खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या ‘डीबीएस इंडिया’ बँकेतील विलीनीकरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने त्या बँकेवर लागू केलेले निर्बंधही मागे घेतले.

लक्ष्मी विलास बँकेच्या २० लाख ठेवीदारांच्या २० हजार कोटींच्या ठेवी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व आर्थिकदृष्टय़ा सक्षम डीबीएस बँकेत सुरक्षित आहेत. डीबीएस इंडिया बँकेकडे पुरेशी भांडवली क्षमता असून ठेवीदारांनी त्यांच्या पैशांबाबत काळजी करू नये व बँकेतून ते काढून घेण्यासाठी धावाधाव करू नये, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लक्ष्मी विलास बँकेच्या सेवेत चार हजार कर्मचारी आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रस्तावाला बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून तसेच, संघपरिवारातील स्वदेशी जागरण मंचनेही विरोध केला आहे. मात्र केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रस्तावाला दुपारी मंजुरी दिली. लक्ष्मीविलास बँकेची थकीत कर्जे वाढत होती, तसेच बँकेच्या व्यवस्थापनावरही रिझव्‍‌र्ह बँकेची नजर होती.

वर्षभर लक्ष्मीविलास बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्न केले जात होते. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीबरोबरच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेने फेटाळला होता. लक्ष्मीविलास बँकेच्या ठेवीदारांना २५ हजार रुपये खात्यातून काढण्याची मुभा देण्यात आली.

वर्षभरात आर्थिक संकटात सापडलेली लक्ष्मीविलास ही दुसरी खासगी बँक आहे. खासगी क्षेत्रातील आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेला तारण्यासाठी सरकारने भारतीय स्टेट बँकेला ७ हजार २५० कोटी गुंतवणूक करण्यास सांगितले होते.

विलीनीकरण उद्यापासूनच

लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस या मूळच्या सिंगापूर बँकेबरोबरचे विलीनीकरण शुक्रवारपासून, २७ नोव्हेंबरपासून अस्तित्वात येईल.

दक्षिणेतील खासगी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या आठवडय़ात घातलेले निर्बंधही शुक्रवारपासून दूर होतील, असे स्पष्ट करण्यात आले. लक्ष्मी विलास बँक व डीबीएस बँक इंडिया यांच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी दुपारी मंजुरी दिल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने सायंकाळी ही बाब स्पष्ट केली.

लक्ष्मी विलास बँकेच्या देशातील सर्व, ५०० हून अधिक शाखा या डीबीएस बँकेच्या शाखा म्हणून कार्यान्वित होतील. लक्ष्मी विलास बँकेचे खातेदार डीबीएस बँकेच्या शाखांमधूनही व्यवहार करू शकतील.

लक्ष्मी विलास बँकेसाठी यापूर्वीही प्रयत्न करणाऱ्या डीबीएसने २,५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद जाहीर केली आहे.

आर्थिक अनियमिततेपोटी रिझव्‍‌र्ह बँकेने लक्ष्मीविलास बँकेवर महिन्यासाठी निर्बंध लागू करताना तिच्या डीबीएसबरोबरच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात तयार केला होता. बँकेच्या ठेवीदारांना रक्कम काढण्यावर बंधन घालतानाच प्रशासकाचीही नियुक्ती केली होती.