पीटीआय, नवी दिल्ली : ऑनलाइन शिकवणीतील नवतंत्रज्ञानाधारित कंपनी आणि देशातील सर्वाधिक मूल्यांकन मिळविणारा नवउद्यमी उपक्रम असलेल्या ‘बायजू’ने मार्च २०२३ पर्यंत नफ्यात येण्याचे लक्ष्य राखले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करून वितरण आणि कार्यकारी खर्चात बचत करून नफ्यात येण्याची योजना आखली आहे. यामुळे येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ५ टक्के म्हणजेच सुमारे २,५०० लोकांना कामावरून कमी केले जाणार आहे.
कंपनीने देशासह परदेशात नवीन भागीदारी करून नाममुद्रेबद्दल प्रचार-प्रसारासह, विस्ताराची योजना आखली असून त्याअंतर्गत १०,००० नवीन शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे, अशी माहिती बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी दिली. कंपनीने परदेशात भागीदारी, खर्चात कपात आणि समूहांतर्गत कंपन्यांचे एकत्रीकरण या तीन गोष्टींच्या आधारावर मार्च २०२३ पर्यंत नफ्यात येण्याचे लक्ष्य राखले आहे. मेरिट नेशन, टय़ुटरविस्टा, स्कॉलर आणि हॅश लर्न या उपकंपन्यांचे एकत्रीकरण करण्यात येईल. तर आकाश आणि ग्रेट लर्निग या स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत राहतील, असे गोकुलनाथ यांनी सांगितले.
बायजूने गेल्या महिन्यात विलंबाने जाहीर केलेल्या निकालानुसार, २०२०-२१ या वर्षभरात बायजूचा महसूल एकत्रित आधारावर ३ टक्के घसरून २,४२८ कोटी रुपये झाला आहे. २०१९-२० या आधीच्या वर्षांत तो २,५११ कोटी रुपयांवर होता. तर बायजूने त्या आर्थिक वर्षांत ४,५८८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो २०१९-२० मधील २३१.६९ कोटी रुपयांच्या एकत्रित तोटय़ाच्या तुलनेत जवळपास २० पट अधिक आहे. कंपनीच्या आर्थिक गणितात गफलतीने तोटा निदर्शनास येत आहे. मात्र महसूल मापन पद्धतीतील बदलामुळे तो असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.