विदाप्रवाहावर नियंत्रण मिळवले की नागरिकांच्या ‘आनंदनिर्मिती’ची सूत्रे आपोआप हाती पडतात. भारतासंदर्भात प्रसृत झालेली ताजी आकडेवारी या सत्याची अनुभूती देते..

‘एरिक्सन’ या जगद्विख्यात स्वीडिश कंपनीने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस प्रसिद्ध झाले असून त्यात भारत हा विदावापरात जगातील क्रमांक एकचा देश म्हणून उदयास आला आहे..

नागरिकांनी कमीत कमी विचार करून आनंदात राहावे, ही राज्यकर्त्यांची भावना स्थलकालदेशातीत आहे. याचा अर्थ असा की, देश आणि त्यातील सत्ता कोणाही पक्षाची असो, नागरिकांनी आनंदी असावे अशीच राज्यकर्त्यांची इच्छा असते. आनंदात राहावे म्हणजे आहे त्यात आनंद मानावा. उगाच विचार करण्याच्या फंदात पडू नये. रोमन साम्राज्य जेव्हा लयास जात होते तेव्हा तत्कालीन सम्राटाने प्रधानास सर्वत्र जादूचे प्रयोग, मेळे आदी आयोजित करून वातावरण उत्सवी करण्याचे आदेश दिले. हा इतिहास आहे. आणि वर्तमानदेखील. फरक असलाच तर इतकाच की, आजच्या सत्ताधीशांना असे ‘आदेश’ द्यावयाची गरज भासत नाही. नागरिकांच्या झुंडीच त्यांच्यावतीने ही जबाबदारी तत्परतेने पार पाडतात. त्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वास्तवात तसे करण्याचीही गरज नसते. आभासी दुनियेत वातावरणनिर्मिती केली की झाले. सध्याचा काळ हा आभास हेच वास्तव या ऑर्वेलियन सत्याचा असल्याने आभासनिर्मितीवर नियंत्रण तेवढे ठेवले की काम फत्ते. या आभासनिर्मितीचा कणा म्हणजे माहितीवहन आणि विदा (डेटा) व्यवस्थापन. जेवढी जास्त विदा उपलब्धी तितके जास्त माहिती/ मनोरंजन वहन आणि तितकी जास्त ‘आनंदनिर्मिती’, असा हा साधा व्यवहार. याचाच अर्थ असा की, एकदा का विदाप्रवाहावर आधी मालकी आणि नंतर नियंत्रण मिळवले, की नागरिकांच्या आनंदनिर्मितीची सूत्रे आपोआप हाती पडतात. आपल्या देशासंदर्भात प्रसृत झालेली ताजी आकडेवारी या सत्याची अनुभूती देते.

उदाहरणार्थ, भारत हा विदावापरात जगातील क्रमांक एकचा देश म्हणून उदयास आला असून हे प्रमाण विकसित देशांपेक्षाही अर्थातच अधिक आहे. आपल्याकडे दरमहा दरडोई विदावापर हा ९.८ गिगाबाईट्स (जीबी, १ जीबी = १,०००,०००,००० बाईट्स) इतका केला जातो आणि हे प्रमाण २०२४ पर्यंत दरडोई १८ जीबी इतके होईल. ‘एरिक्सन’ या जगद्विख्यात स्वीडिश कंपनीने केलेल्या या पाहणीचे निष्कर्ष गेल्या आठवडय़ाच्या अखेरी प्रकाशित झाले असून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यामुळे उत्साहलहरींच्या लाटा उसळू लागल्याचे अनुभवास येते. ही पाहणी फक्त स्मार्टफोनच्या साह्य़ाने माहिती महाजालात मुशाफिरी करणाऱ्यांची आहे. म्हणजे संगणक आदी माध्यमांतून विदावापर करणाऱ्यांचा विचार यात केलेला नाही. तसा तो केल्यास भारत हा माहिती महाजाल आणि विदावापर क्षेत्रातील निर्विवाद महासत्ता गणला जाईल. या सगळ्याची तुलना १९९८ साली भारताने स्वबळावर अणुचाचण्या केल्याच्या कामगिरीशी आणि त्यानंतरच्या वातावरणाशी होऊ शकेल. त्या वर्षी या अणुचाचण्यांमुळे आपण महासत्तापदी आरूढ झाल्याची द्वाही फिरवली गेली. तद्वत आताही विदावापरात आपण प्रगत देशांनाही कसे मागे टाकले, याचा आनंदोत्सव साजरा होऊ शकेल. आपल्या तुलनेत दक्षिण आशियाई देशांचा विदावापर दरडोई ७.१ जीबी इतका आहे, तर बिचाऱ्या आफ्रिका खंडातील अर्धपोटी नागरिकांना दरमहा फक्त तीन जीबी इतकाच विदावापर उपलब्ध आहे. किती ती गरिबी! आपणास अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे, फेसबुक या अग्रणी समाजमाध्यमाच्या वापरात तर भारताने अमेरिका या एकमेव जागतिक महासत्तेसदेखील मागे टाकले आहे. २०१९ सालच्या, म्हणजे गेल्या वर्षीच्या, ऑक्टोबपर्यंतच्या अन्य पाहणीतील आकडेवारीनुसार भारतात क्रियाशील (अ‍ॅक्टिव्ह) फेसबुक वापरकर्त्यांची संख्या २६ कोटी ९० लाख इतकी आहे. त्या तुलनेत अमेरिकेतील क्रियाशील फेसबुक वाचकांची संख्या आहे फक्त १८ कोटी ३० लाख इतकीच. नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेलेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायदेशातून प्रस्थान ठेवण्यापूर्वी ‘फेसबुकवर माझा नंबर पहिला आणि परममित्र मोदी यांचा दुसरा’ अशी दवंडी पिटली होती. ताजी आकडेवारी पाहता कदाचित आपण या आघाडीवर या महासत्ताप्रमुखाचे दात घशात घालू शकू. त्यामुळे मोदी आपल्या पुढील अमेरिका दौऱ्यात हे सांगून ट्रम्प यांच्या दाव्याची परतफेड करू शकतील. यातील दुसरी अभिनंदनीय बाब म्हणजे, फेसबुकचे दत्तकी अपत्य असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरातही भारताने जगात आघाडी घेतल्याचे अन्य पाहण्यांतून दिसते. जगभरात १०९ देशांत व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते. ते वापरणाऱ्या काही कोटींतील ३४ कोटी क्रियाशील व्हॉट्सअ‍ॅप वापरकत्रे हे एकटय़ा भारतभूचे नागरिक आहेत. उगाच नाही या सुसंस्कृत आणि महान देशात घरोघर व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठे स्थापन होऊन या क्षेत्रात घाऊक महामहोपाध्यायांची पदास होते.

‘एरिक्सन’च्या पाहणीनुसार आगामी चार वर्षांत भारतातील स्मार्टफोनधारकांची संख्या ११० कोटींहून अधिक होईल. ही बाबदेखील निश्चितच अभिनंदनीय. त्यामुळे या माध्यमाद्वारे विदावापरकर्त्यांची वाढ होऊन ती ६१ कोटींवर पोहोचेल. स्मार्टफोन वापरणाऱ्यांतील निम्म्यापेक्षा अधिक हे यावरील विदा सुविधेसाठी येतात. अलीकडच्या काळात मुकेशभाई अंबानी यांच्या औदार्यामुळे ‘जिओ’ वापरकर्त्यांना अत्यल्प दरांत विदासुविधा पुरवण्यात आल्याने आपल्याकडे या माहिती क्रांतीचे चक्र गरागरा फिरावयास लागले. परिणामस्वरूप देशातील आनंदप्रक्रियेस मोठीच गती आली. त्याचमुळे ‘५ जी’ तंत्रज्ञानाच्या स्वागतासाठी अधिकाधिक भारतीय उतावीळ असल्याचे या पाहणीत आढळले, यात आश्चर्य ते काय? या आणि सुधारित माहितीवहन तंत्रज्ञानाच्या आधारे विदासेवा घेणाऱ्यांची संख्या २०२४ पर्यंत १०१ कोटींहून अधिक होईल. यात सर्वात वाढती मागणी असेल ती या माध्यमाद्वारे ध्वनीचित्रफितींचा आनंद लुटण्यास. त्याचमुळे सध्याच्या दरडोई विदावापरात २०२४ पर्यंत दुपटीने वाढ होऊन ती १८ जीबीपर्यंत जाईल.

या सर्वाहून धन्य धन्य वाटावी अशी बाब म्हणजे, आगामी आधुनिक अशा ‘५ जी’ तंत्रज्ञानासाठी अधिक रक्कम खर्च करावयाची भारतीयांची तयारी. वास्तविक आपल्याकडील ‘मोफत हेच पौष्टिक’ या तत्त्वज्ञानामुळे दरडोई मोबाइल महसुलाचा दर (एआरपीयू : अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर) हा अत्यल्प आहे. पण तरीही ‘५ जी’ तंत्रज्ञानासाठी मोबाइल वापरकत्रे सध्याच्या सरासरी खर्चापेक्षा ६६ टक्के अधिक रक्कम मोजावयास तयार आहेत. म्हणजे प्रत्येक स्मार्ट मोबाइल वापरकर्ता त्याच्या/तिच्या आताच्या मासिक मोबाइल बिलापेक्षा सरासरी तब्बल ३२० रुपये अधिक खर्च करण्यास उत्सुक आहे, असे हा अहवाल सांगतो. यातून निश्चितच भारतीयांची नव्या तंत्रज्ञानास आपलेसे करावयाची सकारात्मक मानसिकता दिसून येते. दुसऱ्या एका पाहणीनुसार, भारतात स्वच्छतागृहांच्या बांधणीपेक्षाही अधिक वेग हा मोबाइल फोन्सच्या वापराचा आहे. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, हे आपण कोणत्याही प्रचार वा सरकारी मोहिमेशिवाय करून दाखवले, हे सत्य. म्हणजे ‘स्वच्छ भारत’सारखे अभियान न करताही आपण मोबाइलच्या वापरात स्वच्छतागृहांनाही मागे टाकले. तेव्हा हे क्षेत्रदेखील अंबानी आदींसाठी खुले केल्यास आणि प्रत्येक स्वच्छतागृहात अमर्यादित विदासेवा उपलब्ध करून दिल्यास दोन्ही क्रांत्यांचा आनंद घेता येईल. स्वच्छतागृहांची संख्या वाढेल आणि मोफत विदेमुळे जनता स्वच्छतागृहातील वास्तव्याचा अधिकाधिक आनंद लुटेल.

तेव्हा भारतीयांनी या क्षेत्रातील आपल्या प्रगतीचा भरभरून लाभ घ्यावा. ठप्प अर्थव्यवस्था, मंद रोजगारनिर्मिती वगैरे मुद्दे अत्यंत क्षुद्र आहेत. बेरोजगारांच्या रिकाम्या हातांतील मोबाइलवर मुबलक विदासेवा आहे, ही किती भाग्याची बाब. ती नसती तर रिकाम्या हातांनी काय केले असते, असा सकारात्मक विचार करून सुज्ञांनी अर्थव्यवस्था आदींबाबत जराही खेद बाळगू नये. शेवटी ‘विदा’नंदातच सत्य आणि शिव आहे, हे ध्यानात घ्यावे. त्यातच सत्ताधाऱ्यांचा आनंददेखील आहे.