विपुल मनुष्यबळ हवे असलेले, परिणामी सर्वाधिक रोजगार पुरविणारे आपल्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय. वित्तीय व बँकिंग सेवा, किरकोळ व्यापार, वाहतूक व्यवस्था, हॉटेल, पर्यटन वगैरे आणि मुख्य म्हणजे देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आदी या सेवा क्षेत्राचे घटक आहेत. सध्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गतिमानता देऊ शकेल असेही हे क्षेत्र आहे. कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा जवळपास ६० टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. या सेवा क्षेत्राने सरलेल्या जानेवारी महिन्यात मागील सात वर्षांतील सर्वाधिक गतिमान इष्टांक नोंदविल्याचे एका खासगी (परंतु प्रतिष्ठित आणि म्हणूनच कदाचित विश्वासार्ह!) सर्वेक्षणाने स्पष्ट केले आहे. भारताच्या सेवा क्षेत्रातील व्यवसायाचा निर्देशांक जानेवारीत ५५.५ गुणांकावर पोहोचला आहे, जो आधीच्या डिसेंबरमध्ये ५३.३ वर होता. किंबहुना डिसेंबरमध्येही तो ५२.७ वरून ५३.३ असा पाच महिन्यांचा उच्चांक नोंदविणारा होता. त्यामुळे ही सलगपणे सुरू असलेली संयत वाढ आहे. ‘आयएचएस मार्किट इंडिया’च्या या सर्वेक्षणातील आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे, सेवा क्षेत्राबरोबरच देशाच्या निर्मिती/ वस्तू उत्पादन क्षेत्राचा निर्देशांकही डिसेंबरमध्ये गतिमान स्तरावर पोहोचल्याचे ते सांगते. सेवा आणि निर्मिती असा दोन्हींचा एकत्रितपणे विचार केल्यास, जानेवारीत त्याने ५३.७ गुणांकावरून ५६.३ अशा सप्तवार्षिक उच्चांक गाठल्याचे दिसून येते. या दोन्ही निर्देशांकाची कामगिरी ५० गुणांच्या वर राहणे हे ‘वाढ’सदृश; तर या ५० गुणांच्या पातळीखाली त्याची घसरण कुंठितावस्थादर्शक मानली जाते. तथापि त्यातील महिनागणिक फेरबदल हे मामुली दशांश गुणांच्या फरकाने होत असतात. जानेवारीच्या सेवा निर्देशांकातील एकदम २.२ गुणांकांनी वाढ म्हणूनच खूपच लक्षणीय आहे. हे अशासाठी कारण, हे सर्वेक्षण सर्वथा खासगी क्षेत्रातील कंपन्यांतील मुख्य निर्णयक्षम अधिकाऱ्यांचा कल आणि भाव जोखून पार पडत असते. या व्यवस्थापकांनी आजवरची सर्व निराशा आणि मलूलतेची जळमटे झटकल्याचे हे द्योतक जरूरच आहे. सध्याच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या मागणीतील मरगळ सरत चालली असून, तिला मोठी चालना मिळत आहे हेही यातून सूचित होते. मागणी वाढली, व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू लागला तर अर्थातच मनुष्यबळाची मागणीही वाढेल. म्हणजे नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीला वेग येईल, असेही हे सूचित आहे. तथापि या सर्वेक्षणाने एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे. जो सध्याच्या एकंदर बदललेल्या अर्थप्रवाहाला अनुरूपच आहे. निर्मिती व सेवा व्यवसायात परतत असलेली गतिमानता ही चलनवाढीतील भडक्याची किंमत मोजून होत आहे. निर्मिती व सेवा उद्योगाचा कच्च्या मालासाठी खर्च वाढला आहे, परिणामी त्यांच्या उत्पादित वस्तू व सेवांची किंमतही वाढणार आहे. त्यामुळे ताजी वाढ ‘उत्साहवर्धक’ असली तरी खरेच ‘अर्थपूर्ण’ म्हणावी काय, हा प्रश्न आहे. शिवाय या सर्वेक्षणाचा दीर्घकाळाचा सरासरी इष्टांक हा ५४.२ असा आहे. त्यामुळे आपण तूर्तास सरासरी कामगिरीपर्यंत मजल मारू शकलो आहोत. हेही कमी नसले तरी येथून पुढे उत्तमतेच्या दिशेने वाटचाल असा हा संकेत मानायला थोडी वाट पाहावी लागेल.