सहकारी बँकांचेही लवकरच ‘क्रेडिट कार्ड’
रिझव्‍‌र्ह बँकेकडून ‘एटीएम’ नियमातही शिथिलता
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
आगामी काळात काही बडय़ा नागरी सहकारी बँकांनाही त्यांच्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड वितरीत करण्याची मुभा देण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी २०१५-१६ सालच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीतून घेतला. नागरी सहकारी बँकांनी अलीकडे ‘रूपे’ आधारीत डेबीट-कम-एटीएम कार्ड प्रस्तुत केले असले तरी क्रेडिट कार्ड व्यवसायांची त्यांना परवानगी नव्हती. सहकारी बँकांच्या व्याजेत्तर इतर उत्पन्नात भर घालणारा क्रेडिट कार्ड हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्यवसाय स्रोत ठरेल. या शिवाय राज्य सहकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय शाखाबाह्य़ त्रयस्थ ठिकाणी अथवा मोबाईल एटीएम सुरू करण्यासही रिझव्‍‌र्ह बँकेने अनुमती दिली आहे.

सहकारी संस्थांमधील ‘टीडीएस’बाबत लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार
कराड, वार्ताहर
सहकारी संस्थांमधील ठेवींवर ठेवींवर ‘टीडीएस’ सक्ती होऊ नये यासंदर्भातील अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली.
सहकारी संस्थांमधील ठेवींवरील ‘टीडीएस’ रद्द करण्यासाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्नशील आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही आम्हाला भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीमध्ये काही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. ठेवींवर ‘टीडीएस’ रद्द करण्यात यावा यासंदर्भात कॉसमॉस बँकेने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश घेतल्याची माहिती चरेगावकर यांनी सांगितले.
काही सहकारी संस्थांबाबत शेकडो तक्रारी दाखल आहेत. याबाबत चरेगावकर म्हणाले, अशा संस्थांची माहिती आम्ही यापूर्वीच मागवली आहे. कायदेशीर बाबी पडताळून उचित अन् सहकारातील सर्वसामान्य ग्राहकांच्या न्याय हक्काची जपणूक करण्यास सहकार खाते निश्चितच कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. परंतु, शेतकरी संघटनेचा खिशाला बिल्ला लावून सहकारी संस्थांवर तक्रारीचा सूर लावायचा अन् कर्ज बुडवेगिरी करायची असेही प्रकार घडत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

टू जी घोटाळ्यात निरपराधतेचा ए.राजा यांचा दावा
पीटीआय, सालेम
स्पेक्ट्रम घोटाळ्यात लाच घेतल्याचे किंवा गैरप्रकार केल्याचे आपल्यावरील आरोप सिद्ध करण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) अपयशी ठरला आहे, आपण टू जी घोटाळा प्रकरणात निरपराध आहोत, असा दावा माजी दूरसंचारमंत्री ए.राजा यांनी केला आहे.
सुरमंगलम येथे एका जाहीर सभेत त्यांनी सांगितले, की आपण निरपराध आहोत. टू जी घोटाळ्यात आपण गैरप्रकार केल्याचे जे आरोप करण्यात आले आहेत, त्याचा कुठलाही पुरावा नाही.
सीबीआयला आपल्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नाही असे सांगून ते म्हणाले, की या प्रकरणातून आपण सहीसलामत बाहेर पडू. आपण यूपीएच्या काळात दूरसंचारमंत्री म्हणून कार्यभार हाती घेतला, त्या वेळी मोबाइल फोनची संख्या कमी होती पण नंतर ती वाढत गेली. त्या वेळी कॉलचा दर १ रुपया होता. आता तो खूपच कमी झाला आहे.
अद्रमुक सरकार त्यांची निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचे सरकार सत्तेवर येईल असा दावा त्यांनी केला.