चालू वित्तवर्षांत सप्टेंबपर्यंत ५.७० लाख कोटींवर

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजेच १ एप्रिल ते २२ सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष करांचे संकलन मागील वर्षांच्या तुलनेत ७४.४ टक्क्यांनी वाढून, ५.७० लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

करोनाच्या छायेने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांना उभारी देण्यासाठी खर्चावर भर दिल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला होता. या पाश्र्वभूमीवर हे सरस कर संकलन केंद्राच्या दृष्टीने मोठा दिलासादायी ठरले आहे.

व्यक्तिगत प्राप्तिकर, कंपनी कर, संपत्ती कर आदींचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष कराचे संकलन ५,७०,५६८ कोटी रुपयांवर पोहोचले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी जाहीर केले. कंपनी करासाठी ३.०२ लाख कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकराचा २.६७ लाख कोटी रुपयांचा दिला गेलेला परतावा जमेस धरून झालेले हे नक्त संकलन असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये करोना महामारीमुळे उद्योगचक्र मंदावल्याने कर महसुलात मोठी घसरण झाली होती. परिणामी त्या आर्थिक वर्षांत नक्त प्रत्यक्ष करापोटी संकलन ३.२७ लाख कोटी रुपयांचे झाले, तर त्या आधीचे आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रत्यक्ष करापोटी ४.४८ कोटींचे कर संकलन झाले होते. त्याही तुलनेत यंदाचे सप्टेंबपर्यंतचे प्रत्यक्ष कराचे संकलन २७ टक्क्यांची वाढले आहे. 

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन ६.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले. जे मागील आर्थिक वर्षांच्या याच कालावधीतील ४.३९ लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत ४७ टक्क्यांची अधिक आहे. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मधील ५.५३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात यंदा १६.७५ टक्के वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षांत अग्रिम कराच्या माध्यमातून २.५३ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. उद्गम कराच्या (टीडीएस) माध्यमातून ३.१९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर महसूल आला आहे.

चालू वर्षांत एकूण कंपनी कराच्या माध्यमातून ३.५८ लाख कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकराच्या माध्यमातून २.८६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर मिळाला आहे. शिवाय स्वयंमूल्यांकनावर आधारित ४१,७३९ कोटी रुपयांचा कर, नियमित मूल्यांकनाच्या माध्यमातून २५,५५८ कोटी रुपयांचा कर, लाभांश वितरण कराच्या माध्यमातून ४,४०६ कोटी आणि इतर किरकोळ करांच्या माध्यमातून १,३८३ कोटी रुपये करदात्यांकडून आले आहेत.