21 September 2020

News Flash

नकाशावाचन ‘ऑफलाइन’

स्मार्टफोनमुळे शक्य झालेल्या अनेक उपयुक्त गोष्टींपैकी एक म्हणजे ‘मॅप्स’

स्मार्टफोनमुळे शक्य झालेल्या अनेक उपयुक्त गोष्टींपैकी एक म्हणजे ‘मॅप्स’. प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप नावाचे अ‍ॅप असते. या अ‍ॅपच्या मदतीने आपण कोणत्याही ठिकाणाचा पत्ता, आपल्या ठिकाणाहून तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, अंतर, वाहतुकीचे विविध पर्याय अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खिशात स्मार्टफोन असेल तर आजूबाजूला पत्ता विचारत बसण्याची गरज लागत नाही. हे मॅप्स स्मार्टफोनमधील जीपीएस यंत्रणा आणि इंटरनेट यांच्या समन्वयातून कार्यरत असतात. आपण सध्या कोठे आहोत, हे जीपीएसमुळे ओळखता येते आणि इंटरनेटच्या माध्यमातून पुढचा मार्ग दाखवला जातो. हे झाले मॅपचे फायदे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत बऱ्यापैकी इंटरनेट खर्च होते. बऱ्याचदा आपण दुसऱ्याच शहरात असताना इंटरनेट कनेक्शन बंद असते किंवा नेटवर्क नसल्याने ते कामच करू शकत नाही. अशा वेळी मॅप्सच्या अ‍ॅप्लिकेशनचा अजिबात उपयोग होत नाही. हेच ओळखून ‘सिटीमॅप्स’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे ते ‘ऑफलाइन’ अर्थात इंटरनेटच्या मदतीशिवाय काम करते. परदेशातील किंवा परराज्यातील एखाद्या ठिकाणी गेल्यावर तेथील प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, वाहतूक सुविधा, रेल्वेस्थानके आदी गोष्टींसाठी बरीच शोधाशोध करावी लागते. अशा वेळी या अ‍ॅपच्या साह्य़ाने तुम्ही या सर्व गोष्टी सहज जाणून घेऊ शकता. या अ‍ॅपमध्ये खाद्य, पर्यटन, प्रवासी सुविधा अशा वेगवेगळय़ा वर्गवारी करून नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खाण्याची ठिकाणे शोधण्यासाठी ‘फूड मॅप’चा उपयोग होतो तर, प्रेक्षणीय स्थळांसाठी ‘ट्रॅव्हल मॅप’ उपयोगी पडतो. हे सर्व ‘मॅप’ इंटरनेटशिवाय काम करतात. तसेच ते डाउनलोडही करून घेता येतात. अर्थात त्यासाठी जीपीएस कार्यान्वित करणे आवश्यक आहे. या अ‍ॅपमुळे रोमिंगमध्ये होणारा इंटरनेटचा खर्च वाचतोच; पण त्याचबरोबर अनोळखी प्रदेशात भिन्न भाषेतील लोकांकडे पत्त्याची विचारणा करताना करावी लागणारी दगदगदेखील वाचते.

अनोळखी प्रदेशात ओळखीचा निवारा
उन्हाळी सुट्टय़ा लागल्या की प्रत्येक कुटुंबाला पर्यटनाचे वेध लागतात. एप्रिल, मे महिन्याच्या काळात चार दिवस एखाद्या प्रेक्षणीय स्थळी फिरायला जाण्याचा एक वार्षिक कार्यक्रमच असतो. सहाजिकच अशा ठिकाणी जाण्यासाठी तिकिटे, हॉटेल, गाइड या गोष्टी आधीच निश्चित करून ठेवण्यात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष पर्यटनाला गेल्यावर या गोष्टींसाठी फार वणवण करावी लागत नाही. हे झालं ठरवून फिरायला जाणाऱ्यांचं. पण ऐनवेळी सहलीवर जाणाऱ्यांची या कटकटींतून सुटका होत नाही. पर्यटन स्थळी निवाऱ्याची व्यवस्था करणे, हे सर्वात तापदायक असते. अलीकडे अनेक ट्रॅव्हल कंपन्यांच्या संकेतस्थळांवरून जगाच्या कानाकोपऱ्यातील हॉटेलांची माहिती घेऊन बुकिंग करता येते. मात्र, ऐनवेळी केलेल्या बुकिंगसाठी जादा पैसे मोजावे लागतातच.

अशा वेळी ‘एअर बीएनबी’ ही व्यवस्था अतिशय उपयुक्त ठरते. इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय झालेली ही संकल्पना आता अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. ‘एअर बीएनबी’च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही देशातील, कोणत्याही राज्यातील, कोणत्याही शहरातील, कोणत्याही भागात तुमच्या निवाऱ्याची व्यवस्था करू शकता. विशेष म्हणजे, ‘एअर बीएनबी’चे सदस्य असलेले तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या घरात अशी व्यवस्था होते. सहाजिकच त्यासाठी हॉटेलइतके पैसे मोजावे लागत नाहीत. या अ‍ॅपमध्ये तुम्ही एखादे ठिकाण नोंदवल्यास त्या ठिकाणी राहात असलेल्या ‘एअर बीएनबी’च्या सदस्यांची माहिती उपलब्ध होते. या सदस्यांच्या घरात कशी व्यवस्था आहे, किती खोल्या आहेत, तेथून प्रवासी सुविधा कशा आहेत, अशी संपूर्ण माहिती या अ‍ॅपमध्ये पुरवण्यात येते. तसेच या निवाऱ्याचा खर्च किती तेही नमूद केलेले असते. त्यानुसार तुम्ही हव्या त्या सदस्याशी संपर्क साधून स्वत:च्या राहण्याची व्यवस्था करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ही इतर पर्यटकांना तुमच्या घरात निवारा देऊन अर्थाजन करू शकता. आपण दुसऱ्या व्यक्तीच्या घरात राहाणार असल्याने घरगुती वातावरणात रहाण्याचा आनंद मिळतो.

– असिफ बागवान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:03 am

Web Title: apps for maps offline
Next Stories
1 चुटकीसरशी वैद्यकीय मदत
2 क्रिकेटचा महासंग्राम स्मार्टफोनवर‘
3 कार्यालयीन कामे स्मार्टफोनवर
Just Now!
X