सलग नवव्या महिन्यात घसरणीचा क्रम कायम राखत देशाची निर्यात २१.२६ अब्ज डॉलर पातळीवर सरलेल्या ऑगस्टमध्ये येऊन ठेपली आहे. वार्षिक तुलनेत ऑगस्टमधील निर्यात २०.६६ टक्क्य़ांनी घसरली आहे. तथापि या महिन्यात आयात स्थिरावली असली, तरी सणांच्या पाश्र्वभूमीवर सोने आयातीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
जागतिक मंदी आणि प्रमुख जिनसांच्याा घसरत्या किमतीचा फटका भारताच्या निर्यातीला बसल्याचे मानले जात आहे. तर आयातीत आलेल्या किरकोळ ९.९५ टक्के घसरणीमुळे ऑगस्टमधील आयात-निर्यातीतील तफावत म्हणजे व्यापार तूट १२.४७ अब्ज डॉलर राहिली आहे. जुलैच्या तुलनेत (१२.८१ अब्ज डॉलर) ती आणखी खालावली आहे. तर वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०१४ मध्ये तूट १०.६६ अब्ज डॉलर होती.
देशाची निर्यात ऑगस्ट २०१४ मध्ये २६.८० अब्ज डॉलर होती. यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये निर्यातीतील वाढ (७.२७%) नोंदली गेली होती. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यात निर्यात १६.१७, तर आयात ११.६१ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. परिणामी या कालावधीतील तूट ५७.५ अब्ज डॉलर नोंदली गेली.
यंदा पेट्रोलियम पदार्थाची निर्यात ४७.८८ टक्क्य़ांपर्यंत घसरली, तर अभियांत्रिकी (२९ टक्के), चामडे (१२.७८ टक्के), सागरी पदार्थ (२०.८३ टक्के) यामध्येही घसरण नोंदली गेली. कमी झालेल्या आयातीमध्ये तेल (४२.५९ टक्के) आयात कमी होत ७.३५ अब्ज डॉलरवर आली आहे. बिगर तेल आयात मात्र ७.०१ टक्क्य़ांनी वाढून २६.३८ अब्ज डॉलर झाली आहे.

सोने आयात पुन्हा वाढली
सणांचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून ऑगस्टमध्ये मौल्यवान धातूची आयात थेट १४० टक्क्य़ांनी वाढून ती यंदा ४.९५ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या, ऑगस्ट २०१४ च्या तुलनेत (२.०६ अब्ज डॉलर) ती दुपटीहून अधिक आहे. हंगामातील तिमाहीत ३०० ते ४०० टन सोने आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तुलनेत आयातीत ३१ टक्के हिस्सा राखणाऱ्या देशाची तेल आयात यंदा लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

निर्यातीतील ताजी घसरण ही नक्कीच चिंताजनक आहे. या आघाडीवर चालना देण्यासाठी सरकारने आता निर्यात सवलत योजनांची घोषणा करणे अपेक्षित आहे.
एस. सी. रल्हन
अध्यक्ष, फेडरेशन ऑफ एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (फिओ)