चलनकल्लोळामुळे हाती रोख नसलेल्या मुंबईकरांनी मोबाइल पाकिटाची साथ घेतल्याने अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मोबाइल पाकिटांच्या व्यहवरांत १७० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यापैकी पेटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये तब्बल १३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या मोबाइल पाकिटाचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येतही तब्बल १५० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

एटीएमच्या समोर तास-दोन तास उभे राहिल्यानंतर हाती येणारे अडीच हजार रुपये हे महिनाभराच्या खर्चासाठी पुरेसे होत नाही. जर खिशातील पैसे संपले तर पुन्हा काही तास रांगेत उभे राहावे लागेल हे सर्व टाळण्यासाठी स्मार्ट मुंबईकरांनी मोबाइल पाकिटाचा वापर करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर रोख पैसे नाहीत म्हणून व्यवहारा खोळंबून राहू नयेत यासाठी व्यापाऱ्यांनाही मोबाइल पाकिट सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत पेटीएम हे मोबाइल पाकिट वापरणाऱ्यांची संख्या तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. तर केवळ मुंबईत पेटीमद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या १३३ टक्क्यांनी वाढल्याचे पेटीएमच्या उप महाव्यवस्थापक सोनिया धवन यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत पेटीएमद्वारे होणाऱ्या देशभरातील व्यवहारांमध्ये ७०० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही धवन यांनी सांगितले. तर पेटीएमच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रमाणात १००० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढल्याचेही धवन यांनी नमूद केले.

या अ‍ॅपद्वारे आठवडय़ाला तीन व्यवहार करणारा वापरकर्ता आता १८ व्यवहार करू लागल्याचेही त्या म्हणाल्या. पेटीएम हे अ‍ॅप सध्या साडे लाखांपेक्षा जास्त ऑफलाइन व्यापारी वापरत असल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.