सामनेनिश्चिती आणि कृतीनिश्चितीच्या प्रकरणांत अडकलेल्या क्रिकेटपटूंपेक्षा बांगलादेशच्या शाकिब अल हसनचे ताजे प्रकरण वेगळे असले, तरी कमी गंभीर नाही..

‘अश्वत्थामा हतो.. नरो वा कुंजरो वा,’ असे पुटपुटत महाभारताच्या समरांगणात द्रोणाचार्याची दिशाभूल करणारा युधिष्ठिर त्या दिवसापासून ‘धर्मराज’ या आदरयुक्त बिरुदाला पारखा झाला. तो चुकीचे बोलला नाही, पण संदिग्ध बोलला! त्याची ही कृती संशयास्पद आणि म्हणूनच त्याच्या हेतूंविषयी शंका उपस्थित करणारी ठरली. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, द्रोणाचार्यानी त्याचे पहिले दोन शब्दच प्रमाण मानून शस्त्रत्याग केला, इतकी त्याच्या शब्दांना किंमत होती. म्हणजेच त्याने द्रोणाचार्याची निव्वळ दिशाभूल नव्हे, तर विश्वासघातही केला. काही वेळा केवळ गप्प बसणे किंवा अर्धसत्य सांगणे, हे असत्य सांगण्याइतकेच गुन्हेगारी ठरते. युधिष्ठिरासारख्यांकडून केवळ आणि केवळ निसंदिग्ध सत्यकथनच अपेक्षित असते. पुराणातील या दाखल्याचा संदर्भ क्रिकेटमधील सध्याच्या एका बहुचर्चित घटनेला लागू पडतो. शाकिब अल हसन या बांगलादेशच्या निष्णात क्रिकेटपटूवर नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोन वर्षांची बंदी आणली. शाकिबचा अपराध काय? तर त्याने किमान तीन वेळा दीपक अगरवाल या संशयित सटोडियाकडून साधल्या गेलेल्या संभाषणाविषयी किंवा संपर्काविषयी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला अवगत केले नाही. संशयास्पद नसणे पुरेसे नाही, तर संशयातीतच असावे लागते हा नैतिकतेचा पहिला नियम. या निकषावर शाकिबचा पाय घसरलाच. उपरोल्लेखित तिन्ही वेळा दीपक अगरवालकडून विविध विषयांबाबत शाकिबकडे पृच्छा झाली. परंतु शाकिबने त्याला धिक्कारले नाही. तो जे करत आहे, ते केवळ संशयास्पदच नव्हे तर नियमबाह्य़ आहे, याची पुरेशी जाणीव शाकिबला होती. हल्ली प्रत्येक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामन्यांच्या आधी क्रिकेटपटूंनी काय करावे नि काय करू नये, याविषयीचे नियम स्पष्टपणे सांगितले जातात. सामन्याच्या संकुलात साधा मोबाइल फोनही घेऊन जाण्याची मुभा नसते. क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या अवाढव्य पैशामुळे, गुळाकडे मुंगळे आकर्षित होतात तसेच अपप्रवृतीची मंडळी क्रिकेटकडे आणि क्रिकेटपटूंकडे वळतात हे दिसून आले आहेच. अलीकडच्या काळात पाकिस्तानचा मोहम्मद आमिर आणि भारताचा शांताकुमारन श्रीशांत हे दोन प्रमुख क्रिकेटपटू सामनेनिश्चिती आणि कृतीनिश्चितीप्रकरणी (स्पॉटफिक्सिंग) सटोडियांच्या जाळ्यात अडकले होते. शाकिबचे प्रकरण यांच्यापेक्षा वेगळे असले, तरी कमी गंभीर नाही. ते कसे, हे शोधण्यापूर्वी शाकिबचे विद्यमान क्रिकेटमधील महत्त्व समजून घ्यावे लागेल.

शाकिब अल हसन आज जगातील आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. अष्टपैलूंच्या यादीत कसोटी क्रिकेटमध्ये तिसरा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिला आणि टी-२० क्रिकेटमध्ये दुसरा. सर गारफील्ड सोबर्स आणि जॅक कॅलिस यांच्यासारख्या महानतम अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या तोडीचा, अशी त्याची ओळख. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शाकिबने ६०६ धावा जमवल्या आणि ११ बळीही घेतले. एखाद्या विश्वचषक स्पर्धेत ५०० हून अधिक धावा आणि १० पेक्षा अधिक बळी मिळवणारा शाकिब हा आजवरचा एकमेव क्रिकेटपटू. तो वास्तविक एक अष्टपैलू क्रिकेटपटू. तरीही विश्वचषकाच्या इतिहासात एका स्पर्धेत त्याच्याहून अधिक धावा जमवणारे फलंदाज दोनच – भारताचा सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन. जगभरच्या बहुतेक सर्व टी-२० स्पर्धामध्ये त्याला प्रचंड मागणी असते. त्याच्यावर मोठाल्या बोली लावल्या जातात. कोलकाता, अ‍ॅडलेड, बार्बेडोस, कराची, हैदराबाद, वुर्स्टरशायर, पेशावर ते ढाका अशा जगभरच्या विविध शहरांतील फ्रँचायझी संघांसाठी तो खेळत असतो. लीग कुठेही खेळवली जात असो, शाकिब संघात हवाच. भारताच्या दौऱ्यावर सध्या आलेल्या बांगलादेश संघाचा तो कर्णधार होता. या दौऱ्यावर येण्यापूर्वी बांगलादेशचे हे क्रिकेटपटू तेथील क्रिकेट मंडळाच्या विरोधात बंडाच्या पवित्र्यात होते. त्यांची अधिक मानधनाची रास्त मागणी शाकिबने उचलून धरली होती. तो या क्रिकेटपटूंचे नेतृत्वही करत होता. परंतु आयसीसीने शाकिबवर केलेले आरोप सप्रमाण असून, त्यांची कबुली शाकिबने दिलेली आहे. आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून दोन वर्षांची बंदी शाकिबवर घालण्यात आलेली आहे. त्याची वागणूक चांगली व संशयातीत राहिली, तर ही बंदी वर्षभराने कमी होऊ शकते. या प्रथितयश क्रिकेटपटूकडे सटोडियांचे लक्ष गेले नसते, तरच नवल होते. त्यानुसार दीपक अगरवाल नामे सटोडियाने त्याच्याशी प्रथम नोव्हेंबर २०१७ मध्ये संपर्क साधला होता. त्या वेळी आणि त्यानंतर २०१८ च्या एप्रिल-मे आयपीएलपर्यंत आणखी दोन वेळा दीपक आणि शाकिब यांच्यात संवाद झाला. ‘मासा गळाला लागला आहे’ या समजुतीतूनच दीपक शाकिबशी वारंवार संपर्क साधत राहिला. या सर्व काळात शाकिबने दीपकला हवी असलेली कोणतीही माहिती थेट पुरवली नाही, परंतु ‘समक्ष भेटू या’ असे मात्र सुचवले. नियमानुसार, या प्रत्येक वेळी शाकिबने आयसीसीकडे किंवा आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे या घडामोडींची माहिती पुरवणे बंधनकारक होते. या विषयीचे नियम त्याला पुरेसे ठाऊक होते. त्याच्यासारख्या अत्यंत अनुभवी आणि निष्णात क्रिकेटपटूकडून अशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षाच नव्हती, असे त्याचे चाहते म्हणू लागले आहेत. या भाबडय़ा चाहत्यांना आधुनिक, फ्रँचायझी-केंद्रित क्रिकेट ही काय गटारगंगा झालेली आहे, याची कल्पना नाही.

सध्या जगभर टी-२० किंवा तत्सम लघुस्वरूपाच्या स्पर्धाचे पेव फुटले आहे. एकटय़ा भारतात किमान चारेक मोठय़ा शहरांमध्ये स्थानिक टी-२० स्पर्धा सुरू झाल्या आहेत. शेजारील बांगलादेशात किमान दोन टी-२० स्पर्धा खेळवल्या जातात. याशिवाय वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड या देशांमध्येही वर्षभर टी-२० लीग सुरू असतात. दक्षिण आफ्रिकेतील बंद पडलेली स्पर्धा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हे जणू कमी नव्हते, म्हणून टी-१०, हंड्रेड, माजी क्रिकेटपटूंची कॅनडात किंवा संयुक्त अमिरातींमध्ये लीग असले तमाशेही सुरू आहेतच. एकीकडे कसोटी क्रिकेटमध्ये तीन-चार आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ-दहा संघ जुळवताना मारामार आहे; पण टी-२० क्रिकेटला मात्र बरकत आहे. परंतु बरकत आहे, म्हणजे शुचिता आहे असे अजिबातच नव्हे. भारतातीलच आयपीएलमध्ये फ्रँचायझींमधील भागभांडवल विभागणी, नफ्याची विभागणी या आघाडय़ांवर सगळा संशयाचा खेळ सुरू आहे. सामनेनिश्चिती आणि सट्टेबाजीप्रकरणी येथील एका फ्रँचायझी प्रवर्तकाला तुरुंगवास झाला नि दोन फ्रँचायझींचे दोन वर्षांसाठी निलंबन झाले. जिथे भारतासारख्या सुस्थित देशातील फ्रँचायझींची ही अवस्था, तिथे इतर देशांतील अशा स्पर्धाबाबत काय बोलावे? बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतील टी-२० स्पर्धा या भ्रष्टाचाराचे आगार मानल्या जातात. या सगळ्या लीगमध्ये भ्रष्टाचारी किंवा सटोडिये कोण असतात? बहुतांशाने भारतीय! शेन वॉर्न-मार्क वॉला सामनेनिश्चिती करण्यास सांगणारे किंवा हॅन्सी क्रोनिए-मोहम्मद अझरुद्दीन यांना सट्टेबाजीतला वाटा देऊ पाहणारे भारतीयच होते. श्रीलंकेत आणि बांगलादेशातील लीगमध्ये सर्वाधिक सुळसुळाट भारतीय सटोडियांचा झाला आहे. शाकिबला फशी पाडणारा हा जो कोण दीपक अगरवाल आहे, त्याची हरयाणात एक क्रिकेट अकादमी आहे म्हणे. तो राहतो दुबईत. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्याची सर्वाधिक जबाबदारी त्यामुळेच भारतीयांची आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुलीची झालेली नियुक्ती ही त्या दृष्टीने आश्वासक आहे. कारण आजही तो फ्रँचायझीपूर्व क्रिकेटचा प्रतिनिधी म्हणूनच ओळखला जातो. सटोडिये आणि सामनेनिश्चितीचा समूळ नायनाट हे काम त्याने प्राधान्य तत्त्वावर हाती घेतले नाही, तर क्रिकेटची अवस्था त्या डब्ल्यूडब्ल्यूईसारख्या लुटुपुटुच्या हास्यास्पद कुस्तीसारखीच होऊन जाईल.