वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

*  या सदरात ‘एसटीपी’वर लेख प्रसिद्ध झाला आहे (अर्थ वृत्तांत, १० जुलै). ‘एसटीपी’ केली असता कर भरावा लागेल का? तसेच एसटीपीमार्फत केलेल्या गुंतवणुकीवरील नफ्याची टक्केवारी त्या लेखातील कोष्टक क्रमांक-३ मध्ये १९.२१ टक्के दिली आहे. असा कुठला लिक्विड फंड  आहे, जो इतका परतावा देतो? – प्रदीप गुप्ते

– ‘एसटीपी’ हा गुंतवणुकीचा प्रकार नव्हे, तर एक गुंतवणुकीची चांगली पद्धती आहे, हे प्रथम लक्षात घ्यावे. लिक्विड फंडातून इक्विटी फंडात एसटीपीच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा नफा दोन्ही फंडातील गुंतवणुकीवर होत असतो. त्या त्या फंड प्रकारावर लागू करमात्रेनुसार करही भरावा लागतो. लेखात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, लिक्विड फंडाची युनिट्स विकून तितक्या रकमेची इक्विटी फंडाच्या युनिट्सची खरेदी केली जातात. लिक्विड फंडाच्या युनिट्सच्या खरेदी-विक्रीत झालेला नफा हा अल्पमुदतीचा भांडवली नफा (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन) असल्याने त्यावर कर भरावा लागेल.

सदर लेखात उल्लेख केलेल्या व्यवहाराच्या तपशिलानुसार, १ जुलै रोजी १००,००० लिक्विड फंडाच्या रेग्युलर ग्रोथ पर्यायामध्ये गुंतविले. ११ जुलैपासून दररोज १,००० रुपयांप्रमाणे निर्धारित केलेल्या इक्विटी फंडात एसटीपीला सुरुवात केली. एकूण १०१,००० रुपये इतकी रक्कम ११ जुलै २०१६ ते ७ डिसेंबर १०१६ पर्यंत गुंतविण्यात आली. ७ डिसेंबर २०१६ रोजी लिक्विड फंडात शिल्लक राहिलेल्या युनिट्सचे मूल्य ६४९ रु. होते. तर इक्विटी फंडातील गुंतवणूक १०१,००० रुपये होते. ३० जून २०१७ रोजी (एका वर्षांनंतर) लिक्विड फंडात शिल्लक राहिलेली रक्कम आणि इक्विटी फंडात गुंतविलेल्या १०१,०००चे एकत्रित मूल्य ११९,३८१ रुपये होते. म्हणजे वर्षांनंतर या व्यवहारात एकूण १९,३८१ रुपये नफा झाला. या नफ्याची वार्षिक टक्केवारी १९.२१ टक्के आहे. त्यामुळे लिक्विड फंडातील गुंतवणुकीवर १९.२१ टक्के वार्षिक नफा झाला हा निष्कर्ष चुकीचा आहे. १ लाखाच्या लिक्विड फंडातील गुंतवणुकीवर एकूण नफा १,६६९ म्हणजे १.६६ टक्के असून लिक्विड फंडाच्या गुंतवणुकीवर झालेला नफा आणि इक्विटी फंडातील गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची एकत्रित टक्केवारी १९.२१ टक्के आहे.

*  माझे वित्तीय सल्लागार मला ‘एनजे मार्स’च्या माध्यमातून म्युच्युअल फंड गुंतवणूक केल्यास  फायद्याची शक्यता असल्याचे सांगत आहेत. ‘एनजे मार्स’वर कितपत विश्वास ठेवावा?

– डॉ. राधाकृष्ण नाईक, औरंगाबाद</strong>

– देशातील अनेक वितरकांपैकी एक एनजे ही म्युच्युअल फंड वितरक कंपनी  आहे. ‘एनजे मार्स’ हे  ठNJ Mutual Fund Automated Portfolio Rebalancing System चे लघुरूप आहे. ही एक रोबो अ‍ॅडव्हायझरी सेवा आहे. गुंतवणुकीत अनेकदा निर्णय भावनांशी निगडीत असतात. जसे की एखादी खूप नफा मिळवून दिलेली गुंतवणूक विकण्यास मन तयार नसते. परंतु अशा गुंतवणुकीत सुद्धा कधी ना कधी नफा काढून घेणे गरजेचे असते. गुंतवणूकविषयक निर्णय घेताना भावनांना वगळण्याचे काम रोबो अ‍ॅडव्हायझरी सेवा करते. अमेरिकेसारख्या देशांत मानवी श्रमाचे मोल खूप असते. अशा देशात रोबो अ‍ॅडव्हायझरी सेवा किफायतशीर असते. भारतात तसे होत नाही. तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी केलेल्या सल्ला-मसलतीसाठी गुंतवणूक सल्लागाराला फी दिलीत का? असा प्रश्न अनेकांसाठी आजही नवखा आणि अकल्पित आहे. भारतात गुंतवणूकदारांची मानसिकता गुंतवणूक सल्ल्यासाठी शुल्क देण्याची नाही. तुमच्या गरजा ओळखून त्यानुसार सल्ला देणाऱ्या सल्लागाराची तुम्हाला गरज आहे. तुम्ही ‘एनजे मार्स’मधून गुंतवणूक केलीत म्हणून खात्रीपूर्वक नफा होईलच असे नव्हे. गुंतवणुकीवर नफा हा ९० टक्के गुंतवणुकीत योग्य वैविध्य साधण्यावर आणि १० टक्के योग्य साधन निवडण्यावर अवलंबून असतो. तुमच्या भावना व गरज समजणाऱ्या सल्लागाराची निवड करणे योग्य ठरेल.

फंड गुरू