२०१५ मधील दुसरी मोठी आपटी नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारंभीच तब्बल दोन टक्क्य़ांची घसरण नोंदविली. अमेरिकेच्या चिंताजनक प्रवासावरील अवलंबित्व सिद्ध करत सेन्सेक्सने २९ हजाराचा तर निफ्टीने ८,९०० चा स्तर सोडला.

सत्रात ६०४ अंश घसरण नोंदवत मुंबई निर्देशांकाने ६ जानेवारीतील पडझडीच्या नजीकचा प्रवास राखला. सेन्सेक्स २०१५ च्या सुरुवातीला ८५४.८६ अंशांनी आपटला आहे. सोमवारच्या सत्रातील मुंबई शेअर बाजाराचा प्रवास २९,३२१.०६ ते २८,७९९.७६ असा राहिला. निफ्टीनेही सोमवारी जवळपास २०० अंश घसरण नोंदविली.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत अपेक्षेपेक्षा आधी व्याजदर वाढविण्याच्या चिंतेचे सावट बाजारात सकाळच्या सत्रापासूनच पसरले. २९ हजारापासून सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसअखेर हा टप्पा सोडता झाला. तर निफ्टीने यापूर्वी ६ जानेवारीलाच २५१ अंश आपटी नोंदविली आहे.
फेब्रुवारीमध्ये जागतिक महासत्तेची रोजगारविषयक आकडेवारीही किमान स्तरावर आली आहे. ५.५ टक्के हा रोजगारविषयक दर मे २००८ पासूनचा किमान आहे. त्यातच अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेमार्फत आता लवकरच व्याजदर कपातीची भीती व्यक्त केली जात आहे. फेडरल रिझव्‍‌र्हचे व्याजदर सध्या शून्याच्या स्तरावरोहेत. ते अधिक उंचावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतात परकी चलन व्यासपीठासह भांडवली बाजारावरही अपेक्षेप्रमाणे जाणवलाच. डॉलरच्या तुलनेत रुपयानेही सप्ताहारंभीच गेल्या दोन महिन्यातील तळ गाठला.
मुंबई शेअर बाजारात बँक, ऊर्जा, भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, पोलाद, तेल व वायू, वाहन असे जवळपास सारेच क्षेत्रीय निर्देशांक घसरले. ते सारे ३ टक्क्य़ांपर्यंत आपटले होते. सेन्सेक्समध्ये केवळ चार समभागच वधारले. इतर सर्व २६ समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, भेल, गेल, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा पॉवर, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, इन्फोसिस पुढे राहिले.
मुंबई शेअर बाजारातील एकूण पाच हजारांहून अधिकपैकी तब्बल १,९०० समभाग घसरले. तर केवळ हजारेक समभागांनाच मूल्य वाढ राखता आली.
अमेरिकेबरोबरच युरोपातील अर्थ अस्वस्थेचे सावट बाजारावर उमटले. युरोपीयन मध्यवर्ती बँक तिची बहुप्रतिक्षित १.१ लाख कोटी युरोची वित्त सहाय्यता लवकरच उपलब्ध करण्याची शक्यता आहे. एकूणच युरो झोनला आर्थिक पाठबळ देऊ करणाऱ्या या निर्णयाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असताना त्याचे भान असलेल्या येथील गुंतवणूकदारांनी बाजारात समभाग विक्रीचे व्यवहार केले. बाजार व्यवहारनांतर अखेर युरोपीय मध्यवर्ती बँकेने सरकारी रोखे खरेदीद्वारे ही भांडवल उभारणी करण्याचा निर्णय अखेर जाहीर केला.
या साऱ्याचा परिणाम प्रमुख चलनांवरही जाणवला. डॉलर गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. तर युरोमध्येही भक्कमता दिसून आली.