सोन्यावरील आयात र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचा परिणाम गुरुवारी सोन्याचे दर तसेच दागिने विक्री दालनांची साखळी चालविणाऱ्या कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर झाला. सराफा बाजारात सोन्याचे दर कमालीचे खाली आले. तर दागिने कंपन्यांच्या समभागांचे मूल्य भांडवली बाजार व्यवहारात दुहेरी आकडय़ांच्या टक्केवारीत उंचावले. यामध्ये अनेक समभागांनी तर वर्षभराचा उच्चांकही गाठला.
सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावरील वाढती तूट लक्षात घेत रिझव्‍‌र्ह बँकेने जुलै २०१३ मध्ये सोने आयातीवर र्निबध लादले होते. त्याचबरोबर केंद्र सरकारने वेळोवेळी मौल्यवान धातूवर आयात शुल्कही वधारते ठेवले होते.
केंद्रात भाजपप्रणीत सरकार येताच त्यांच्याकडून व्यापाऱ्यांची मागणी असलेल्या सोने आयातीवरील र्निबध कमी करण्यासह आयात शुल्कही शिथिल होण्याची शक्यता दिसत असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने पुढाकार घेत हा निर्णय जारी केला.
यानुसार, निवडक व्यवहार घराण्यांना, मोठय़ा निर्यातदारांना सोने आयात करण्यास परवानी देण्याचे पाऊल रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी उशिरा उचलले. डॉलरच्या तुलनेत रुपयाही आता सुधारत असल्याचे पाहूनही हा निर्णय घेतला गेल्याचे मानले जाते.
आयात केलेल्या मौल्यवान धातूंपैकी २० टक्के (२०:८० फॉर्मुला) सोने निर्यातीकरिताच राखून ठेवण्याचा यापूर्वीचा रिझव्‍‌र्ह बँकेचा नियम मात्र कायम आहे. मात्र बडय़ा आयातदारांना बँक माध्यमातून सोने निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईत सोने तोळ्यामागे २७,६९०; दहा महिन्यांच्या नीचांक भावाला!
रिझव्‍‌र्ह बँकेकडून आयात र्निबध शिथिल होताच आता मौल्यवान धातूचा पुरवठा भारतीय बाजारपेठेत नियमित होण्याच्या आशेने सोन्याचे दर गुरुवारी मोठय़ा प्रमाणात उतरले. मुंबईच्या सराफ (घाऊक) बाजारात सोने तोळ्यासाठी एकदम ७८० रुपयांनी कमी होत २८ हजाराच्याही खाली २७,६९० रुपयांवर स्थिरावले. सोन्याच्या भावाने गाठलेला हा गत दहा महिन्यांतील नीचांक स्तर आहे. दिल्लीतही सोन्याचा दर १० ग्रॅममागे ८०० रुपयांनी कमी होत २८,५५० रुपयांवर आला. सोन्याची मासिक आयात सरासरी १० ते १५ टनांनी वाढण्याची अटकळ असून, परिणामी सोने दर लवकरच तोळ्यामागे २५ हजार रुपयांवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रुपया प्रति डॉलर ५८.४७; ११ महिन्यांच्या उच्चांकपदाला!
आठवडय़ातील सर्वात मोठी झेप घेत भारतीय चलन पुन्हा एकदा ११ महिन्यांच्या उच्चांकपदी पोहचले. गुरुवारच्या एकाच व्यवहारात रुपया डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी उंचावत ५८.४७ या १७ जून २०१३ नंतरच्या टप्प्याला पोहोचला.  दिवसातील त्याची ०.५१ टक्के झेप ही १५ मेच्या ३९ पैशांच्या समकक्ष ठरली. साधारण वर्षभरापूर्वीच रुपयाचा स्तर ५७.८७ होता. रुपयाचा गुरुवारचा प्रवास ५८.६७ या तेजीसह सुरू झाला. बुधवारी चलन ५८.७७ वर होते. गुरुवारी व्यवहारात ते ५८.४१ पर्यंत झेपावले. त्या आधी सलग दोन व्यवहारात मिळून रुपया १८ पैशांनी कमकुवत बनला होता.