जेथे दुहेरी हितसंबंध स्पष्ट आहेत, अशा पदांवर राहण्याचे सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांनी स्वत:हून नाकारायला हवे होते..

भारताचे तीन महान क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय क्रिकेटमधील कथित दुहेरी हितसंबंधांबाबत क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद आणि नीतिमूल्य अधिकारी न्या. डी. के. जैन यांनी या महिन्यात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या घटनेचे स्वागत. खेळ हा तो खेळला जाणाऱ्या समाजापासून वेगळा करून पाहता येत नाही. म्हणजे देशाचे गुणावगुण त्या त्या देशाच्या खेळांत प्रतिबिंबित होत असतात. हे असे असते याची जाण सामान्य पातळीवर असणार नाही कदाचित. कारण तेथे खेळाकडे केवळ मनोरंजन इतक्याच अपेक्षेने पाहिले जाते. अलीकडे या मनोरंजनाच्या जोडीला खेळाडूंवर राष्ट्रवादाचे वा अस्मितांचे ओझे असते ही बाब अलाहिदा. पण तरीही खेळ आणि समाज यांचे नाते दिसते तितके वरवरचे नसते. त्यास अनेक पदर असतात. याचाच दुसरा अर्थ असा की समाजातील जे काही बरेवाईट आहे ते ते त्या समाजातर्फे खेळल्या जाणाऱ्या खेळांतून दिसतेच दिसते. हा विचार एकदा का मान्य केला की बडय़ा खेळाडूंवर नोटिसा बजावण्याच्या क्रिकेट नियामक मंडळाच्या कृतीचे महत्त्व समजून घेता येईल.

या तिघांपैकी सौरवला या महिन्याच्या सुरुवातीला याविषयी विचारणा करण्यात आली होती. तर सचिन आणि लक्ष्मण यांना बुधवारी स्वतंत्र नोटिसा बजावण्यात आल्या. बुधवारी म्हणजे २४ एप्रिल रोजी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा ४६वा वाढदिवस साजरा होत असताना त्याला अशा प्रकारची नोटीस पाठवली जाणे कदाचित त्याच्या चाहत्यांना शिष्टसंमत वाटणार नाही. मात्र कायद्यासमोर आणि नियमांसमोर सर्व जण समान आहेत हे धरून चालणारे न्या. जैन यांच्यासारखे काही जण तरी या देशात कार्यरत आहेत याबद्दल सचिनच्या वेडय़ा चाहत्यांनी नाही तरी निदान विवेकी नागरिकांनी समाधान मानायला हवे.

सचिन, सौरव आणि लक्ष्मण हे तिघेही बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आहेत. याच समितीने रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. या सदस्यत्वाला कालमर्यादा नाही. याचा अर्थ आजघडीलाही हे तिघे सल्लागार समितीचे सदस्य आहेतच. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील फ्रँचायझी संघांशीही ते संबंधित आहेत. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा महानायक किंवा आयकॉन आहे. लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक किंवा मेंटॉर आहे. सौरववर तर तिहेरी हितसंबंधांचा ठपका आहे. तो बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर आहे, बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार म्हणूनही कार्यरत आहे. यांतील सौरवचे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद वगळता इतर कोणतेही पद धनलाभाचे नाही, असा बचाव नेहमी केला जातो. मात्र बीसीसीआयच्याच नियमावलीत याविषयी स्पष्ट उल्लेख आहे आणि त्यानुसार काही संकेत पाळले जाणे आवश्यक आहे. या नियमावलीत १६ पदे देण्यात आली असून त्यांपैकी कोणत्याही किमान दोन पदांवर एखादी व्यक्ती एकाच वेळी कार्यरत असल्यास तो दुहेरी हितसंबंध मानला जातो. आयपीएलचे भारतीय क्रिकेटजगतात आगमन झाल्यापासून त्याचे फायदे किती आणि तोटे किती याविषयी चर्चा अनंत काळ होत राहील. पण नियमभंगाचे आणि नियम वाकवण्याचे आणि तरीही वलयात राहण्याचे एक नवे दालन खुले झाले आहे हे नि:संशय सत्य आहे.

दुहेरी, तिहेरी हितसंबंधांचा आयपीएलला झगमगता इतिहास आहे. ललित मोदींबरोबर या लीगच्या केंद्रस्थानी असलेले राजीव शुक्ला विविध पदांवर सक्रिय होते. बीसीसीआयचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत चेन्नई सुपर किंग्ज या फ्रँचायझीचेही सर्वेसर्वा होते. त्यांच्याच कृपाशीर्वादामुळे माजी सलामीवीर के. श्रीकांत चेन्नईचे मार्गदर्शकपद आणि भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद एकाच वेळी भूषवत होते. ही सगळी बजबजपुरी साफ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन न्या. लोढा समिती स्थापली आणि त्यातून बीसीसीआयचा कारभार प्रशासकीय समितीकडे आला. यापैकी दोन प्रशासकांचा (विनोद राय आणि डायना एडलजी) वेळ क्रिकेटचा कारभार हाकण्यापेक्षा परस्परांवर कुरघोडी करण्यातच अधिक जातो. तिसरे निवृत्त लेफ्ट. जनरल रवी थोडगे दोन महिन्यांनंतरही नवखेच. त्यापेक्षा किमान लवाद अधिकारी न्या. जैन यांनी त्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर काम तरी सुरू केले इतकेच समाधान.

सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्या वेळी आणि आजही त्यांच्या क्रिकेटनिष्ठेविषयी शंका घ्यावी अशी परिस्थिती नाही. पण म्हणूनच जेथे दुहेरी हितसंबंध स्पष्ट आहेत, अशा पदांवर राहण्याचे त्यांनी स्वत:हून नाकारायला हवे होते. याबाबतीत त्यांचा तितकाच प्रतिभावान सहकारी राहुल द्रविड याचा आदर्श गिरवणे त्यांना सहज शक्य आहे. संधी असूनही राहुल द्रविडने क्रिकेट सल्लागार समितीवर जाणे टाळले. त्याऐवजी भारतीय युवा संघाचे प्रशिक्षकपद त्याने स्वत:हून मागून घेतले. आज युवा संघ आणि ‘अ’ संघ या दोन्ही संघांचा तो प्रशिक्षक असला, तरी त्याच्यावर दुहेरी हितसंबंधांचा आरोप ठेवता येत नाही. शिवाय आयपीएल किंवा कोणत्याही खेळ व्यापार उद्योगांशी तो संबंधित नाही. पुल्लेला गोपीचंद याचेही उदाहरण या संदर्भात देता येईल. शीतपेयांच्या जाहिराती करण्यास त्याने नकार दिला. मी ज्या गोष्टी आवर्जून टाळतो, त्यांची जाहिरात करणे हे अयोग्य, ही त्याची भूमिका कौतुकास्पद ठरते. याचे कारण खेळाडू म्हणून त्यांची काही प्रतिमा असते. त्या प्रतिमेच्या प्रेमापोटी उद्याचे काही संभाव्य खेळाडू त्यांचे अनुकरण करत असतात. अशा वेळी चुकीचा पायंडा पडण्याचा धोका असतो. राहुल द्रविड काय किंवा गोपीचंद यांनी तो टाळला. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. पण त्यांनी चार पैसे अधिक कमावण्यापेक्षा पुढची पिढी घडवण्यास प्राधान्य दिले.

यातून काय दिसून येते? ज्या समाजात सामाजिक नैतिकता हे मूल्य मुळातच अशक्त असते तेथे नायकत्वाच्या उंचीवर गेलेले अनेक मान्यवर स्वार्थासाठी नियम/संकेतांना सहज झुगारून देऊ शकतात. याची प्रचीती सर्वोच्च सत्ताधीशांपासून ते क्रिकेटसारख्या खेळात सत्ता गाजवणाऱ्या खेळाडूंपर्यंत प्रत्येक पातळीवर येते. सत्ताधीश निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांना कस्पटासमान लेखणार, नोकरशहा निवृत्तीनंतरची बेगमी करण्यासाठी सेवाकाळातच उद्योगांशी संधान बांधणार, उद्योगपती आणि राजकारणी यांचे साटेलोटे गुप्तच कसे राहतील यासाठी संबंधित यंत्रणाच प्रयत्न करणार, या सगळ्याकडे तटस्थपणे पाहून त्यावर भाष्य करण्याची अपेक्षा असलेल्या माध्यमांवर राजकारणी ताबा मिळवणार, माध्यम प्रतिनिधी राजकीय पक्षांकडे बौद्धिक केरवाऱ्यांची कामे करणार, प्रश्नपत्रिका निश्चित करण्याच्या कामातले प्राध्यापक खासगी शिकवण्या घेऊन आपल्या विद्यार्थ्यांचे भले करणार आणि असे बरेच काही होत राहणार. पण ते किती काळ, हा प्रश्न आहे.

याचे उत्तर व्यक्तिपूजेचे महत्त्व कमी होईपर्यंत, असे आहे. एखाद्या खेळाडूस वा एखाद्या व्यक्तीस ज्या समाजात देवत्वाचे स्थान दिले जाते तो समाज या कथित ‘देवां’ना नियमभंगांची मुभाच देत असतो. हे समाजाच्या अप्रौढत्वाचे लक्षण. क्वचित कधी ते दूर होते. तीन क्रिकेटपटूंना पाठवण्यात आलेल्या नोटिसा ही अशी यातील एक घटना. म्हणून ती स्वागतार्ह. खेळाडू असो वा कोणी अन्य. कोणाचेही देवत्वीकरण हे लोकशाही व्यवस्थेचा पराभवच करते. म्हणून  क्रिकेटमधले हे ‘देव’ प्रत्यक्षात किती पाण्यात आहेत हे यानिमित्ताने कळणार असेल तर आनंद आहे.