नवी दिल्ली : भारताचा आर्थिक वृद्धीदर विद्यमान २०१९-२० सालात सहा टक्क्यांखाली गडगडून, ५.८ टक्क्यांपर्यंत संकोचेल, असा जागतिक पतनिर्धारण संस्था ‘मूडीज्’चा कयास आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेही गेल्या आठवडय़ात, ऑगस्टमध्ये अंदाजलेल्या ६.९ टक्क्यांमध्ये मोठी सुधारणा करीत वृद्धीदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मूडीज्चा सुधारित अंदाज त्यापेक्षाही खालच्या आकडय़ाच्या भाकीताचा आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेतील दृश्यमान मंदीची दखल घेत, मूडीज्ने पूर्वअंदाजित ६.२ टक्क्यांचा वृद्धीदर खालावत नेत चालू वर्षांसाठी तो ५.८ टक्क्यांवर आणला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सुस्पष्ट ताण दिसत असून, रोजगारनिर्मितीच्या आघाडीवरील कमजोर कामगिरीची भर पडून, त्या परिणामी बाजारपेठेतील मागणी कमालीची मंदावली आहे. खासगी क्षेत्रातून खुंटलेल्या गुंतवणुकीचा घटकही या खालावलेल्या अंदाजामागे असल्याचे मूडीज्ने म्हटले आहे.

मंदीसदृशतेला कारक अनेक घटक असून, ते मुख्यत: देशांतर्गत स्थितीशी संलग्न आणि दीर्घावधीसाठी टिकणारे आहेत, असे मूडीज्ने या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. तथापि २०२०-२१ मध्ये ६.६ टक्क्यांपर्यंत वधारेल, तर मध्यम अवधीत ७ टक्क्यांचीही वेस ओलांडेल, असा आशावादही या अहवालात आहे. मात्र पूर्वी व्यक्त केलेल्या ८ टक्के वा त्याहून अधिक दराने सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर राहण्याची शक्यता खूपच धूसर असल्याचा निर्वाळाही अहवालाने दिला आहे.

मूडीज्चा हा ताजा अहवाल येण्यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पतमानांकन व विश्लेषक संस्थांनी भारताच्या आर्थिक वृद्धीदरासंबंधीचे अंदाज तीव्र स्वरूपात खालावत नेले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने तर फेब्रुवारीमधील ७.४ टक्क्यांच्या मूळ भाकितात, तब्बल चारदा सुधारणा करून तो ६.१ टक्क्यांवर आणून ठेवला आहे.

 

बदलती भाकिते..

संस्था                 पूर्वअंदाज (%)      सुधारीत (%)

आशियाई विकास बँक          ७.००         ६.५

ओईसीडी                              ७.२          ५.९

एस अ‍ॅण्ड पी                          ७.१          ६.३

फिच                                     ७.००         ६.६

रिझव्‍‌र्ह बँक                           ६.९           ६.१

मूडीज्                                   ६.२          ५.८