा प्रभाव दिसतो. संस्कृत व पाली भाषेतील शिलालेख आणि साहित्यात इंडोनेशियातील वैदिक विधींच्या नोंदी आढळतात, तर कंबोडियातील ख्मेर शिलालेखांमध्येही याचा ठसा दिसून येतो
  • या सागरी मार्गाने केवळ बुद्धधर्मच नव्हे तर राजवाड्यात आणि शेतकर्‍यांच्या झोपडीतही लोकप्रिय अशा भारतीय कथा पूर्वेकडे पोहोचल्या. थायलंडमधील राजे आजही ‘राम’ किंवा ‘इंद्रादित्य’ सारख्या पदव्या घेतात आणि बँकॉकमधील राज्याभिषेकात अयोध्येची छाप जाणवते. हुडहुड आणि दरंगेन सारख्या महाकाव्यांत महाभारताची छटा आहे.
  • बोरबोदूरमधील बुद्ध सारनाथमधील बुद्धासारखे दिसत नाहीत; तसंच, रामायणातील राम हा तुलसीदासांच्या रामासारखा नाही. प्रत्येक प्रदेशाने जे आलं ते आपल्या पद्धतीनं आत्मसात केलं. तमिळ खलाशी आणि पुजारी यांनी भारतातील शहरी जीवनाचे घटक पूर्वेकडील शहरी केंद्रांमध्ये रुजवले.
  • समुद्री व्यापाराने तांदळाच्या लागवडीच्या पद्धती, मसाले, कापडं आणि खगोलशास्त्रासारखं तंत्रज्ञान दूरवर नेलं. पण या सर्वांपेक्षा भारतीय संस्कृतीची खोलवर उमटलेली छाप हाच त्या व्यापाराचा खरा वारसा ठरला. हिंद महासागरातील हा ‘गोल्डन रोड’ फक्त वस्तूंची देवाणघेवाण करणारा मार्ग नव्हता, तर संकल्पना आणि विचारांचंही सेतू होता. याच्यामुळेच आग्नेय आशियाला हिंदू-बौद्ध राजकारण, लेखनभाषा आणि आजही त्यांच्या सांस्कृतिक ओळखीच्या केंद्रस्थानी असलेली महाकाव्यं लाभली.