25 September 2020

News Flash

‘बॅक ऑफिस’ यंत्रणा (भाग पहिला)

सुमारे ५५ वर्षांपूर्वीची गोष्ट. लीला ठाकूर ही १० वष्रे वयाची मुलगी प्रथमच कोकणात आली होती आणि ‘म्हशीच्या जवळ गेले की आयते दूध मिळते

| January 24, 2014 07:08 am

सुमारे ५५ वर्षांपूर्वीची गोष्ट. लीला ठाकूर ही १० वष्रे वयाची मुलगी प्रथमच कोकणात आली होती आणि ‘म्हशीच्या जवळ गेले की आयते दूध मिळते आणि नारळाच्या झाडाखाली गेले की नारळ मिळतो’ असे तिचे भाबडेपणाचे बोल तेव्हा ऐकले की हसू यायचे. कारण या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठी पडद्यामागे काय कष्ट पडतात म्हणजे म्हैस आणि झाड यांची निगराणी कशी करावी लागते हे तिला बालसुलभ वयामुळे माहीतच नव्हते. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आता इतके विकसित झाले आहे की देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातील छोटय़ाशा गावात राहणारा माणूस आज तिथे राहूनच डिमॅट खाते उघडू शकतो. याचे कारण म्हणजे ‘बॅक ऑफिस’ यंत्रणा. सर्व बँका तसेच ब्रोकर डीपी याच तंत्राचा वापर करून डिमॅट सेवा देत असतात. ही सर्व यंत्रणा चालते तरी कशी, हे समजून घेणे मजेशीर वाटेल; पण ते तसे कठीणही नाही. अर्थात एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला हे सर्व विचारले तर तो इतके तांत्रिक शब्द वापरून सांगेल की भीक नको पण..
सीडीएसएल असो किंवा एनएसडीएल असो, प्रत्येक डिपॉझिटरीचे जे डीपी असतात त्या डीपीचा संगणक (उदाहरणार्थ) सीडीएसएलच्या मुख्य सव्‍‌र्हरला जोडलेला असतो. त्यामुळे डीपी जे जे काही काम करत असतो म्हणजे डिमॅट खाते उघडणे, इन्स्ट्रक्शन स्लिप पंच करणे वगरे हा सर्व डेटा तात्काळ सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरमध्ये नोंद होत असतो. काही वर्षांपूर्वी बँक ऑफ इंडिया या डीपीने मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई अशा पाच ठिकाणी स्वतंत्र संगणक लावून तिथून डिमॅट सेवा द्यायला सुरुवात केली होती. अर्थात त्यालादेखील मर्यादा होतीच. कारण या पाच ठिकाणाव्यतिरिक्त जर कुणाला डिमॅट खाते उघडायचे असेल तर त्याने काय करावे? सांगलीचा माणूस डिमॅट खाते उघडायला बँकेच्या मुंबई कार्यालयात थोडाच येणार आहे? तर मग सांगली येथे आणखी एक संगणक लावा! अशा प्रकारे देशभरात शेकडो संगणक लावावे लागतील आणि हे तितक्यावरच भागणार नाही. कारण ते सर्व संगणक सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरशी जोडायला लीज लाइन किंवा व्ही-सॅट यंत्रणा लागणार, ज्याचा खर्च प्रचंड असतो. शिवाय प्रत्येक ठिकाणचा डीपी हा स्वतंत्र समजला जाणार. त्यामुळे कंप्लायन्सही वाढतो. यावर तोडगा म्हणजे बॅक ऑफिस प्रणाली. बँक ऑफ इंडियाने हे पाचही डीपी बंद करून टाकले व केवळ एकच डीपी कार्यालय थाटले ते मुंबईत. तिथे एक महाकाय संगणक बसवला जो सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरशी २४ तास जोडलेला आहे. मुंबईत फोर्ट भागात हे डीपी कार्यालय आहे. आता साहजिकच प्रश्न पडेल तो असा की, उदाहरणार्थ कणकवली शाखेतील बचत खाते ग्राहकाला जर डिमॅट खाते उघडायचे असेल तर त्याने काय करायचे? प्रथम एक बाब लक्षात घेऊ की सांप्रत कोअर बँकिंग यंत्रणेद्वारे बँकेच्या सर्व शाखा एकमेकांशी तसेच बँकेच्या मुख्य बँकिंग सव्‍‌र्हरशी जोडल्या गेल्या आहेत. अर्थात यासाठी बँकेचे स्वत:चे नेटवर्क आहे. काही ठिकाणी लीज लाइन्स असतील किंवा काही ठिकाणी व्ही-सॅटच्या छत्र्या! अर्थात या सर्व यंत्रणेतून बँकिंग सेवा पुरवली जाते. डिमॅट हे पूर्णत: वेगळा विषय आहे. वर लिहिले त्याप्रमाणे बँकेच्या फोर्ट येथील डिमॅट कार्यालयात एक संगणक बसवलेला आहे जो सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरशी जोडला आहे. आता कणकवली शाखेत जितके काही संगणक आहेत जे बँकिंगच्या कामासाठी वापरले जातात ते सर्व संगणक डीपी कार्यालयातील उपरोक्त संगणकाला जोडलेले असतात. कसे? सरळ आहे. जे नेटवर्क बँकिंगच्या कामासाठी म्हणजे सर्व शाखांचे संगणक जोडण्यासाठी वापरले जाते त्याच नेटवर्क यंत्रणेत हा मुख्य संगणक (डिमॅटच्या कामासाठीचा) ठेवलेला असतो. त्यामुळेच फक्त कणकवलीच नव्हे तर सर्व शाखांचे संगणक बँकिंगचा सव्‍‌र्हर तसेच डिमॅटचा बॅक ऑफिस सव्‍‌र्हर यांना जोडले गेले आहेत.
आता जेव्हा कणकवली शाखेतील कोणताही संगणक तेथील कर्मचारी सुरू करतो तेव्हा त्याला दोन पर्याय असतात. म्हणजे एकतर बँकिंगच्या सव्‍‌र्हरला जोडले जाणे किंवा डिमॅट बॅक ऑफिसच्या सव्‍‌र्हरला जोडले जाणे. यासाठी दोन वेगवेगळे आयपी अ‍ॅड्रेस असतात, त्यातील कोणताही एक पर्याय तो कर्मचारी निवडणार. उदाहरणार्थ, कुणी ग्राहक डिमॅट खाते उघडायला आला तर योग्य तो फॉर्म भरून घेऊन त्यासोबत केवायसी दस्तावेज घेऊन तो खाते उघडायचा फॉर्म म्हणजे त्यातील तपशील तो कर्मचारी संगणकात नोंदवेल. तात्काळ तो तपशील (डेटा) मुंबईतील डिमॅट बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये जाऊन पडेल. अर्थात हा बॅक ऑफिस सव्‍‌र्हर सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरला जोडलेला नसल्याने डिमॅट खाते क्रमांक निर्माण होणार नाही. त्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल ती करणार अर्थातच मुंबईतील डिमॅट कार्यालयातील अधिकारी. कणकवली शाखेप्रमाणेच इतर कित्येक शाखांमार्फत अशा प्रकारे डिमॅट खाते उघडायचा तपशील (डेटा) बॅक ऑफिस सव्‍‌र्हरमध्ये येऊन पडलेला असतोच. हा सर्व डेटा बॅक ऑफिसमधील अधिकारी एका सीडीवर कॉपी करून घेतात. तिथून तो डेटा सीडीएसएलच्या कायमस्वरूपी जोडलेल्या संगणकावर (ज्याला लाइव्ह सव्‍‌र्हर म्हणतात) कॉपी करून लगेचच सीडीएसएलच्या सव्‍‌र्हरवर अपलोड केला जातो. आता सीडीएसएल डिमॅट खाते क्रमांक निर्माण करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 7:08 am

Web Title: back office system part 1
टॅग Arthsatta,Economy
Next Stories
1 विकास दर भकासच!
2 ‘सेन्सेक्स’चे नवीन शिखर
3 म्युच्युअल फंडांचा भरवसा बँकिंग क्षेत्रावर
Just Now!
X