जागतिक वाहन मेळा आणि अबकारी करातील कपात याचा किरकोळ लाभ देशाच्या वाहन उद्योगाच्या पदरात पडला आहे. देशातील प्रवासी वाहनांची विक्री सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच वधारताना सरलेल्या फेब्रुवारीत १.३ टक्के वाढली आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ या वाहन उत्पादक संघटनेने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वाणिज्य वापराची वाहने सोडता इतर सर्व प्रकारातील वाहनांनी फेब्रुवारीमध्ये किरकोळ विक्रीत वाढ नोंदविली आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नोएडा येथील आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शनात अनेक कंपन्यांनी त्यांची नवीन विविध वाहने सादर केली होती. यानंतर पंधरवडय़ाने सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील अबकारी कर मोठय़ा प्रमाणात कमी करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात प्रवासी वाहन विक्री १.३ टक्क्यांनी वाढून १,६०,७१८ तर दुचाकी विक्री ९.६९ टक्क्यांनी उंचावून १२,२०,०१२ झाली आहे. व्यापारी वाहने मात्र तब्बल २९.८४ टक्क्यांनी घसरली आहेत. यंदा एकूण वाहनविक्री ५ टक्क्यांपर्यंत, १५,२३,६९३ पर्यंत वाढली आहे.
चालू आर्थिक वर्षांतील ११ महिन्यांतील विक्री मात्र ४.६ टक्क्यांनी घसरली असल्याने एकूण वर्ष नकारात्मकतेची नोंद करेल, अशी नाराजी संघटनेचे महासंचालक विष्णू माथूर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रात येऊ पाहणारे नवे सरकार आणि त्यांच्या धोरणांबाबत आशावाद निर्माण केला आहे.