नवीन ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेतील नवउद्यमी व्यवसायांना, कितीही झाले तरी भोवतालच्या सामाजिक-सांस्कृतिक परिवेशापल्याड मजल मारता येत नाही. ‘फ्लिपकार्ट’च्या सचिन व बिन्नी बन्सल या संस्थापकांमधील पदांच्या ताज्या पुनर्रचनेबद्दल उठलेल्या शंकेखोर नजरा हेच सूचित करतात. ऑनलाइन बनिया व्यवसायातील गूढ, अगम्य चाल म्हणून त्याकडे पाहून नाट लावण्याचा प्रयत्न भारतीय संस्कृतीत स्वाभाविक असला तरी तो या प्रसंगात तरी टाळला जायला हवा. जुगाडू दृष्टिकोन, भन्नाट कल्पकता, दुर्दम्य ध्यास व अवीट जिद्दीच्या या पहिल्या पिढीच्या उद्योजकतेचा हा एक परिपक्व निर्णय म्हणूनच त्याचे स्वागत व्हायला हवे. या मंडळींना अर्थ पाठबळ देणारे साहसी भांडवलदार आणि देशी-विदेशी गुंतवणूकदारांची तरी अशीच भूमिका आहे. आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाधारित ई-पेठेचा दबदबा निर्माण करणाऱ्या ‘फ्लिपकार्ट’ या व्यापारगाथेच्या सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या दोन नायकांनी जबाबदाऱ्यांची अदलाबदल करीत असल्याचे सोमवारी जाहीर केले. आडनावबंधू असण्याखेरीज या दोहोंत तसेच वरिष्ठ व्यवस्थापनातील तिसरे मुकेश बन्सल यांचे परस्परांशी रक्तसंबंधातील नाते नाही. त्यामुळे ‘भाऊबंदकी’चाही हा मामला नाही हेही स्पष्ट व्हावे. या बन्सल नामावलीत सारख्याच व्यवसायात असलेल्या ‘स्नॅपडील’चे संस्थापक रोहित बन्सल हे आणखी एक बन्सल आहेत. तर आजवर पडद्याआड राहून आपली भूमिका चोख बजावणारे बिन्नी बन्सल यापुढे फ्लिपकार्टचे मुख्याधिकारी म्हणजे कंपनीचे म्होरकेपद भूषवतील, जी भूमिका आजवर सचिन बन्सल यांच्याकडे होती. यापुढे सचिन बन्सल हे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने नव्या व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधी धुंडाळतील. सिलिकॉन व्हॅलीतून बाहेर पडलेले अनेक मातबर आज फ्लिपकार्ट व त्याच्या अंगोपांगांत सामील झाली आहेत. या नव्याने दाखल होणाऱ्यांमधून नेतृत्वगुणाच्या विकासावर सचिन बन्सल लक्ष देतील. खांद्याला खांदा देऊन उभे राहून परस्परांना पूरक जबाबदाऱ्या निभावून एकमेकांचा भार हलका करणारा हा शुद्ध भूमिकाबदल आहे. फ्लिपकार्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनांत बेबनाव आहे, बिन्नी बन्सल यांचा वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यांच्या मनधरणीची सबब म्हणून ही तडजोड पुढे आली अशा अटकळींना येथे काहीही जागा नसल्याचे कंपनीनेही लगोलग स्पष्ट केले आहे. हटके ध्यास घेऊन पुढे आलेल्या तंत्रज्ञांच्या तरुण पिढीने केवळ पैशाच्या पाठबळानेच यशस्वी उद्योग उभा राहतो, हा समज पुरेपूर पुसून काढला आहे. त्याची मुहूर्तमेढ इन्फोसिसपासून आपल्याकडे झाली, त्या इन्फोसिसमधील व्यवस्थापकीय बदलांकडेही मागे याच पारंपरिक दृष्टीने पाहिले गेलेले आहे. लौकिकार्थाने नसेल पण घाम गाळून ज्या कंपनीची पायाभरणी करीत तिला वैभव मिळवून देणाऱ्या संस्थापकांना सर्व व्यवसाय पैलूंची सारखीच माहिती व अनुभव असावा असे वाटल्यास भूमिकाबदल केला गेल्यास ते वावगे का ठरावे? जन्मजातच्या बंधांना झुगारून देऊन ज्यांनी पारंपरिक उद्योगालाच तोवर अकल्पित असलेला चेहरा प्रदान केला, त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टीही मग तितकीच खुली व विशाल बनायला हवी. या मंडळींकडून झालेली कार्यात्मक जबाबदाऱ्यांमधील ही अदलाबदल हटके वळणाचीच असावी, असे मानायलाही पुरेपूर वाव आहे. किंबहुना अमेरिकी भांडवली बाजारात ‘फ्लिपकार्ट’च्या होऊ घातलेल्या प्रवेशाआधी असे प्रयोग करण्याचे धाडस अंगलट येऊ शकते, याची जाणीव असतानाही हे पाऊल टाकले जावे हे विशेषच म्हणायला हवे. आपल्याकडे राजकीय परिमाणात वाईट अर्थाने रुळलेल्या ‘खांदेपालटा’सारखा हा बदल वचपा काढण्यासाठी किंवा दुसऱ्यास गप्प करण्यासाठी झालेला नाही, इतकेच.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2016 रोजी प्रकाशित
ई-पेठेतील खांदेपालट!
बन्सल नामावलीत सारख्याच व्यवसायात असलेल्या ‘स्नॅपडील’चे संस्थापक रोहित बन्सल हे आणखी एक बन्सल आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2016 at 05:46 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on changes in online shopping