जम्मू-काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्य़ातील त्या कुलसुम बानो भट या बारा वर्षांच्या मुलीला काय माहीत की, जी लेखिका तिला मनापासून आवडते, ती एक दिवस थेट भेटच पाठवेल म्हणून. हॅरी पॉटर या कादंबरी मालिकेची लेखिका जे. के. रोलिंग ही कुलसुमची खरी नायिका. केवळ छान लिहिते म्हणून नाही, तर तिलाही लहानपणी खूप काही सोसावं लागलं आणि तरीही तिनं प्रत्येक गोष्टीला धीरानं सामोरं जायचं ठरवलं म्हणून. जन्मल्यापासून कुलसुम जे काही पाहात आली आहे, ते भयानक या सदरात मोडणारं. आजूबाजूची परिस्थिती समजावून घेण्याची कुवतही नसलेल्या या चिमुरडीला अशा भयाण अवस्थेत स्वप्नांच्या जगातला हॅरी पॉटर जवळचा न वाटला तरच नवल.  रोलिंगच्या लेखणीतून उतरलेल्या या कादंबरी मालिकेने कुलसुमसारख्या जगातील अनेक बालकांना गेली दोन दशके अक्षरश: गुंगवून टाकले आहे. जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून जे. के. रोलिंगला नवी ओळख मिळाली, ती मोठय़ा माणसांच्या जगात.  हॅरीच्या अकल्पित, गूढ आणि कल्पनारम्य अशा मती गुंग करणाऱ्या विश्वात लहानग्यांना त्यांचे म्हणून एक जग सापडते आणि त्यामुळेच तिथे ती अधिक रमतात. गेल्या वीस वर्षांत रोलिंगबाईंवर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा नुसता वर्षांव सुरू आहे आणि तरीही त्यांनी कुलसुम बानो भट हिने लिहिलेला निबंध ट्विटरवर वाचला. अशी किती खुशीपत्रे त्यांना रोजच्या रोज येत असतील. त्यापैकी काहींच्या वाटय़ाला त्यांचे उत्तरही असेल, पण कुलसुमसाठी त्यांचा निरोप ही आगळीवेगळी भेट होती. कुलसुमच्या शिक्षिका प्रिया यांनी हा निबंध ट्विटरवर प्रसारित केला आणि रोलिंग यांनी कुलसुमची अधिक माहिती विचारून तिला काही गंमत पाठवायची आहे, असे सांगितले. लेखक म्हणून आपली संवेदनशीलता जपणे याला जगात किती मोल असते, हे कुलसुमच्या आनंदाच्या उधाणावरून सहज लक्षात येईल. समाज म्हणून आपल्या परिसरात जे काही घडत असते, त्याबद्दल जराही कणव न बाळगता आपल्याच विश्वात रमणाऱ्या जगातील अनेक लेखकांसाठीही रोलिंगबाईंची ही कृती अनुकरणीय म्हणावी अशी.  जम्मू-काश्मीर काय किंवा ईशान्या प्रान्त काय, तिथे काय घडते आहे, याचे जराही सोयरसुतक आपल्या संवेदनशील मनाला असत नाही. पूर आला आणि त्यात शेकडो जण वाहून गेले, तरी आपल्या मनावर साधा ओरखडाही उमटत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये रोज होत असलेल्या हिंसाचाराचा तिथल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल, हे आपल्या गावीही नसते. आपण आपल्या डबक्याएवढय़ा जगातल्या कूपमंडूक राजकारणात आणि चित्रवाणीवरील त्याच त्या मालिकांच्या जगात एखाद्या बेडकाप्रमाणे उडय़ा मारत राहतो. आपले विश्व मोठे व्हायला हवे, दुसऱ्याचे दु:ख आणि आनंद आपल्यापर्यंत पोहोचायला हवे, अशी जाणीवही आपल्याला होत नाही. दुसरा कोणी आपल्या देशातलाच तरी कशाला असायला हवा, तो आपला सहोदर असावा, एवढीच काय ती अपेक्षा कोणाही संवेदनशील माणसाने करायला हवी. पण गेल्या काही दशकांत आपण सारे अधिक आत्ममग्न होत चाललो आहोत. गंमत म्हणजे त्याबद्दल आपल्या कुणालाच बोच नाही. या अशा वातावरणात रोलिंगबाईंनी इंग्लंडमध्ये बसून जम्मू-काश्मीरमधल्या एका छोटय़ाशा मुलीच्या चार ओळींच्या निबंधाची दखल घ्यावी, ही नोंदवण्यासारखीच गोष्ट. अल्लाने रोलिंग यांना खूप आयुष्य द्यावे, म्हणजे मोठे झाल्यावर त्यांना भेटता येईल, ही कुलसुमची भावना जेवढी नितळ, तेवढेच, लहानांच्या खळबळ माजवणाऱ्या रोलिंगबाईंचे हे सहोदरत्व त्यांच्या सर्जनाशी नाळ जोडणारे आणि म्हणूनच कौतुकास्पद.