रिझव्‍‌र्ह बँकेने सोने आयातीवरील र्निबधांमध्ये काहीशी शिथिलता आणल्याचे स्वागत करताना, जवाहिर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए)’ने या परिणामी देशातील सोने आयात वाढत जाऊन आणि रत्न व आभूषण उद्योगाला गतवैभव प्राप्त होण्याचा विश्वास व्यक्त केला.
भारतात सोने आयातीला पुन्हा गती मिळेल आणि यंदा पाऊस चांगला राहिला तर ऑगस्टपासून मासिक ७०-८० टनांवर आयात जाईल, असा ‘आयबीजेए’चे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी कयास व्यक्त केला. देशात ज्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात विदेशातून भांडवल येत आहे, ते पाहता रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी लादण्यात आलेले हे र्निबध रिझव्‍‌र्ह बँकेने ढिले करणे क्रमप्राप्तच होते, असेही त्यांनी सांगितले. किंबहुना रुपयाचे मूल्य अतिरिक्त वधारत असून ते देशाच्या सोने निर्यातीलाही बाधा आणत आहेत, याकडे कम्बोज यांनी लक्ष वेधले.
अर्थात केंद्रातील नवीन सरकारने आभूषण उद्योगाच्या या समस्येकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे यासाठी असोसिएशनचे शिष्टमंडळ भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांना भेटले होते, असेही त्यांनी सांगितले. तथापि रिझव्‍‌र्ह बँकेने परराष्ट्र व्यापार संचालनालयाने मान्यता दिलेल्या व्यापारगृहे आणि तारांकित निर्यातगृहांना सोने आयात खुली केल्याने, जवाहिरांना सोन्याचा पुरवठा वाढेल आणि सराफ बाजारात सोन्याच्या किमतीही खालावतील, अशा परिणामांची शक्यताही कम्बोज यांनी वर्तविली. त्यातून दिवाळीच्या आधी सोन्याने तोळ्यामागे २३ हजार ते २४ हजारांपर्यंतचा भाव दाखविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सोन्यावरील आयात शुल्क जे सध्या १० टक्क्य़ांच्या पातळीवर आहे, ते पूर्ववत दोन टक्क्य़ांवर आणावे, रत्न व आभूषण क्षेत्रात बँकांकडून वित्तसहाय्य घेतलेल्या सध्या कर्ज थकलेल्या व्यापाऱ्यांना कर्जफेड शक्य व्हावी यासाठी विशेष तरतूद म्हणून ठरावीक मुदत दिली जावी, अशा आपल्या मागण्यांकडे नवीन मोदी सरकार सहानुभूतीने पाहिल, अशी आशा कम्बोज यांनी व्यक्त केली. बँकांकडून रत्न व आभूषण क्षेत्राला तब्बल अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले असून, गेल्या वर्षभरात पैकी सुमारे ३७,००० कोटींचे कर्ज थकीत असल्याचा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
सुकाळाचे वेध!
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याची आयात घसरल्यानंतर गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे आपला मोर्चा वळविला. आता तर रुपयातील भक्कमताही सोन्याच्या भावांवर परिणाम करताना दिसत आहे. सोन्यावरील आयात र्निबध हटविल्याने बँकाही आता सोने आयात करतील. गोदाम साठय़ाच्या रूपात सोने आता आयात करता येईल. सोन्याच्या रूपातील कर्जे पुन्हा सुरू होतील. नव्या निर्णयामुळे स्पर्धात्मक पुरवठय़ामध्ये वाढ होऊन अवास्तव अधिमूल्य देण्याची गरज आता राहणार नाही.
अमित मोडक,  कमॉडिटीतज्ज्ञ, पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स

सोन्यावरील आयात र्निबध रिझव्‍‌र्ह बँकेने शिथिल केल्यानंतर भारतातील मौल्यवान धातूंची अधिकृत आयात वाढू शकेल. २०:८० ही योजना सध्या काही प्रमाणात असली, तरी ती पूर्णत: रद्द करण्याची गरज आहे. स्थानिक दागिने निर्मात्यांना नामनिर्देशित बँकांकडून सोने तारण कर्ज देण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा निर्णयही दागिने निर्मात्यांच्या खर्चावरील भार काहीसा हलका करेल.
पी. आर. सोमसुंदरम, व्यवस्थापकीय संचालक, जागतिक सुवर्ण परिषद (भारत)