सलग चार दिवसातील वधारणेनंतर घसरलेला भांडवली बाजार सप्ताहअखेर पुन्हा स्थिरावला. सेन्सेक्स शुक्रवारी १६४.११ अंशवाढीसह २०,७००.७५ या आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४ अंश वधारणेसह ६,१५५.४५ पर्यंत गेला.
चालू आठवडय़ात चार सत्रातील वाढीनंतर गुरुवारी प्रथमच मुंबई निर्देशांक घसरला होता. चीन, अमेरिका देशातील अर्थ घडामोडींच्या छायेत यावेळी त्यात १८६ अंश घसरण झाली. या आठवडय़ातील शेवटच्या दिवसाचे व्यवहार मात्र तेजीत होते. भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, बँक क्षेत्रातील समभागांना मागणी होती. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी २१ समभाग वधारले. अ‍ॅक्सिस बँक, एल अ‍ॅण्ड टी, आयटीसी, टाटा स्टील हे मूल्य वधारणेत आघाडीवर राहिले, तर घसरलेल्या नऊ समभागांमध्ये भारती एअरटेल सर्वात पुढे होता. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँकेच्या समभागांमध्ये १.५ टक्क्यापर्यंत घट नोंदली गेली.
सप्ताहात सेन्सेक्सने ३३३ अंश भर राखली आहे, तर गेल्या चारही सप्ताहातील पहिली सप्ताह तेजी मुंबई निर्देशांकाने नोंदविली आहे.