ग्राहकसंख्येत तिसरी मोठी, तर ‘जिओ’नंतर सर्वाधिक ध्वनिलहरी असणारी कंपनी

अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम) आणि मुख्यत: उत्तर भारतात बस्तान असलेली एअरसेल या मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांचे एकत्रीकरण झाले आले असून ग्राहक तसेच महसुली उत्पन्नाच्या रूपात देशातील मोठी कंपनी यातून  उदयास आली आहे. थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसारख्या कडव्या स्पर्धकाचे आव्हान उभे राहिले असताना ‘आर कॉम’ने या व्यवहारामार्फत देशभरात अस्तित्व असलेली सर्वाधिक ध्वनिलहरी असलेली दुसरी कंपनी बनण्याचा मार्गही प्रशस्त केला आहे. एअरसेलच्या विलिनीकरणानंतर एकत्रित १९.४० मोबाईलधारक संख्येमुळे ‘आर कॉम’ने आयडिया सेल्युलरला ग्राहकसंख्येत मागे टाकले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसचा एमटीएस ही नाममुद्रा काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती. आता सिस्टेमा श्याममध्ये हिस्सा असलेल्या मॅक्सिस कम्युनिकेशन्सचीच भागीदारी असणाऱ्या ‘एअरसेल’चीही खरेदी करत अनिल अंबानी यांनी ३५,००० कोटी रुपयांच्या नक्त मालमत्तेची कंपनी निर्माण केली आहे.

आर कॉम व एअरसेल यांची एकत्रित मालमत्तांचे मूल्य आता ६५,००० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे. नव्याने तयार झालेल्या व्यवस्थापन मंडळात उभय कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समान सहभाग असेल.

एअरसेल खरेदीमुळे ४२,५०० कोटी रुपयांहून अधिक कर्जभार असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा काही भार हलका होणार आहे.

मॅक्सिस कम्युनिकेशन्सने २००६ मध्ये एअरसेल खरेदी केली होती. यावेळी ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. भारतातील ही तेव्हाची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक ठरली होती.

 

arth1-1

 

arth1-2