शेअर बाजार श्रीमंत होण्याचा राजमार्ग!
शेअर बाजाराबाबत असुरक्षिततेच्या भीतीपोटीच आपण कमी परतावा देणाऱ्या पण ‘सुरक्षित’ वाटणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करतो आणि स्वत:चे नुकसान करून घेतो. आपण बाजारात भाग घेत नाही कारण आपल्याला त्यातील काही कळत नाही आणि अभ्यास करण्याची, कळून घेण्याची आपली तयारीदेखील नसते.

शेअर बाजाराकडे बघण्याचा सर्वसामान्य मराठी माणसाचा दृष्टिकोन अजूनही बराचसा पूर्वग्रहदूषितच आहे. जर आपण कोणालाही शेअर बाजाराबद्दल मत विचारले तर : ‘शेअर बाजार म्हणजे जुगार’, ‘लाखाचे खाक करायचे असतील तर शेअर बाजारात गुंतवणूक करा’ किंवा ‘ते आपले काम नाही, पैसेवाल्यांचे काम आहे’, ‘कशाला रिस्क घ्या, त्यापेक्षा फिक्स डिपॉझिट बरे, पैसे तरी बुडणार नाहीत’ अशा प्रतिक्रिया मिळतात, म्हणूनच हा लेख.
शेअर बाजार हा खरे तर श्रीमंत होण्याचा राजमार्ग आहे. आपण त्यात भाग घेत नाही कारण आपल्याला त्यातील काही कळत नाही आणि अभ्यास करण्याची, कळून घेण्याची आपली तयारीदेखील नसते.
आज आपण बघू या की शेअर बाजारातदेखील गुंतवणूक करणे का गरजेचे आहे.
arth8
जर आपण शेअर गुंतवणूक न केली तर :
’ निरंतर वाढत जाणारी महागाई तुमचे भांडवल खाऊन टाकेल :
जर आपण दरमहा खर्च वजा वाचविलेले सगळे पैसे बँकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेवींमध्ये (एफडी) ठेवले तर त्यावर आपल्याला ४% अथवा एफडी असेल तर ७-८% व्याज मिळेल. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, महागाई निर्देशांक (inflation Index) देखील सरासरी ७-८% आहे. म्हणजे एफडीतून आपले भांडवल वाढण्याऐवजी ते आहे तितकेच राहील व महागाई दर वाढेल तसे हळूहळू कमी कमी होत जाणार आहे. (तरी येथे व्याजावर भरावा लागणारा कर विचारात घेतलेला नाही.)
वाटतो तेवढा शेअर बाजार भीतीदायक नाही :
ज्याने अर्थशास्त्राचा (finance) कधीही अभ्यास केला नाही त्याच्याचसाठी शेअर बाजार भीतीदायक वाटणे साहजिकच आहे. पण जास्तीत जास्त काय होईल? कधी कधी शेअरच्या किमती कमी होतील, पण जर तुम्ही चांगले शेअर्स दीर्घकाळासाठी घेऊन ठेवलेत तर ते तुम्हाला नक्कीच चांगले पैसे मिळवून देतील. एकच शेअर घेतलात तर तो कदाचित बुडेल, पण वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केलीत (diversified) तर ते तुमचे पूर्ण भागभांडार एकाच वेळी नक्कीच बुडणार नाही. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, भाव कमी असेल तेव्हा शेअर घ्यायचे आणि भाव वाढला की विकायचे. पण जेव्हा बाजार घसरायला लागतो तेव्हा आपल्याला भीती वाटायला लागते आणि मग आपण मिळेल त्या भावात शेअर विकू न टाकतो. आणि या भीतीपोटीच आपण कमी व्याज देणाऱ्या पण सुरक्षित वाटणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करतो आणि स्वत:चे नुकसान करून घेतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करणे फार सोपे आहे!
आजकाल इंटरनेटमुळे शेअरमध्ये गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याची माहिती मिळणे अगदी सोपे झाले आहे. तसेच घरी बसूनदेखील आपण शेअर्स खरेदी-विक्री करू शकतो. आपल्याला शेअर बाजाराची भीती वाटते. कारण आपण/ इतर लोकांनी त्यात पैसे गुंतवले आणि ते पैसे बुडाले हेच आपण ऐकतो. ते का बुडाले, याचा आपण विचार करीत नाही. बऱ्याचदा कोणी तरी टीप दिली म्हणून, ब्रोकरने सांगितले म्हणून किंवा कुठे तरी वाचले म्हणून आपण शेअर्स घेतो. पण पुढे त्याचे काहीच करीत नाही. सांगणारादेखील कधी विका हे सांगत नाही.
ज्यांनी भरपूर पैसे शेअर बाजारात मिळविले आहेत ते कधीही डांगोरा पिटत नाहीत. म्हणून आपल्याला कळत नाही. पण जर आपण अभ्यास करून माहिती मिळवून पैसे गुंतवले तर आपण नक्कीच तोटय़ात जाणार नाही.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने आपण बरेच फायदे मिळवू शकत असलो तरी जर आपण हाव आणि भीती (fear and greed) यावर मात करू शकलो नाही तर मात्र नुकसान होऊ शकते. शेअर बाजारात आपण वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करू शकतो आणि श्रीमंत होऊ शकतो ते कसे हे आपण पुढल्या लेखात बघू.
स्वाती शेवडे – cashevade.swati @gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)