‘भारतात हवामान संशोधक नाहीत, केवळ माहितीचे विश्लेषण करणारे सरकारी अधिकारी आहेत, म्हणून अंदाज चुकतात’ अशी टीका आपल्या हवामान विभागावर वेळोवेळी होतच असते. मोसमी पावसाचा अंदाज लावणे कठीण आहे, हे सर्वानाच मान्य आहे. अनेकदा एक दिवस आधीही पावसाचा योग्य अंदाज करता येत नाही. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा अंदाज न येणे हे त्यापैकीच एक. एवढेच नाही तर ३० ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त झाल्यावर प्रत्यक्षात पडलेल्या उन्हाची आठवणही सामान्यांच्या मनातून गेली नसेल. या पाश्र्वभूमीवर केरळमध्ये मोसमी वारे पोहोचण्याच्या आधीच मुंबईत दहा दिवसानंतर प्रलय येण्याइतपत पाऊस पडेल असे ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने जाहीर केले. आजमितीला कोणत्याही खासगी संस्थेकडे हवामानाची निरीक्षणे नोंदवण्याची यंत्रणा नाही. भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या एनडब्ल्यूपी प्रारूपाच्या माहिती आधारेच खासगी संस्था अंदाज व्यक्त करतात. न्युमेरिकल वेदर प्रेडिक्शन (एनडब्ल्यूपी) प्रारूपाने -गणिती समीकरणांतूनच- अंदाज व्यक्त केला जातो. हे अंदाज अनेकदा चुकतात. त्यांना त्या वेळच्या वास्तविक हवामानाची- उपग्रहामार्फत येणाऱ्या प्रतिमा, वाऱ्याचा वेग, दिशा, हवेचा दाब- अशा अनेक घटकांची जोड द्यावी लागते. खासगी संस्थांकडे या प्रकारे हवामानाची माहिती घेणारी यंत्रणा नाही. मात्र तरीही खासगी संस्थेने दहा दिवसांपूर्वी दिलेल्या अंदाजाने घबराट पसरली. ५ जून रोजी हवामान विभागानेही कोकणपट्टीत मुसळधार पावसाचा व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला. या कोकणपट्टीच्या सहा जिल्ह्य़ांत मुंबईचाही समावेश होता. खरे तर पावसाच्या चार महिन्यांपैकी साधारण साठ दिवस कोकण किनारपट्टीत अशा प्रकारे धोक्याचा बावटा (रेड अॅलर्ट) असतो, हे या यंत्रणांशी संबंधित सर्वाना माहिती आहे. (गुप्तचर विभागाकडून मुंबईतही अनेकदा असाच ‘रेड अॅलर्ट’ दिलेला असतो; मात्र तो घातपाताचा इशारा आला म्हणून पोलीस किंवा सरकारी यंत्रणा तो तातडीने जाहीर करून सर्व काम थांबवत नाही.) धोक्याचा बावटा असूनही कोकणपट्टीत एखाद्या तालुक्यात भरपूर पाऊस पडतो तर इतरत्र कधी कधी टिपूसही पडत नाही. त्यामुळे आदल्या दिवसापर्यंत त्याबाबत कोणीही भाष्य करीत नाही. मात्र खासगी संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजाची सरकारी विभागाने री ओढण्याचे कारण काय? तो अंदाज योग्य ठरला आणि भरपूर पाऊस पडला तर आपल्यावर टीका नको, या सुप्त भीतीतून हवामान विभागही अतिवृष्टीच्या अंदाजावर ठाम राहिला असावा. अंदाज देऊनही कोणतीच तयारी केली नाही तर आपल्यावर जबाबदारी पडेल म्हणून सरकारी यंत्रणांनी सर्व सज्जता केली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची शनिवार, रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली. यावेळी शनिवार, रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही, एवढेच. शनिवारी मुंबईत अतिवृष्टी होणार नाही, याचा अंदाज शुक्रवारी आला. मात्र तो अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला नाही. प्रत्यक्षात शनिवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, रविवारी तर ऊनही पडले. मुंबई शनिवारी खोळंबली, तुंबली हे खरे; पण तो ‘अतिवृष्टीचा कहर’ नसून भरती आणि पाऊस या दोघांनी नेमकी सकाळ-संध्याकाळची वेळ गाठल्याचा वाटा त्यात मोठा होता. नालेसफाईच्या धीम्या गतीपासून अनधिकृत बांधकामांपर्यंत अनेक गोष्टींचा परिणाम होता. हाताशी अद्ययावत यंत्रणा नसताना, त्याचे योग्य विश्लेषण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसताना आणि खासगी संस्थेच्या अंदाजांचा भार वाहताना भारतीय हवामान विभागाने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. ते न होता हे असले अतिअंदाज बरसतच राहिले, तर त्यांचा ताण सरकारी यंत्रणांसोबत सामान्यांनाही सहन करावा लागणार.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2018 रोजी प्रकाशित
अति-अंदाजांच्या वृष्टीचा ताण..
गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा अंदाज न येणे हे त्यापैकीच एक.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-06-2018 at 01:49 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department monsoon prediction