सलग दोन दिवसांतील तेजीला भांडवली बाजारात बुधवारी खीळ बसली. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या सर्वोच्च स्तरापासून माघारी फिरले. सेन्सेक्समध्ये ५२.७६ अंश घसरण होत निर्देशांक २४,८०५.८३ पर्यंत तर १३६० अंश घसरणीसह निफ्टी ७,४०२.२५ पर्यंत खाली आले. कमकुवत जागतिक शेअर बाजारांच्या धर्तीवर येथे माहिती तंत्रज्ञान तसेच तेल व वायू क्षेत्रातील समभागांची विक्री झाली.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदरावर भांडवली बाजारात गेल्या सलग दोन्ही दिवशी तेजी राहिली. असे करताना सेन्सेक्स मंगळवारी २४,८५८.५९ या तर निफ्टी ७,४१५.८५ या ऐतिहासिक टप्प्यांपर्यंत गेले होते. सेन्सेक्सची दोन दिवसांची कमाई ही ६४१.२५ अंशांची राहिली. मुंबई शेअर बाजारातील बुधवारच्या सकाळच्या सत्रातील तेजीमुळे सेन्सेक्स २४,९२५.९० पर्यंत झेपावला होता.
गेल्या जवळपास वर्षभरात मेमध्ये सेवा क्षेत्राची पहिल्यांदा वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर उमटला नाही. तरीदेखील भांडवली वस्तू, बांधकाम तसेच पोलाद क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी काहीसा रस दाखविला. आयटीमध्ये टीसीएस, दूरसंचारमध्ये भारती एअरटेल, बँक क्षेत्रामध्ये एचडीएफसी यांचे समभाग मूल्य घसरणीत आघाडीवर राहिले.
सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरणीत स्थिरावले. तर माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला सर्वाधिक, १.२७ टक्क्यांचा फटका बसला. पाठोपाठ तेल व वायू निर्देशांक १.२६ टक्क्यांसह घसरला. मध्यंतरीच्या तेजीमुळे बांधकाम, भांडवली वस्तू, पोलाद निर्देशांकांची अखेर वधारणेत झाली. हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो, स्टेट बँक हे तेजीतले समभाग राहिले.
रुपयाचा सशक्त प्रवास!
भांडवली बाजारात बुधवारने तेजीला रोखले; तर परकी चलन व्यवहारात रुपयाने मात्र गेल्या चार दिवसांतील घसरण बाजूला सारली. डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी भक्कम होत ५९.३३ पर्यंत पोहोचला. व्यवहारात रुपया ५९.२० पर्यंत उंचावले. गेल्या सलग चार व्यवहारातील स्थानिक चलनाची घसरण ही ४५ पैशांची राहिली आहे.