भारतात बँकिंग व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या अनिल धीरुभाई अंबानी समुहातील रिलायन्सने भविष्यातील तयारी म्हणून तिच्या वित्त कंपनीत जपानच्या सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँकेला व्यवसाय भागीदार करून घेतले आहे. जपानमधील ती चौथी मोठी बँक आहे. तर रिलायन्सने यापूर्वीच नव्या बँक परवान्यासाठी अर्ज केला होता.
e09रिलायन्स समुहाची वित्त क्षेत्रातील कंपनी असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. यात सुमिटोमो मित्सुईला व्यावसायिक भागीदार करून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या बँक व्यवसायाबरोबरच अन्य वित्तसंबंधी क्षेत्रातही हिच कंपनी रिलायन्सची भागीदार असेल.
जपानची आघाडीची वित्त संस्था असलेल्या मित्सुई समुहातील सुमिटोमो मित्सुईचा (६८.२ अब्ज डॉलर) रिलायन्स कॅपिटलमध्ये २.७७ टक्के हिस्सा असेल. विद्यमान बाजारभावाप्रमाणे ही रक्कम ३७१ कोटी रुपये आहे. नव्या भागीदारासह रिलायन्स बँक स्थापन करेल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे. भारत आणि जपानमध्ये या क्षेत्रातील कंपनी ताबा आणि विलिनीकरणातही उभय कंपन्यांचे त्या त्या देशात सहकार्य मिळेल, अशी आशा या व्यवहारामुळे करण्यात आली आहे.
रिलायन्स कॅपिटल अंतर्गत विमा व्यवयासात जपानच्याच निप्पॉनचे समुहाला सहकार्य मिळत आहे. जीवन विमा तसेच म्युच्युअल फंड व्यवसायात निप्पॉन २६ टक्के हिस्सा राखून आहे. विमा क्षेत्रातील ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीनंतर निप्पॉन येथेही आपले स्थान अधिक बळकट करेल. त्याचबरोबर निधी व्यवस्थापन क्षेत्रातील (म्युच्युअल फंड) २६ टक्क्य़ांवरील हिस्सा ४९ टक्क्य़ांवर नेण्याचाही निप्पॉनचा मनोदय आहे.
वित्तबरोबरच दूरसंचार, ऊर्जा, पायाभूत सुविधा, माध्यम आदी क्षेत्रात असलेल्या रिलायन्स समुहातील विविध कंपन्यांवर वाढत्या कर्जाचा भार आहे. कर्ज कमी करण्यासाठी वित्त क्षेत्रातील विदेशी कंपनी हिस्सा वाढविण्याच्या प्रयत्नात रिलायन्स आहे.  तर समुहाने गेल्याच आठवडय़ात मनोरंजन क्षेत्रातील चित्रपटगृह व्यवसाय दक्षिणेतील एका कंपनीला विकला होता. देशभरात २५० हून अधिक पडद्यांची नाममुद्रा असलेला ‘बिग सिनेमाज’ हा व्यवसाय दक्षिण भारतातील ‘कार्निवल’ला विकून ७०० कोटी रुपये रिलायन्स कॅपिटलने उभारले. भारतीय चित्रपटगृह क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार होता.

मुकेश यांच्या रिलायन्सचेही जपानी सहकार्य
अनिल यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनेही जपानच्याच मित्सुई ओएसके लाइन्स या मालवाहतूक कंपनीबरोबर गुरुवारी भागीदारी जाहीर करत उत्तर अमेरिकेतून भारतात द्रवरूप इथेन वायू समुद्रमार्गे आणण्याचा मार्ग खुला केला. याबाबत झालेल्या करारानुसार मित्सुई रिलायन्ससाठी या इंधनाची सहा मोठय़ा साठवणूक भांडारगृहांचे चलन करेल. अशा साठवणूक भांडारांची उभारणी आणि त्याची रवानगीही जपानी कंपनीद्वारे रिलायन्सला होईल. सॅमसंगद्वारे तयार करण्यात येणारी अशी भांडारगृहे २०१६ अखेपर्यंत रिलायन्सला देता येतील. १२ कोटी डॉलर प्रति जहाज दराने हे इंधन भारतात येईल. रिलायन्सची प्रति वर्ष १.५ दशलक्ष टन इथेन अमेरिकेतून आपल्या गुजरात येथील प्रकल्पापर्यंत आयात करण्याची योजना आहे.

कोण मित्सुई?
मित्सुई जपानमधील आघाडीचा वित्त समूह आहे. बँक, विमा आदींबरोबरच मालवाहतूक, जहाजबांधणी क्षेत्रांत या समूहाच्या विविध उपकंपन्या कार्यरत आहे. १९०० दरम्यान स्थापन झालेला हा समूह १.८ लाख कोटी डॉलरच्या घरातील असून किरकोळ तसेच घाऊक वित्त सेवा व्यवसाय, भांडवली बाजार, स्थावर मालमत्ता आदी क्षेत्रांतही समूहाचा शिरकाव आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.