31 March 2020

News Flash

पुन्हा जबर विक्रीमारा

सेन्सेक्स ४७० अंशांच्या घसरंगुडीने सात महिन्यांच्या तळात

सेन्सेक्स ४७० अंशांच्या घसरंगुडीने सात महिन्यांच्या तळात

मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचा कठोरतेचा सूर त्यातच निरंतर गळती सुरू असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांकडून वाढलेला समभाग विक्रीचा मारा यातून गुरुवारी भांडवली बाजारात निर्देशांकांमध्ये मोठी गटांगळी दिसून आली. दोन्ही प्रमुख निर्देशांक सव्वा टक्क्यापर्यंत आपटत त्यांच्या गेल्या सात महिन्यांच्या तळात विसावले.

गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्स दिवसअखेर ४७०.४१ अंशांनी खाली येत ३६,१०० च्या काठावर, ३६,०९३.४७ पर्यंत येऊन ठेपला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्सची ६२६ अंशांपर्यंत घसरगुंडी उडाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने  १३५.८५ अंशांची घसरण  दाखवली आणि १०,७०४.८० या पातळीवर त्याने विराम घेतला.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्री  पाव टक्क्यांची सलग दुसरी व्याजदर कपात करून, व्याजाचे दर दोन टक्क्यांवर आणून ठेवले. मात्र त्याचबरोबर यापुढे दरकपात होणार नाही, असा कठोर पवित्र्याचे संकेतही फेडच्या अध्यक्षांनी दिले. याचे विपरीत पडसाद स्थानिक बाजारात उमटले आणि दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर गुरुवारी सुरुवातीपासूनच घसरणपंथाला लागलेले दिसून आले.

खनिज तेलाच्या सावरलेल्या किमती आणि भक्कम डॉलर असे अनुकूल चित्र असूनही विदेशी गुंतवणूकदारांनीही बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या धोरणात सातत्य राखले. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी बुधवार वगळता चालू आठवडय़ात मोठय़ा आपटीचे सत्रही कायम ठेवले आहे. घसरणीच्या तीन व्यवहारांत सेन्सेक्स जवळपास १,२०० अंशांनी खाली आला आहे.

शुक्रवारच्या नियोजित वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीत करांचे दर कमी होण्याची कमी शक्यता तसेच १७ सप्टेंबपर्यंत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन अवघ्या ४.७ टक्क्यांनी वाढल्याच्या चिंतेची छायाही भांडवली बाजारात व्यवहारादरम्यान दिसली. प्रमुख निर्देशांकांची गुरुवारअखेरची पातळी ही सात महिने मागच्या म्हणजे १९ फेब्रुवारी २०१९ च्या पातळीवर फेर धरणारी आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अल्टिको या दिवाळखोर वित्त कंपनीतील स्वारस्यामुळे,  पतमानांकनावर विपरीत परिणाम करणारी असल्याचे मूडीजच्या अहवालातून दर्शविले गेल्यानंतर सेन्सेक्समधील येस बँकेचे समभागमूल्य गुरुवारच्या व्यवहारात तब्बल १५.५२ टक्क्यांपर्यंत गडगडले.

याचबरोबर मुंबई निर्देशांकातील इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्र, ओएनजीसी, वेदांता, बजाज फायनान्स, हीरो मोटोकॉर्प, टीसीएस ३.६६ टक्क्यांपर्यंत घसरले.

टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स मात्र जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, तेल व वायू, बँक, पोलाद, स्थावर मालमत्ता, वाहन, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दूरसंचार निर्देशांकातील वाढ अवघी ०.१७ टक्के राहिली.

अपवादात्मक बाब म्हणजे, प्रमुख निर्देशांकांनी गटांगळी घेतली असताना,  बीएसई मिड कॅप व बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक १.४८ टक्क्यापर्यंत वाढले. आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकातही संमिश्र हालचाल राहिली. तर युरोपीय बाजारात सुरुवातीचे व्यवहार तेजीचा कल दर्शविणारे ठरले.

सिगारेट कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांकडून नफेखोरी

*  भांडवली बाजारात सूचिबद्ध सिगारेट कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफेखोरी केली. ई-सिगारेटवरील सरकारच्या बंदीनिर्णयानंतर बुधवारी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग उसळले होते. गुरुवारी मात्र गुंतवणूकदारांनी त्यांच्या विक्रीचा सपाटा लावला. परिणामी, या समभागांचे मूल्य ३ टक्क्यांपर्यंत आपटले. मात्र गुरुवारी तंबाखू कंपन्यांचे समभाग वाढले.

० गॉडफ्रे फिलिप्स रु. ९०३.१०     -२.८१%

० आयटीसी     रु. २३८.७३     -१.१९%

० गोल्डन टोबॅको रु. ३२.५०      +४.१९%

० व्हीएसटी इंडस्ट्रीज     रु. ३,५६७.५५    +०.२१%

१.६५ लाख कोटींची गुंतवणूक लयाला

मुंबई : बाजारातील विक्रीच्या सपाटय़ातून सेन्सेक्सचा ४७० अंशांनी ऱ्हास झाला, तर मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या मूल्य १,६५,४३७.८१ कोटी रुपयांनी लयाला गेलेले दिसले. बाजारातील १,८२८ समभाग घसरणीत, तर ८८६ समभाग वाढ साधणारे होते.सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांना घसरण फटका बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:43 am

Web Title: sensex drops by 470 points falls to lowest level in over 7th months zws 70
Next Stories
1 ‘ईपीएफ’वर ८.६५ टक्के व्याजदरावर शिक्कामोर्तब
2 ‘जीएसटी परिषदे’ची आज ३७ वी बैठक
3 व्याजदर कपातीचा आणखी एक डोस
Just Now!
X