भांडवली बाजारातील सुरुवातीची तेजी मोडून काढत दिवसअखेर नफेखोरीचे धोरण गुंतवणूकदारांनी बुधवारी कायम ठेवले. परिणामी सेन्सेक्स ७९.८५ अंशांनी खाली येत २०,८९४.९४ वर स्थिरावताना आठवडय़ाच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३८ अंश घट होत निर्देशांक ६,२१५.१५ पर्यंत घसरला.
नव्या संवताच्या मुहूर्ताच्या सौद्याला ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेल्या भांडवली बाजाराचा लाभ उठवण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी केला. बुधवारच्या सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला असलेली तेजी दिवसअखेर मात्र घसरणीत परिवर्तित झाली. दरम्यान सेन्सेक्सने व्यवहाराला २१ हजाराला स्पर्श केला होता. दिवसभरात २१,००४.५४ पर्यंत तो उंचावला होता.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी चालू खात्यातील तूट कमी करण्याच्या अंदाजाचे बाजारात सुरुवातीला स्वागत झाले. नंतरच्या घसरणीत गृहपयोगी वस्तू, बँक समभागांची जोरदार विक्री झाली. हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स, भारती एअरटेल, टाटा मोटर्स यांनीही घसरणीत उडी घेतली.

  ऊर्जेचा अभाव..!
‘अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. रिझव्र्ह बँकेचे पतधोरणही होऊन गेले आहे. तेव्हा आता बाजारात ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटना तशा कमी आहेत,’ अशा शब्दात शेअर बाजाराच्या आगामी वाटचालीबाबत बोनान्झा पोर्टफोलियोच्या वरिष्ठ विश्लेषक निधी सारस्वत यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

कॉग्निझन्टच्या जिवावर आयटी उदार
टीसीएस    ” २,०९१.७५    २.४३%
इन्फोसिस    ” ३,३०५.९०    १.२५%
विप्रो    ” ४८१.५०    ०.५०%
टेक महिंद्र    ” १,५७२.९५     ३.४१%
शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कॉग्निझन्टच्या आगामी उंचावणाऱ्या महसुलाच्या जोरावर मुंबई शेअर बाजारात मात्र एकूणच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी वाढत्या समभाग मूल्याची झेप घेतली. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत २२ टक्के महसूल वाढ नोंदवत इन्फोसिसला मागे टाकणाऱ्या मूळच्या अमेरिकेतील कॉग्निझन्टने १५.४ टक्के अधिक नफा कमाविला आहे. त्याचा भांडवली बाजारावर परिणाम होताना एकूण माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १.३९ टक्क्यांनी उंचावला. आयटी कंपन्यांची मूल्य उडी ३.४ टक्क्यांपर्यंतची होती. निर्देशांकही वधारणेत अग्रेसर होता.