09 August 2020

News Flash

स्मार्ट जाहिरातींचे वर्ष

गेल्या वर्षीपासून मोबाइलसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या काही जाहिरातींनी लक्ष वेधून घेतलं. स्त्रीशक्ती, डिजिटल काँटेंट, कथा अशा अनेक कारणांनी २०१५ हे वर्ष जाहिरातींसाठी महत्त्वाचं ठरलं. अशाच काही जाहिरातींवर एक नजर.

जाहिरात विश्वासाठी २०१५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे होते. गेल्या वर्षीपासून मोबाइलसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे. पूर्वी कुठलीही जाहिरात पाहण्यासाठी टीव्ही हे महत्त्वाचे माध्यम होते. मात्र गेल्या दशकभरापासून जाहिरातींचा आणि पर्यायाने काँटेंट कंझम्शनचा प्रवास टीव्ही ते डेस्कटॉप आणि डेस्कटॉप ते स्मार्टफोन असा झाला आहे. ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर आकर्षति करण्यासाठी स्मार्टफोन हे महत्त्वाचे माध्यम आहे हे लक्षात घेत जाहिरात विश्वाने त्यावर लक्ष केंद्रित करत खास जाहिराती आणि डिजिटल काँटेंट तयार करण्यास सुरुवात केली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार आज भारतीय लोक सरासरी १६९ मिनिट्स त्यांच्या स्मार्टफोनवर डिजिटल काँटेंट पाहात असतात. त्यात सामान्यपणे सकाळी उठल्यापासून फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, मेल्स तपासणं किंवा ई-शॉिपग साइट्स पाहतो. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की, इंटरनेट ब्राउजिंग बंद केल्यावरही कुठली ना कुठली जाहिरात आपल्या स्क्रीनवर झळकत राहते. हे असं का होतं? तर आपण जे शोधकाम करतो त्याचा माग काढत, आपल्या आवडीनिवडीनुसार विशिष्ट उत्पादनांच्या जाहिराती आपल्या मोबाइल स्क्रीनवर आदळतात. या जाहिराती व्हिडीओ, बॅनर किंवा अ‍ॅप नोटिफिकेशन या प्रकारांत मोडतात. २०१५ मध्ये गुगलने मार्शमॅलो या नावाची ऑपरेटिंग सिस्टीम सुरू केली. यामुळे लॉकस्क्रीनवरही कस्टमाइज्ड जाहिरातींचा पर्याय उपलब्ध झाला. ज्यांच्याकडे ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्यांना हा अनुभव आला असेलच. समजा, तुम्ही एखाद्या ऑनलाइन शॉिपग वेबसाइटवर एखादे उत्पादन फक्त पाहिले, मात्र खरेदी नाही केले तरी तुमच्या सर्चमुळे तुमच्या इनबॉक्समध्ये त्या उत्पादनाची जाहिरात दिसू लागेल.

मोबाइल जाहिरातीच्या बळावर गुगलच्या पॅरेंट कंपनी ‘alphabet’ने (५६८ बिलियन डॉलर) ‘apple’  (५३५ बिलियन डॉलर) ला मागे टाकत जगातील सर्वात बलाढय़ कंपनी म्हणून आपले स्थान बळकट केले. स्वस्त स्मार्टफोन्समुळे आज भारतात इंटरनेट पेन्रिटेशन वाढले आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे, यासाठी येत्या वर्षांत मोबाइलवर मोठय़ा प्रमाणात पर्सनलाइज्ड (वैयक्तिकृत) आणि काँटेक्श्युअल (संदर्भयुक्त) जाहिराती पाहायला मिळतील ज्या साध्यासोप्या मजकुरामुळे ग्राहकांना आकर्षति करतील. जाहिरातींना अटकाव करणाऱ्या एॅप्लिकेशन्सवर मात करण्याचे आव्हान २०१६ मध्ये जाहिरातदारांपुढे असणार आहे.

मोबाइल जाहिरातींव्यतिरिक्त स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या जाहिरातीसुद्धा लक्षवेधी ठरल्या. आजच्या आधुनिक स्त्रीला डोळ्यांसमोर ठेवत तिच्या सशक्त, आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्वाचे चित्रण जाहिरातींमधून झाले आहे. गिमिक्स न वापरता फक्त उत्तम कथा सांगत या जाहिरातींनी स्त्रीविषयक पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देत तिच्याविषयीचे आपले मत बदलायला लावले आहे. निमरत कौरने ‘टायटन रागा’च्या जाहिरातीमधून एका उच्चशिक्षित, कॉर्पोरेट विश्वात अधिकारी असणारी व्यक्तिरेखा साकारली आहे. अनेक वर्षांनी तिची तिच्या प्रियकराशी विमानतळावरील प्रतीक्षालयात भेट होते. त्यांच्यातील बोलणं हे अतिशय मार्मिक आहे.

ती – ‘‘कसा आहेस?’’

तो- ‘‘तू जसा सोडलास तसाच. तू अजूनही लग्न नाही केलंस? एकटीच?’’

ती – ‘‘कामाच्या व्यस्ततेमुळे लग्नाचा विचारच नाही केला.’’

तो – ‘‘ou know, आपण पुढे जाऊ शकलो असतो जर तू काम सोडलं असतंस तर?’’

ती – ‘‘काम तर तुलाही सोडता आलं असतं!’’

तो – ‘‘How can a man not work‘ यार!’’

यावर ती सूचक हसते आणि म्हणते, ‘‘तू खरंच बोललास रे. तू आजही तसाच आहेस जसा मी तुला सोडला होता.’’आजच्या स्त्रीला निवडीचं स्वातंत्र्य हवंय. करिअरच्या बाबतीत तिला कोणाचे निर्णय स्वत:वर लादून घ्यायचे नाहीएत. शिवाय कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत, कुढत बसायची गरज नाही, ही गोष्ट जाहिरातीतून समर्पकपणे पोहोचवली.

याच घडय़ाळाच्या दुसऱ्या जाहिरातीत कॅतरिना कैफला घेऊन ‘मुलींच्या लग्ना’वर भाष्य केलं आहे. मित्र-मत्रिणींची लग्नं झाली आहेत, नात्यातील आत्या-मावशा-काकूंनी लग्नाचा धोशा लावलाय, धाकटी बहीण रांगेत आहे, व्हॅलेंटाइन डेला एकटं वाटतं, म्हातारपणात आधार हवाय, (आता तर) प्रियकराचंही लग्न झालंय म्हणून यांसारख्या कारणांमुळे लग्न करू नका. लग्न तेव्हाच करा ज्यावेळेस तुमच्या सोबतीस पात्र असलेला जोडीदार भेटेल. आजची करिअरिस्टिक मुलगी लग्न केव्हा करावे, कोणाशी करावे, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य घेत आहे. लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना इतरांच्या मतांचं दडपण नको. लग्नाचं वय उलटून चाललंय, लोक काय म्हणतील यापेक्षा स्वत:ला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. ‘रिश्ता खुदसे ही’ या टॅगलाइनद्वारे मुलीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, विचारस्वातंत्र्यावर भाष्य करण्यात आलंय.

स्त्रीचे केस तिच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. केस तिचं सौंदर्य वाढवतात पण केसच राहिले नाहीत तर.. तिचं सौंदर्य मुळीच उणावत नाही. ‘ब्रेव्ह अ‍ॅण्ड ब्युटिफूल’ नावाची जाहिरात हीच गोष्ट सांगते. कर्करोगावर मात करताना नोकरदार स्त्रीनं तिचे केस गमावलेत. आपले केस नसणं हे तिनं, तिच्या नवऱ्यानं, मुलीनं स्वीकारलंय, मात्र आपल्याला या रूपात बाहेरचे इतर लोक स्वीकारतील का, याबद्दल ती साशंक आहे. म्हणून ऑफिसला जाताना ती डोक्यावर स्कार्फ बांधून जायला बघते. मात्र आपण आहे तसेच जगाला सामोरे जाऊ, या निर्धाराने ती  स्कार्फ न बांधताच निघते. ऑफिसला गेल्यावर सगळे सहकारी तिचं आपुलकीने स्वागत करतात. या जाहिरातीतून स्त्रीच्या सौंदर्यविषयक संकल्पनेलाच फाटा दिला आहे. सुंदर दिसण्यासाठी केसांची गरज नाही, तिचं आंतरिक सौंदर्यच पुरेसं आहे, हा संदेश या जाहिरातीतून दिला गेलाय. आपल्याकडे दृष्ट लागू नये म्हणून तीट लावला जातो. त्याचप्रमाणे आपल्या बायकोला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तिला काळी टिकली लावणारा नवरा त्याच्या पुरोगामित्वाचे, समंजसपणाचे दर्शन घडवतो. ही जाहिरात ‘डाबर वाटिका’ या केशतेलाची. कर्करोगावर मात करणाऱ्या धाडसी स्त्रीची कथा सांगत ‘तू फौलाद है!’, हा विश्वास त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून व्यक्त केला.

घरातील कर्तासवरता पुरुष काही कारणाने बेरोजगार झाला आणि त्याच्या बायकोने जर समर्थपणे घराचा डोलारा सांभाळला तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि (पुरुषांना) लाजही! पी.सी. ज्वेलर्सने त्यांच्या एका जाहिरातीतून ‘woman of the house’, ही संकल्पना ठळकपणे समोर आणली. एका पार्टीत त्या नोकरदार स्त्रीच्या कानातील महागडे जोड पाहात इन्व्हेस्टमेंट बँकर असलेल्या नवऱ्याला एवढी महाग भेटवस्तू द्यायला काय कठीण!, असा शेरा एक परिचित मारतात. त्यावर तो नवराच म्हणतो, ‘‘अरे, तिचंच तिने घेतलंय ते महाग गिफ्ट. मी कुठून देणार? गेले सहा महिने मी घरी बसून पुस्तक लिहितोय आणि ती घर चालवतेय.’’ त्याच्या या बोलण्यात फार सहजता आहे. कुठेही फुकटचा पुरुषी अहंकार नाही. बायकोच्या निर्णयाला पािठबा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तीच चालवतेय घर’ या वाक्यातून तिच्याविषयीचा विश्वास आणि अभिमान झळकतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी नवऱ्यानेच महागडय़ा भेटवस्तू द्याव्यात, असाही कुठे सूर नाही. आíथकदृष्टय़ा स्वावलंबी असलेली स्त्री स्वत:च्या आवडीनुसार, हवी तशी भेटवस्तू स्वत:साठी घेऊच शकते, हेसुद्धा त्यात ठळकपणे जाणवते.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘निरमा’च्या रुग्णवाहिकेच्या जाहिरातीतूनही स्त्रीशक्तीचे चित्रण दिसले. चिखलात रुतलेल्या रुग्णवाहिकेला मार्गी लावण्याचं सोडून ‘आता कोण बाहेर काढेल’, या थाटात पाहात बसलेल्या निष्क्रिय लोकांकडे दुर्लक्ष करत ‘चारचौघी’ पुढे येतात आणि फसलेली रुग्णवाहिका एकजुटीने बाहेर काढतात आणि कोणालाच काहीही न बोलता फक्त एक कटाक्ष टाकत निघून जातात. समोर दिसणाऱ्या समस्येवर तोडगा काढायला कोणाची वाट बघायची गरज नाही, आपणच एकत्र येऊन वाट काढू शकतो, असा संदेश देत या जाहिरातीने स्त्रीच्या आंतरिक बळाचे महत्त्व अधोरेखित केले.

एकूण काय तर आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना त्याला सामाजिक बदलाची जोड देत स्त्री सक्षमीकरणाच्या मुद्दय़ाला अधोरेखित करत जाहिरातकारांनी अविस्मरणीय जाहिराती दिल्या.

२०१५ मधला नवा चेहरा

२०१५ साली जाहिरात विश्वात एका नव्या चेहऱ्याची भर पडली आणि अल्पावधीत तो चेहरा एका मोठय़ा टेलिकॉम ब्रॅण्डची ओळख बनला. हा चेहरा म्हणजेच ‘एअरटेल गर्ल’ साशा छेत्री. एअरटेलच्या फोर-जी सेवेच्या जाहिरात मोहिमेमुळे साशा गेल्या वर्षी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, इतकी की भर गर्दीतही आता ती सहज ओळखू येईल. कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा दीर्घकाळ ती जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपुढे झळकली आहे. एका आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ती तब्बल ५४,४०६ वेळेस झळकली. तिचा चेहरा, तिची केशरचना, आवाज, संवादशैली यामुळे तीच नाही तर फोर-जी सेवेच्या जाहिरात मोहिमेलासुद्धा प्रचंड यश मिळालं. साशा मूळची देहरादूनची. मुंबईतील सेंट झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्समधून तिने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ट्रेनी कॉपी रायटर म्हणून ती काम करत होती. माध्यमक्षेत्रातील शिक्षणाची पाश्र्वभूमी असूनही तिला संगीताची आवड आहे. सध्या ती एका अल्बमवर काम करत आहे. जाहिरातीतील नेहमीच्याच निवडप्रक्रियांचे टप्पे पार करत साशाची निवड झाली.
वरद लघाटे
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:13 am

Web Title: 2015 year of smart advertisement
Next Stories
1 स्टार्टअप म्हणजे नेमके काय?
Just Now!
X