नैसर्गिक वायूच्या नव्या वाढीव दराला सरकारने मान्यता दिली असून ते सध्याच्या दरापेक्षा जवळपास दुप्पट असतील. त्यामुळे देशात उत्पादन होणाऱ्या इंधनाचा दर येत्या १ एप्रिलपासून प्रतियुनिट ८.२ ते ८.४ डॉलर इतका असेल.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशांतर्गत नैसर्गिक वायू दराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे सूचित केली असून ती देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक वायूसाठी लागू असतील. भारतात आयात करण्यात येणाऱ्या आणि जागतिक पातळीवरील वायूच्या दरांशी ताळमेळ साधणारा सरासरी दर एप्रिलपासून आकारण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०१९ पर्यंत हेच सूत्र कायम राहणार आहे.
नवे दर जागतिक दरांच्या १२ महिन्यांच्या सरासरीवर आधारित असतील आणि ते खासगी म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच ओएनजीसी या कंपन्यांसाठी लागू होतील. ओएनजीसी उत्पादित करणाऱ्या नैसर्गिक वायूसाठीही हेच दर लागू असतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.