मुंबई : एकात्मिक वित्तीय सेवा मंच ‘एअरपे’ने, पुढील वर्षांपर्यंत ‘एअरपे व्यापाऱ्यां’ची संख्या देशभरात दहा लाखांहून अधिक वाढवण्याची योजना आखली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यातील जवळपास तीन लाख व्यापारी एकटय़ा महाराष्ट्रातून नोंदविले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.

देशभरात ५,७०० गावे, ५३३ जिल्हे आणि ३७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ग्राहकांपर्यंत विविधांगी बँकिंग आणि औपचारिक वित्तीय सेवा पोहचविणारे दुवा म्हणून ‘एअरपे व्यापारी’ भूमिका बजावतात. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये त्यांचे अस्तित्व असून, मुख्यत: पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर येथे त्यांची बहुसंख्या आहे.

देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य म्हणून एअरपेसाठी हे मोठा विस्तार असलेले राज्य राहिले आहे, असे मागील सात वर्षांपासून कार्यरत वित्तीय सेवा व्यासपीठाचे प्रमुख संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक कुणाल झुनझुनवाला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. विशेषत: करोनाकाळात टाळेबंदी लागू असताना, सुवर्ण ठेव योजना, म्युच्युअल फंडात एसआयपी, त्वरित निधी हस्तांतरण यासारख्या सेवांसाठी या व्यासपीठाची उपयुक्तता लोकांच्या मनावर ठसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात जूनअखेर ९१,५०० ‘एअरपे व्यापारी’ कार्यरत असून, पुढील वर्षभरात ही संख्या तिपटीहून अधिक वाढवून तीन लाखांवर नेली जाईल, असे नियोजन असल्याचे झुनझुनवाला यांनी सांगितले. विक्रेते, दुकानदार व व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले ‘एअरपे व्यापारी’ यातून दरमहा साधारण १५ हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न कमावत असल्याचे ते म्हणाले. एअरपेने ३०० हून अधिक बँका आणि वित्तीय संस्था, विमा कंपन्या, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांबरोबर सामंजस्य निर्माण केले असून, त्यांची उत्पादने व सेवा ‘एअरपे व्यापारी’ लोकांपर्यंत पोहचविणारे दुवा बनतात.