दावोसमधील परिषद, थॉमस पिकेटी यांचे व्याख्यान, ऑक्सफॅमचा अहवाल हे सर्व आर्थिक विषमतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करणारे आहे..
जगातील सर्वात श्रीमंत फक्त ६२ व्यक्तींची सुबत्ता ही तळच्या ३६० कोटी जनतेच्या एकत्र मिळून होणाऱ्या संपत्तीइतकी आहे. एक टक्का विरुद्ध ९९ टक्क्यांचे गुणोत्तरही कालबाह्य़ ठरत आहे.
अद्याप सारे काही शांत आहे. दैन्य आहे, सुबत्ताही आहे. विवंचना आहेत, ऐषही आहे. सुखासीनता अन् टोकाचा प्रक्षोभही आहे. तरीही सारे काही शांतचित्त, निवांततेत सुरू आहे. स्वित्र्झलडच्या दावोसमधील गारठय़ात सुरू असलेल्या जागतिक आर्थिक महामंथनातील चच्रेचे गोठलेपण जसे आहे. तसेच याच दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅम या जगन्मान्य संस्थेच्या भयाण विषमतादर्शक अहवालाने वातावरणात निर्माण केलेला उष्माही आहे. किंबहुना गतवर्षी गरीब-श्रीमंतांतील दरी कशी कमी करावी या विषयावर दावोसची जत्रा उठून गेली आहे. पुन्हा शिशिरातील निष्काम बाष्कळतेसाठी ही मंडळी एकत्र आली. ऑक्सफॅमने नेमके त्याच वेळी गरिबांची गरिबी आणि श्रीमंतांची श्रीमंती वाढत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला. उद्यमशील प्रतिभा, जोखीम क्षमता, साहस व व्यावसायिक कसब वगरे दावोसच्या मेळ्यासाठी जमलेल्या उद्योगपतींबद्दल पेश होणाऱ्या गुणविशेषांवरच जणू त्याने पाणी फेरले. निरंतर उपकारक ठरलेल्या राजकीय आणि आर्थिक धोरणांच्या मालिकेचे फलित म्हणून आज मूठभर अब्जाधीशांचे हे इमले उभे राहिल्याच्या निष्कर्षांपर्यंत ही पाहणी जाते. दावोसचा हा वार्षिक मेळा उत्तरोत्तर मानवी कल्याणाबाबतचे नवनवे अंतर्वरिोध पुढे आणत असतो. त्याचाच हा पुनप्र्रत्यय!
जगापुढे संपत्ती निर्माणाचा प्रश्न नाही तर तिच्या निर्मितीचा वेग काय असेल हा दावोसचा सध्याचा चिंतनविषय आहे. या विषयाभोवतीच जगभरचे सत्ताधीश, अर्थतज्ज्ञ, उद्योगपती यांचा या वार्षकि महामेळ्यात काथ्याकूट सुरू आहे. त्याउलट सर्वदूर वाढती गरिबी, बकाली हे आजच्या समस्येचे मूळ आहे. गरिबी निर्मूलनावर सर्वसहमती साधली जाऊन, त्या शास्त्राच्या जागतिकीकरणाचा आग्रह धरणारा सूरही मग जोरकसपणे पुढे येत आहे. शुक्रवारीच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेले फ्रेंच अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांचे व्याख्यान हेच दर्शविते. पिकेटी यांची सद्धांतिक धाटणी आíथक इतिहासकाराची आहे. जगातील २० बडय़ा देशांच्या २०० वर्षांच्या इतिहासाची छाननी करून त्यांनी आपल्या विषमतेच्या सिद्धांताची मांडणी केली आहे.
या विषमतेची विदारकता तरी किती? जगातील सर्वात श्रीमंत फक्त ६२ व्यक्तींची सुबत्ता ही तळच्या ३६० कोटी जनतेच्या एकत्र मिळून होणाऱ्या संपत्तीइतकी आहे, असे ऑक्सफॅमचा अहवाल सांगतो. ‘इकॉनॉमी फॉर वन परसेन्ट’ या मथळ्याखाली हा अहवाल चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. एक टक्का विरुद्ध उर्वरित ९९ टक्क्यांचे गुणोत्तरही कालबाह्य़ ठरत आहे. या वरच्या धनदांडग्या एका टक्क्यात बोटावर मोजता येतील इतके गब्बर बनत अधिकाधिक संपत्तीचे साधक बनत चालले आहेत, हे ऑक्सफॅमच्या पाहणीतील आकडेवारीच दर्शविते. भारतातील श्रीमंती व अभावग्रस्ततेला त्रयस्थ दर्शनाचीच परंपरा आहे. कारण व्यक्तिगत उत्पन्नाच्या माहितीबाबत भारतात इतकी अपारदर्शकता आहे की हा गरिबीची दशा झाकण्याचाच प्रयत्न असल्याचे वाटते, अशी पिकेटी यांची टिप्पणी आहे. क्रेडिट सुईस या विदेशी वित्तसंस्थेने ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पाहणीचा यासाठी आधार घ्यावा लागतो. देशातील धनदांडगा एक टक्का वर्ग हा ५३ टक्के संपत्ती, संसाधनांचा मालक असल्याचे ही पाहणी सांगते. ज्या उदयोन्मुख ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत भारत आहे, त्यातील चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलच्या तुलनेत भारतात कमालीच्या उत्पन्न व सांपत्तिक विषमतेचे दर्शन घडत असल्याचा पिकेटी यांचाही निष्कर्ष आहे.
समान संधी, समान न्याय नसणे म्हणजे विषमता असे आपण जाणतो. आपल्याकडे तर या विषमतेची विविध रूपे आपण पाहतो, अनुभवत आहोत. दारिद्रय़ निर्मूलन ही विषमता निर्मूलनाची पहिली पायरी मानली जावी. याबाबत अमर्त्य सेन ते जोसेफ स्टिग्लिट्झ या नोबेलविजेत्यांपासून जेफ्री सॅक्स, पॉल क्रुगमन, थॉमस पिकेटी ते अगदी आपले डॉ. रघुराम राजन यांच्यापर्यंतच्या अर्थचिकित्सक प्रभावळीचे एकमत बनले आहे. श्रीमंतांच्या खिशाला अधिकाधिक कात्री लावली जावी. त्याची श्रीमंती जितकी मोठी तितका त्याने करांचा भार पेलायला हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या करांपासून आश्रय मिळवून देणाऱ्या छावण्या अर्थात टॅक्स हेवन्सना नेस्तनाबूत करावे, अशा या प्रभृतींच्या शिफारसी आहेत. ऑक्सफॅमच्या मते करबुडव्या धनाढय़ांच्या संपत्तीचा तिसरा हिस्सा हा या आश्रय छावण्यात काळ्या पशांच्या रूपात दडला आहे. ही रक्कम मामुली नाही. तर भारतासारख्या देशाचे सात वर्षांचे अंदाजपत्रक चालवेल इतकी मोठी आहे.
गंमत म्हणजे वर नामोल्लेख असलेली सर्वच मंडळी आíथक नवउदारतेचीच पुरस्कर्ती आहेत. गेल्या शतकभरात ज्या तऱ्हेने प्रचंड संपत्तीची निर्मिती झाली तिचे मूठभरांकडे केंद्रीकरण न होता किमान न्यायाने वाटपासाठी आवश्यक असलेला धरबंद व्यवस्थेकडून सुटत चालला आहे, अशी त्यांची कळकळ आहे. राजसत्ता कुठलीही असो- लोकशाही, राजेशाही, सामंती वा साम्यवादी- तळच्या कंगालाचा आकडा गेल्या दोन-अडीच दशकांत फुगतच चालला आहे. खालच्या वर्गातील अभावग्रस्ततेची दाहकता इतकी की त्यांची होती-नव्हती ती संपत्तीही उत्तरोत्तर बाष्पीभवन होत वरच्या स्तराकडे सरकत गेल्याचे एक ना अनेक दाखले या मंडळींच्या अभ्यासातून पुढे आले आहेत. व्यवस्थेला संकटात लोटणारी अरिष्टे आणि अराजकाला हे निमंत्रणच आहे, हा पिकेटी यांचा दिल्लीतील भाषणांतील इशारा बराच बोलका आहे. शतकभराच्या अवधीत जागतिक अर्थव्यवस्थेने एक आवर्तन पूर्ण केले आहे, असे नोबेलविजेत्या स्टिग्लिट्झ यांचेही म्हणणे आहे. हितसंबंधांची वाळवी लागलेल्या व्यवस्थेचे आज पालकत्व ज्या बदचलनी व बथ्थडांच्या हाती आहे त्यांचा तर स्टिग्लिट्झ ‘कॅपिटलिस्ट फूल्स’ असाच उल्लेख करतात. भांडवलशाही व्यवस्थेला मोकाट-बाजाराभिमुख ठेवून तिला संकटांचे घर बनविणारी हीच मंडळी आहेत. गत तीन दशकांत बाजाराभिमुख अर्थव्यवस्थांवर ओढवलेली तब्बल १० अरिष्टे ही त्यापायीच असल्याचे ते सांगतात.
दावोसच्या परिषदेने भले चौथ्या औद्योगिक क्रांतीची द्वाही द्यावी, प्रत्यक्ष वस्तुस्थिती एका नाजूक वळणावर आहे याची जाण तेथे हजेरी लावणाऱ्या बहुराष्ट्रीय भांडवलशहांनाही आहे. जागतिक महामंदीपूर्वी तिशीच्या दशकात जी स्थिती होती तशीच आज दिसत असल्याचे रघुराम राजन यांनी सहा महिन्यांपूर्वी म्हटलेच आहे. त्यावर रिझव्‍‌र्ह बँकेनेच पुढे सारवासारव केली असली तरी त्यानंतरच्या जागतिक घडामोडी या राजन यांची ती भूमिका म्हणजे केवळ भूमिका नव्हती हेच दाखविणाऱ्या आहेत.
‘हिस्टरी रिपिट्स’ थाटातील हे युगान्तकारी पर्वाचे स्मरण बरेच सूचक आहे. आपल्याकडे मात्र साराच आनंदीआनंद आहे. गुणकारी इलाजापेक्षा तात्पुरता आराम, वेदनाहरण ही भारतीय मानसिकता जणू बनून गेली असावी. गरिबी या समस्येकडे पाहण्याचा आपला कलही म्हणून निर्मूलन नव्हे तर सुधारणा या धाटणीचाच आहे. अर्थात राजकीय अपरिहार्यता किंवा सामाजिक गरज म्हणा ‘सुधारणा’ आपली निकडच आहे. आजकाल गवगवा सुरू असलेल्या आíथक सुधारणांचेही हे असेच आहे. यास्तवच साडेचार दशकांपूर्वी ‘गरिबी हटाओ’तून सुरू झालेले राजकीय प्रयत्न आज कधी ‘आम आदमी का साथ’ तर कधी अच्छे दिनाची द्वाही फिरवून, ‘सब का साथ, सब का विकास’ असल्या पुऱ्या न केल्या जाणाऱ्या वायद्यांवर अव्याहत सुरूच आहेत. दडपादडपी, खरे रूप पुढे न येण्यासाठी जेथे प्रयत्न सुरू आहेत, तेथे यावर उपायांची अपेक्षाही फोलच! आíथक मापदंडात फेरबदल करून साधली गेलेली गरिबीच्या आकडय़ांतील सुधारणाही मग सुखावणारी ठरते. थोडाबहुत सुधार आहे हीच आपली समाधान वृत्ती! सामान्यांचे विचाराल तर गरिबीतून मोक्षाचा ध्यास आहेच, पण मोक्ष हा एक तर नशिबाचा खेळ, वा अघटितच अशीच बहुतांशांची पराभूत मनोधारणा आहे.