मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांना रोखे बाजारात थेट गुंतवणूक करून सहभागी होता यावे यासाठी रिझर्व्ह बँकेने आठवडाभरापूर्वी सुरू केलेल्या ‘रिझर्व्ह बँक – थेट किरकोळ गुंतवणूक (रिटेल डिरेक्ट)’ योजनेला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेसाठी केवळ सहा दिवसांत सुमारे ३२,००० गुंतवणूकदारांकडून नोंदणी पूर्ण केली गेली आहे.

या योजनेमुळे गुंतवणूकदारांना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जारी केलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करून खात्रीशीर आणि तुलनेने सुरक्षित परतावा मिळविता येईल. येत्या वर्षात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रोख्यांच्या किमती आणि व्याजदर विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करत असतात. यामुळे येत्या काळात व्याजदरात वाढ झाल्यास रोखे गुंतवणुकीतून सरस परतावा गुंतवणूकदारांना प्राप्त होऊ  शकतो.

गेल्या आठवड्यात १२ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक समावेशकता आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘रिटेल डिरेक्ट’ योजनेची घोषणा केली होती.  योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेकडे सरकारी रोखे खाते नि:शुल्क सुरू करू शकतो. या खात्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सरकारी रोखे, ट्रेझरी बिले, राज्य विकास कर्ज (एसडीएफ) आणि सार्वभौम सुवर्णरोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये सर्वसामान्यांना थेट गुंतवणुकीला परवानगी असणारे जागतिक स्तरावर मूठभर देश असून, तशी सुविधा असणारा भारत हा एकमेव आशियाई देश आहे.

खाते उघडण्याची प्रक्रिया कशी?

रिझर्व्ह बँकेकडून विकसित rbiretaildirect.in या संकेतस्थ़ळाला भेट द्या. त्यांनतर यावर आवश्यक माहिती भरून लॉग इन केल्यांनतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ‘ओटीपी’ प्राप्त होईल. आलेला ओटीपी संकेतस्थळावर नमूद ठिकाणी नोंदल्यानंतर खाते सुरू होईल. गुंतवणूकदार हे सरकारी रोखे खाते नि:शुल्क सुरू करू शकतो. शिवाय हे खाते व्यक्तिगत किंवा एकापेक्षा अधिकांना संयुक्त खातेधारक म्हणून देखील उघडता येऊ  शकते.

  गिल्ट खाते उघडण्यासाठी पात्र होण्यासाठी गुंतवणूकदारांकडे कोणत्याही बँकेचे बचत खाते, पॅन क्रमांक आदि ‘केवायसी’शी संबंधित कोणतेही अधिकृत दस्तऐवज, वैध ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. परदेशी किरकोळ गुंतवणूकदार केवळ परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) नियमांनुसार सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

   या खात्याला वारसदार म्हणून दोन नावे लावण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर, खात्यातील रोखे दुसऱ्याच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ   शकतात.