नवी दिल्ली : सरलेल्या जून महिन्यात देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीने दमदार कामगिरी केली आहे. जूनमधील एकूण प्रवासी वाहन विक्रीने दशकातील सर्वोत्तम पातळी गाठत, मागच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल ३७.५४ टक्कय़ांनी वाढ नोंदविली आहे.

वार्षिक तुलनेत यंदाच्या जूनमध्ये लक्षणीयरीत्या वाढणाऱ्या वाहन विक्रीमागे वस्तू व सेवा करप्रणाली उपकारक ठरल्याचे कारण देण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी या अप्रत्यक्ष करांमुळे किमती वाढण्याचे गृहीत धरून खरेदीदारांनी आपला वाहनांबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला होता. परिणामी जून २०१७ मध्ये घटलेल्या वाहन विक्रीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये वाहन विक्री वेगाने वाढल्याचे निरीक्षण वाहननिर्मिती कंपन्यांची संघटना ‘सिआम’ने नोंदविले आहे.

जून २०१७ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री १.९९ लाख झाली होती. यंदा ती २.७३ लाखांवर गेली आहे. गेल्या १० वर्षांतील मासिक विक्रीतील वाढीची ही सर्वाधिक पातळी आहे. यापूर्वीची सर्वाधिक मासिक प्रवासी वाहन विक्री डिसेंबर २००९ मध्ये नोंदविली गेली, त्यावेळी ती तब्बल ५० टक्कय़ांनी वाढली होती.

प्रवासी वाहनांमध्ये यंदा कार विक्री ३४.२१ टक्क्यांनी वाढून वर्षभरापूर्वीच्या १.३७ लाखांवरून १.८३ लाख झाली आहे. तर बहुपयोगी वाहने, कार आणि व्हॅनची विक्री अनुक्रमे ४७.११ टक्के, ३४.२१ टक्के आणि ३५.६४ टक्कय़ांनी वाढली आहे.

चालू वित्त वर्षांच्या एप्रिल ते जून अशा पहिल्या तिमाहीत एकूण प्रवासी वाहन विक्री मागील वर्षांच्या तुलनेत १९.९१ टक्कय़ांनी वधारत ८.७३ लाख झाली आहे. वर्षभरापूर्वी, याच तिमाहीदरम्यान ती ७.२८ लाख होती.

एकटय़ा जून २०१८ मध्ये दुचाकी विक्री २२.२८ टक्कय़ांनी वाढत १८.६ लाख झाली आहे. यामध्ये मोटरसायकल गटाने जून महिन्यात २४.३२ टक्के वाढ नोंदविताना ११.९९ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर स्कूटरची विक्री २०.९६ टक्कय़ांनी वाढून ६.०१ लाख झाली आहे.