तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

महाभारतातील अभिमन्यू व गुंतवणूकदार यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहात, तर गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये  प्रवेश कसा करायचा याचे उत्तम ज्ञान असते; पण शेअर्स नफ्यात विकून बाजाराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडताना बहुतांश गुंतवणूकदारांचा मात्र अभिमन्यू होतो. तेव्हा सद्य:स्थितीतील तेजीची परिस्थिती कशी हाताळावी याबाबतच हे विवेचन.

तेजी ही अशी एक सुवर्णसंधी असते की, ज्यातून आपल्याला पूर्वी झालेल्या आर्थिक जखमा आपण भरून काढू शकतो व आपला घाम गाळून, रक्त आटवून जो पसा आपण जोखमीच्या बाजारात गुंतवलेला असतो ते भांडवल आकर्षक परताव्यासह परत मिळवू शकतो.

या स्तंभात पूर्वी शिफारस केलेल्या समभागांचा आधार घेऊन हा मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो.

वरील कंपन्यांचा घसघशीत नफा हा संथ चालणाऱ्या हिंदुजा व्हेंचर, एमएमटीसी, अ‍ॅबान ऑफशोअर, एनएमडीसी या कंपन्यांचे समभाग विकून आपल्या समभाग संचाची पुनर्बाधणी (पोर्टफोलियो रिशफलमेंट) करावी व आपले मुद्दल घसघशीत नफ्यासह आपल्याकडे परत घ्यावे.

सद्य:स्थितीतील तेजीचा फायदा घेण्यासाठी खालील गोष्टी अमलात आणाव्यात-

१) ज्या गुंतवणूकदारांची अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा व अल्प भांडवल आहे त्यांना नफ्यातील समभाग विकल्याशिवाय पुनर्खरेदीसाठी भांडवल उपलब्ध होत नाही. तेव्हा आताची तेजीची परिस्थिती ही अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी समभाग विकण्यासाठी पोषक आहे. त्यासाठी प्रथमत: नवीन समभागांची खरेदी पूर्णत: थांबवावी. (याच अनुषंगाने आज लक्षणीय समभाग सुचविलेला नाही.) नफ्यात असलेला समभागांचे चार तुकडय़ांत (१०० शेअर्सचे २५ च्या चार तुकडय़ांत) विभागणी करून प्रत्येक वाढीव स्तरावर समभागाची विक्री करावी.

२) जे समभाग आताच्या सहज सुंदर तेजीत वाढत नाहीत ते मंदीत वाढणार का? या आत्मचिंतनात्मक प्रश्नाचे उत्तर प्रत्येक गुंतवणूकदारांनी स्वत: द्यावे.

३) सद्य:स्थितीत कंपन्याचा आर्थिक वृद्धी, विकास दर रोडावत आहे, ‘जीडीपी’ची आकडेवारी निराशाजनक आहे. बाजाराचे किंमत/ मिळकत गुणोत्तर (पी/ई रेशो) हा २६ पट आहे. (२००८ व २०१५ चे उच्चांक याचे पी/ई रेशोवर झाले होते). मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना भारतभर मात्र पाऊस सरासरीपेक्षा ६% कमी होत आहे यात अन्नधान्य पिकविणारी राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारत या ठिकाणी पाऊस अपुरा झाला आहे व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेता.

या तेजीचा कणा हा ३१,७००/ ९,९५० आहे. येणाऱ्या दिवसांत निर्देशांक सातत्याने ३२,७००/ १०,१५० च्या वर टिकत असेल तर पहिले वरचे इच्छित उद्दिष्ट ३३,४००/ १०,३५० आणि दुसरे लक्ष्य ३४,०००/ १०,५५० असे असेल. अन्यथा ३१,७००/ ९,९५० या स्तराखाली निर्देशांक सातत्याने टिकल्यास ३१,३००/ ९,७५० आणि नंतर ३१,०००/ ९,५५० असे असेल.

वरील विश्लेषणावरून गुंतवणूकदारांनी कमकुमवत पायावर उभारलेल्या पंचतारांकित इमल्यांमध्ये वास्तव्य करायचे की या तेजीचा पुरेपूर फायदा घेऊन चढय़ा भावातील समभाग टप्प्याटप्प्याने विकून फायदा कमवायचा हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तेजीच्या मोहापायी वरील वास्तवता विसरून भाव आणखी वाढतील या आशेवर राहून मृगजळापाठी धावत राहायचे, हे तातडीने ठरविले पाहिजे. नंतर बाजार कोसळल्यावर या व्यवस्थेला दोष देत बसण्यात काहीच अर्थ नाही!