25 May 2020

News Flash

एकाकीपणाकडून एकांताकडे

दुपारी केतकीचा फोन आला. चार दिवस कसे मस्त गेले सांगत होती.

सुमतीताईंना घरी आल्यावर परत रिकामपण आलं. पण आतापर्यंत त्या स्वत:शी संवाद करायला शिकल्या होत्या. सकारात्मक दृष्टिकोनातून बघायची त्यांनी स्वत:ला सवय लावून घेतली होती. स्वत:ची कंपनी त्यांना आवडू लागली होती. त्या स्वत:शी म्हणू लागल्या होत्या की, माझा एकाकीपणा संपला आहे आणि माझा एकांताकडे प्रवास सुरू झाला आहे.

रात्रीचे बारा झाले होते. मकरंदची आई सुधा आणि त्यांची बहीण सुमती यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं म्हणत सुधाताईंनी दरवाजा उघडला. मकरंद, मकरंदची बहीण मेधा, तिची मुलगी प्रिया, तिचा नवरा संजय, केतकी, आदित्य, अस्मिता ‘हॅपी बर्थ डे’ म्हणत घरात आले. घर दणाणून सोडलं. नातवंडे विचारत होती, आजी कसं वाटलं सरप्राईज? सुधाताई ‘मस्त मस्त’ म्हणाल्या. सुमतीताई थोडय़ा चिडूनच म्हणाल्या, ‘‘असली कसली सरप्राईज देता या वयात? इतक्या रात्री?’’ सुधाताई समजावत म्हणाल्या, ‘‘आपण जागेच तर होतो, मला तर खूप आनंद झालाय.’’ त्यांनी मुलांनी आणलेला केक कापला, त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्याबरोबर नाचल्या पण. सुमतीताईंनी नाक मुरडलं. सुधाताईंनी दुर्लक्ष केलं.

आल्यासरशी सगळे चार दिवस राहिले. जाताना सुधाआजीने नातवंडांसाठी चिरोटे केले. मुलेपण खूश झाली. सगळे गेल्यानंतर सुधाताई म्हणाल्या, ‘‘चार दिवस घर कसं भरलेलं होतं. आता घर खायला उठतंय.’’ त्यावर सुमतीताईंचं स्वगत होतं की, ‘‘चार दिवसांची सुट्टी लागून आली म्हणून आले सर्व जण. नाही तर ताई तिच्या घरात आणि मी माझ्या घरात एकटेच असतो. दोघींनाही दोन मुले, पण आमच्या वाटय़ाला एकटेपणा आलाय. कोणाला काही वाटत नाही याचे. सुधाताईचे पती खूप लवकर गेले. ताई पंचेचाळिशीची होती. नोकरी करून मुलांना मोठं केलं. बिचारीने एकटीने केलं सर्व. आतासुद्धा एकटीच राहाते.’’

सुधाताईंच्या मते, ‘‘जसे मी नवऱ्याशिवाय दिवस काढले तसे मुलांनाही वडिलांशिवाय दिवस काढायला लागले. पण आम्ही एकमेकांना होतो. आता इथे कोल्हापुरात राहायचा निर्णय माझा आहे. मला सगळे जण त्यांच्याकडे यायचा सारखा आग्रह करतातच की. पण मलाच त्या मुंबईत करमत नाही. इतकी र्वष इथे या घरात राहिले, इथे सर्व रुटीन बसले आहे. इथेच बरं वाटतं. मध्ये मध्ये जातेच की दोघांच्याकडे राहायला. चार दिवसांची सुट्टी मिळाल्यावर दुसरीकडे न जाता इथे माझ्या वाढदिवसासाठी आले ही पण मोठीच गोष्ट आहे ना.’’

सुमतीताईंना हे काही पटत नसे. त्यांचे पती दोन वर्षां पूर्वी गेले. त्यांचा मुलगा परदेशात होता. त्यामुळे त्या त्याच्याकडे सलग राहू शकत नसत. दुसरा मुलगा दक्षिण भारतात राहात असे. त्याची बायको दक्षिण भारतीय होती. ते दोघेही त्यांना त्यांच्याकडे राहायला बोलवत, पण त्यांचे तिकडे फारसे पटत नसे. त्यामुळे त्या एकटय़ाच राहात होत्या. कंटाळल्या होत्या म्हणून सुधाताईंकडे राहायला आल्या. सुधाताईंनी स्वत:ला वेगवगळ्या कामांत गुंतवून घेतलं होतं. त्या अनाथाश्रमात मुलांच्या बरोबर खेळायला, गोष्टी सांगायला जायच्या. बागकाम करायच्या. कधी कधी संपूर्ण दिवस घरी असायच्या, पण नेहमी हसतमुख आनंदी असायच्या. सुमतीताईंना याचे आश्चर्य वाटायचे. सुधाताईंनी एकदा त्यांना सांगितलं होतं, ‘‘मला सतत दु:खात राहायला, दु:ख गोंजारायला आवडत नाही. मला मनापासून आनंदी राहायला आवडतं, मी आनंदी राहाणं पसंत करते आणि त्यासाठी प्रयत्न करते. तू पण प्रयत्न करून बघ.’’

चार दिवसांनी सुमतीताई घरी आल्या. त्यांच्या मनात आलं, ‘‘ताई पण एकटीच राहते पण कधी तिच्या तोंडातून एकटेपणाचा, एकाकीपणाचा उल्लेखही येत नाही. किंवा मधुमेह आहे हेही सांगत फिरत नाही. तिला सकाळी फिरायला जायला कंपनी नसते, पण त्यावरही तिची तक्रार नसते. उलट एकटी चालायला जाते. चालून आल्यावर दुपटीने फ्रेश होते. म्हणजे मी माझं एकटेपण कुरवाळत बसले आहे का? मी स्वत:ला गरीब बिच्चारी असं मानून मी माझीच कीव करते आहे. पण मी एकटीच आहे. यावर उपाय काय? यावर मार्ग तर काढायलाच हवा. मीच माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. एकटीसाठी काय जेवण करायचं म्हणून कंटाळत काही तरी बनवायचे आणि पोटात ढकलायचे. पण आता सगळा स्वयंपाक करत जाईन. इथे ताईसारखी बाग नाही पण बाल्कनीत गुलाब, मोगरा कुंडय़ांतून लावेन.’’

सुमतीताईंनी जरा जास्तीचा स्वयंपाक बनवला. इतर वेळी काही उरलं तरच कामवालीला त्या देत असत. पण आज गरम जेवण त्यांनी तिला दिलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनाही खूप समाधान वाटलं. संध्याकाळी बाजारात जाऊन त्या गुलाब आणि मोगऱ्याची रोपं आणि खत घेऊन आल्या. बाल्कनीतील कुंडय़ांत ती रोपं लावली. रात्री लेकाचा फोन आल्यावर त्याला, ‘कधी येणार? मी इथे एकटी’, असे पाल्हाळ न लावता रोपांविषयी सांगितलं. सुनेशी, नातीशी बोलल्या. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना झोप लागली.

सकाळी उठल्या त्या एकदम ताज्यातवान्या झाल्या होत्या. चहा घेता घेता भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या. ‘मुलं लहान होती. त्यांचे नीट संगोपन व्हायला हवं म्हणून शाळेतील चांगली नोकरी सोडली. दुसरं उत्पन्नाचं साधन म्हणून घरात सगळ्यांच्या वेळा सांभाळून शिकवण्या घेतल्या. नवरा, मुले यांच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवलं. त्यांच्यासाठी झटत राहिल्या. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे म्हणून उच्चशिक्षणासाठी त्यांना परदेशात पाठवलं. खूप पैसा खर्च केला. मुलांनीही त्याचं चीज केलं. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागल्या. मुलांसाठी एवढय़ा खस्ता खाल्ल्या त्यामुळेच मुलं उच्चपदाला पोहोचू शकली. मला घराशिवाय दुसरे विश्वच नव्हतं. आता हेही गेले. मुलांचे संसार फुलत आहेत. ती वेगळी कुटुंबेच तयार झाली आहेत आणि या घरात मी एकटीच राहिले आहे.’ या विचारासरशी त्या परत एकटेपणाच्या कोषात शिरल्या. तेच तेच विचार मनात घोळवत बसल्या. सकाळ सगळी उदास उदास गेली.

दुपारी केतकीचा फोन आला. चार दिवस कसे मस्त गेले सांगत होती. तुझी आठवण येते आहे म्हणून फोन केला म्हणाली. मुले पण बोलली. त्यांनी घरी राहायला यावे म्हणून पाठीस लागली होती. फोन झाल्यावर त्यांना बरं वाटलं. नव्या उत्साहाने त्या फिरायला बाहेर पडल्या.
चालता चालता त्यांच्या मनात विचारांची द्वंद्वे चालू होती. ‘‘ताईकडून शिकण्यासारखं खूप आहे. स्व-मदत ही सर्वोत्तम मदत असते म्हणतात. मीच मला मदत केली पाहिजे. मीच मला समजावून घेतलं पाहिजे. पण मला एकटीला राहायला लागते ही वस्तुस्थिती आहे. मग यात समजून घेण्यासारखं काय आहे? ताई एकटीच आहे, ती तिचं जगणं एन्जॉय करते आहे. मुलांशी, सुनेशी वादविवाद होतात पण ती ते धरून ठेवत नाही. त्यांनी फोन करायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे अशा गोष्टींची अपेक्षाही ठेवत नाही. पण अडचणीच्या वेळी ती सर्व जण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. माझी मुले पण वर्षांतून एकदा तरी सगळे एकत्र येतील हे बघतात. मुलाचं करिअर चांगलं व्हावं म्हणून झटलो, असं म्हणतोय तेव्हा त्यांना जिथे चागली संधी मिळेल तिथे ती जाणार, त्यांचे विचार वेगळे होणार हे मान्य करायला हवं. हे एकटेपण आपणच दूर करायला हवं.’ हा विचार करता करता त्यांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपण आपले समुपदेशक, गुरू, मैत्रीण होऊ शकतो आहोत.
घरी आल्यावर त्यांनी मस्त आंघोळ केली. फ्रेश झाल्या. जेवण झाल्यावर गाणी ऐकता ऐकता शतपावली केली. रात्री पुस्तक वाचता वाचता झोपून गेल्या. त्यांनी स्वत:ला गुंतवून ठेवायला सुरुवात केली. बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना शाळेची परवानगी घेऊन शाळा सुटल्यावर अभ्यासात मदत करू लागल्या. काही मुलं व्रात्य होती. काही तरी कारण सांगून निघून जायची. पण सुमतीताईंचा संयम वाढला होता. मुले पुढे जाऊन काही करतील याची आशाही नव्हती. पण त्या स्वत:ला समजवायच्या की यातील एका जरी मुलाला अभ्यासाची गोडी लागली तरी ठीक आहे. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. पण एक गोष्ट मात्र झाली. त्यांची त्या मुलांबरोबर दोस्ती होऊ लागली होती.

मे महिन्याची सुट्टी लागली. दोन दिवस त्यांना कठीण गेले. परत एकाकीपणा जाणवू लागला. मग सुट्टीत त्या एका ग्रुपबरोबर दक्षिणेकडे ट्रीपला गेल्या. तिथे मुलाकडे चार दिवस राहिल्या. सुनेच्या पद्धतीने स्वयंपाक करायचा प्रयत्न केला. जमलं नाही पण करताना मजा आली.
घरी आल्यावर परत रिकामपण आलं. पण आतापर्यंत त्या स्वत:शी संवाद करायला शिकल्या होत्या. सकारात्मक दृष्टिकोनातून बघायची त्यांनी स्वत:ला सवय लावून घेतली होती. आता कधी तरी काही करायला नसले तरी बिघडत नसे. स्वत:ची कंपनी त्यांना आवडू लागली होती. त्यामुळे एकटी आहे म्हणताना त्याचबरोबर येणारी भीती, काहीतरी गमावत असल्याचं दु:ख, मुलांच्या जीवनातील आपले कमी झालेले स्थान यामुळे येणारी चीड खूप कमी झाली होती.

मनातली द्वंद्वे कमी होत होती. स्वत:बरोबर शांतपणे बसण्यातही त्यांना आनंद मिळे. त्या स्वत:शी म्हणू लागल्या होत्या की, माझा एकाकीपणा संपला आहे आणि माझा एकांताकडे प्रवास सुरू झाला आहे. माझ्या एकांतात मला समाधान, सुख, आनंद मिळतो आहे.
एकदा सकाळी उठल्यावर बाल्कनीचा दरवाजा उघडला तर गुलाब आणि मोगरा दोन्हीही फुलले होते. गुलाबाचा रंग, मोगऱ्याच्या सुगंधाने सुमतीताईंचे मन उल्हसित झाले. फुलांशीच बोलल्या, ‘‘मी एकटी कुठे आहे? तुम्ही आहात की माझ्याबरोबर’’ आणि त्या समाधानाने हसल्या.

– माधवी गोखले
madhavigokhale66@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 1:07 am

Web Title: from solitude to solitude
Next Stories
1 मुलं नाहीत फुलं
2 दिवस तिचे हे फुलायचे
3 विवेकनिष्ठ विचार
Just Now!
X