तयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्या वर्षांतील महसुलाच्या निम्म्या मोबदल्यात हा व्यवहार पूर्ण केला आहे.
खरेदीसाठी उत्सुक असलेल्या स्नॅपडिल, फ्युचर ग्रुप, आदित्य बिर्ला समूहावर मात करीत मिंत्राची प्रवर्तक कंपनी फ्लिपकार्टने जबाँगची तिच्या मूळच्या ग्लोबल फॅशन ग्रुपकडून मालकी मिळविली आहे.
फॅशन आणि लाइफस्टाइल हा ई-कॉमर्स मंचावरील महत्त्वपूर्ण व्यवसाय असल्याचे स्पष्ट करीत मिंत्राने जबाँगचा ४७० कोटी रुपयांचा (म्हणजेच सात कोटी डॉलर) व्यवहार झाल्याचे मंगळवारी जाहीर केले. जबाँगच्या रोख स्वरूपातील या व्यवहारामुळे मिंत्राला महिलांच्या तयार वस्त्र-प्रावरण विक्री क्षेत्रात मोठय़ा स्वरूपात शिरकाव करायला मिळाला आहे.
जबाँगच्या ताफ्यात विविध १,५०० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाममुद्रांची तयार वस्त्र-प्रावरणे आहेत. जबाँगच्या मंचावर महिन्याला ४० लाख वापरकर्त्यांची नोंद होते. मिंत्राची फ्लिपकार्टने २०१४ मध्ये २,००० कोटी रुपयांना खरेदी केली होती. मिंत्रा व फ्लिपकार्ट मिळून महिन्याला १.५० कोटी वापरकर्ते आहेत. तर ग्लोबल फॅशन ग्रुपने मार्च २०१६ अखेरच्या वर्षांत १२.६० कोटी युरोचा महसूल मिळविला आहे. पैकी २०१२ ची स्थापना असलेल्या जबाँगचा हिस्सा १३ टक्के आहे.
याबाबतची खरेदी प्रक्रिया मिंत्रा सप्टेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करणार आहे, असे फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक बिनी बंसल यांनी सांगितले. जबाँग नाममुद्रेचे अस्तित्व तूर्त स्वतंत्र राखण्याचे आश्वासनही यानिमित्ताने मिंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांनी दिले आहे.
भारतीय  ई-कॉमर्स बाजारपेठ वार्षिक ५७ टक्के दराने वाढत असल्याचा ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’चा अंदाज आहे. डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१५ दरम्यान ही बाजारपेठ २४,०४६ कोटी रुपयांवरून ३७,६८९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०१६ अखेपर्यंत ती ७२,६३९ कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

जबाँगच्या खरेदीसाठी  स्नॅपडिल, फ्युचर ग्रुप, आदित्य बिर्ला समूह आणि अलिबाबा या कंपन्याही प्रयत्नशील होत्या.
विविध १,५०० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय  तयार वस्त्र-प्रावरणाचे ब्रॅण्ड्स असलेल्या  जबाँगच्या  संकेतस्थळावर महिन्याला ४० लाख वापरकर्त्यांची वर्दळ आहे. गत वर्षी अ‍ॅमेझॉनने जबाँगच्या अधिग्रहण अंतिम टप्प्यात असताना मागे घेतले.