‘सीडीएसएल’चे दिमाखदार पदार्पण!

शुक्रवारच्या सूचिबद्धतेतून सीडीएसएलच्या समभागांनी शेअर बाजारात नियमित व्यवहारासाठी प्रवेश केला.

CDSL Shares
सीडीएसएलच्या समभागांनी शेअर बाजारात नियमित व्यवहारासाठी प्रवेश केला.

बाजारात ६८ टक्के अधिमूल्याने दाखल

गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या देशातील दोनपैकी एक रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा  ‘सेन्ट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात सीडीएसएलची शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात ६८ टक्के अधिमूल्याने नोंदणी झाली. गत आठवडय़ात कंपनीने राबविलेल्या प्रारंभिक विक्रीत, एकूण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या समभागांपेक्षा १७०.१६ पट अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळविला. प्रारंभिक विक्रीसाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळविणाऱ्या कंपन्यांच्या पंक्तीतील एक म्हणून सीडीएसएलची इतिहासात नोंद झाली आहे.

शुक्रवारच्या सूचिबद्धतेतून सीडीएसएलच्या समभागांनी शेअर बाजारात नियमित व्यवहारासाठी प्रवेश केला. १४९ रुपये प्रति समभाग या दराने गुंतवणूकदारांना विक्री केल्या गेलेल्या समभागांनी राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाल्याक्षणी २५० रुपयांनी व्यवहारांना सुरुवात केली. पुढे समभागाने २६९.९५ रुपयांचा उच्चांक गाठला. बाजार बंद होताना गुंतवणूकदारांना ६८ टक्के भांडवली नफा देत समभाग २६१.६० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारच्या कामकाजाच्या सत्रात ५ कोटी ३ लाख समभागांचे व्यवहार झाले.

डिसेंबर १९९७ मध्ये व्यवसायास प्रारंभ करणारे सीडीएसएल हे रोखे भांडार डीमॅट खात्यांच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांपैकी बीएसई, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा व कोलकाता स्टॉक एक्स्चेंज यांचे मिळून ३.५१ कोटी समभाग या विक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध केले गेले. ‘सीडीएसएल’ला डिमॅट व्यतिरिक्त लाभांश वाटपाची घोषणा कंपन्यांच्या अन्य कामकाजविषयक सूचना बक्षीस समभाग, समभाग विभाजन इत्यादी गोष्टीं तसेच भागधारकांचे ई-व्होटिंग या सेवा दिल्याबद्दल महसूल मिळतो. इन्शुरन्स डिपॉझिटरी व अ‍ॅकॅडेमिक डिपॉझिटरी या ‘सीडीएसएल’च्या उपकंपन्या असून त्यामार्फत अनुक्रमे विमा योजना व शैक्षणिक पदव्या कागदरहित इलेक्ट्रॉनिक/डीमॅट स्वरूपात जतन केल्या जातात. मागील सहा महिन्यात ‘सीडीएसएल’चा वृद्धीदर १२ टक्के राहिला आहे.

गुंतवणूकदारांचे नशीब फळफळले!

उच्च धनसंपदा बाळगणारे गुंतवणूकदार समभागांचे वाटप होण्यासाठी कर्ज काढून मोठय़ा संख्येने समभाग विक्रीत भरणा करीत असतात. हे कर्ज साधारण ६ ते ७ टक्के दरम्यान ७ दिवसांसाठी उपलब्ध होत असते. कर्जावर गुंतवणूकदाराने भरलेले व्याज व विक्रीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता या समभागाची नोंदणी २४० दरम्यान झाली असती तरच कर्ज काढून अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना नफा झाला असता. २५० च्या पेक्षा अधिक दराने नोंदणी झाली असल्याने कर्ज काढून अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांचे नशीब फळफळले, अशी प्रतिक्रिया बाजारात ऐकायला मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cdsl shares make blockbuster debut in stock exchanges