फिचकडून भारताला ‘बीबीबी-’ मानांकन
आगामी प्रवासाबाबत ‘स्थिरता’ प्रदान
गुंतवणुकीसाठी कमी दर्जा असलेले ‘बीबीबी-’ मानांकन आघाडीच्या फिच रेटिंग्जने सोमवारी भारताला बहाल केले. त्याचबरोबर देशाचा आगामी पथदर्शक स्थिर असल्याचे नमूद केले. भारताचा आगामी विकास आराखडा हा भक्कम असून देशाबाबत बाह्य़ अर्थव्यवस्था पूरक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. व्यावसायिक वातावरणाबाबत शंका उपस्थित करतानाच विद्यमान पतमानांकन उणे स्थितीत ठेवण्याबाबत मात्र इलाज नसल्याचे पतमानांकन संस्थेने स्पष्ट केले आहे.

भारताचा विकास दर हा निर्यात, राखीव विदेश गंगाजळी यामुळे मध्यम कालावधीसाठी वाढणारा अपेक्षित करताना सरकारच्या डोक्यावरील कर्ज भार तसेच कमकुवत पायाभूत सेवा क्षेत्र तसेच मंद व्यावसायिक वातावरण याकडे दुर्लक्षून चालणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.फिचने दिलेले ‘बीबीबी-’ हे पतमानांकन फार धोकादायक नसले तरी भारताची आर्थिक स्थिती तसेच एकूण वातावरण धक्कादायक स्थितीपेक्षा वरचढ असल्याचेही यामुळे स्पष्ट होत आहे. आगामी कालावधीत देशात विदेशी गुंतवणूक ओघ वाढण्याची अपेक्षा या पतमानांकन सुधाराच्या माध्यमातून केली गेली आहे.

वित्तसंस्थेने देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षांसाठी ७.५ टक्के अंदाजित केला आहे. तर पुढील वित्त वर्षांत तो ८ टक्के असेल, असे म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या विद्यमान आर्थिक वर्षांच्या ७.४ टक्के अंदाजापेक्षा तो किरकोळ अधिक आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५ मध्ये केलेली १.२५ टक्क्य़ांची दर कपात विकास दरात वाढ राखणारी ठरेल, असे नमूद करत पतमानांकन संस्थेने पुढील कालावधीत देशातील बँकांची वित्तस्थिती सुधारेल, असेही म्हटले आहे.आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सरकारने राबविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत फिचने सरकारच्या यापूर्वीच्या थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीचे स्वागत गेले आहे.

‘बीबीबी’ पतमानांकन असलेल्या पूरक व्यवसाय वातावरण क्रमवारीत भारत हा जगभरातील देशांमध्ये १३० व्या स्थानवर पोहोचला आहे. जागतिक बँकेच्या याबाबतच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात देशाचे स्थान चार क्रमांकाने उंचावले होते. तरीही देशाची वित्तीय स्थितीबाबतचे स्थान काहीसे काळजी करण्यासारखे असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. भारतात विकास सुधारणा कशा प्रत्यक्षात येतात यावरून ते अधिक उंचावले जाईल, असेही नमूद करण्यात आले होते.