रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच दिसेल, असा विश्वास व्यक्त  केला.
नजीकच्या काळात अर्थवृद्धीला चालना मिळताना दिसेल आणि पाच टक्क्यांखाली स्थिरावलेला विकास दर त्या पल्याड उंचावलेला दिसून येईल, अशी आशा राजन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानानंतर ‘पीटीआय’कडे बोलताना व्यक्त  केली.
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे विकासाला चालना आणि महागाई दरावर नियंत्रण या दोन्ही बाबी परस्परविरोधी नसल्याचा निर्वाळा देताना ते म्हणाले, भारताच्या विकासपथात महागाई हा अडथळा आहे, असे आपण म्हटले आहे.  राजन यांनी येथे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वार्तालापात कोणत्याही राजकीय मुद्दय़ावर वक्तव्य करण्याचे त्यांनी टाळले. १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल येणारच असून, त्यायोगे सर्व काही स्पष्टच होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  तथापि कोणतेही सरकार आले तरी अर्थवृद्धीच्या उभारीसाठी ते सुस्पष्ट धोरण आखेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजन यांच्या स्वाक्षरीची हजार रुपयांची नोट लवकरच!
प्रत्येकी हजार रुपये मूल्याच्या ‘महात्मा गांधी-२००५’ मालिकेतील नव्या चलनी नोटा रिझव्‍‌र्ह बँक लवकरच बाजारात आणणार आहे आणि या नोटांवर नवे गव्हर्नर रघुराम राजन यांची स्वाक्षरी असेल. या नव्या नोटांवर रुपयाचे नवे चिन्ह दोन्ही बाजूंना असेल आणि दोन्ही बाजूला आकडय़ांच्या पट्टीवर इंग्रजी आद्याक्षर ‘एल’ अशी खूण असेल. या नोटांवर छपाई वर्ष २०१४ असे पृष्ठभागावर खालच्या बाजूला असेल. या नव्या नोटेनंतरही यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या हजार रुपयांच्या नोटाही चलनात सुरू राहतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट  केले आहे.