तुमच्या आयुष्यात तुमची काही स्वप्नं असतील तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने छोटी छोटी पावले उचलावी लागतात. स्वप्नपूर्तीच्या या मार्गावर चालताना आपल्या विविध गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासंबंधीचा विचारही आपल्याला करावा लागतो. कारण आपल्या सर्वाच्या गरजा, उद्दिष्टे ही वेगवेगळी असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला लागू होणारे वित्तीय नियोजन तुम्हालाही लागू होईलच असे नसते. त्यामुळे तुम्ही तुमची वित्तीय उद्दिष्टे निश्चित करून स्वत:चे वित्तीय नियोजन करणे कधीही चांगले! तुम्ही तुमच्या आप्तजणांनी केलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याऐवजी तुम्हाला गरजेच्या असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. तुमच्या वित्तीय नियोजनाला योग्य ठरतील अशा ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी)मध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करा.
मार्ग एसआयपीचा
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मोठी रक्कम उभी करण्यासाठी एसआयपी हे एक उत्तम आणि लोकप्रिय माध्यम आहे. जर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार केला आणि गुंतवणूक करण्याची वेळ चुकली तर मोठा तोटा होण्याची शक्यता असते. तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य घटू शकते. तुम्ही प्रतीक्षा करण्याची खेळी खेळण्याचा विचार करत असाल तर तशी संधी तुम्हाला मिळेलच याचीही खात्री नसते. शेअर बाजारातील दररोजच्या चढ-उतारावर मात करण्यासाठी एसआयपी हे माध्यम तुम्हाला संधी उपलब्ध करून देते. तुम्हाला तुमची छोटी रक्कमही यात गुंतवता येते. तसेच यामुळे परतावाही चांगला मिळतो.
एसआयपीत योग्य रक्कम गुंतवा
भारतात दररोज महागाई वाढतच आहे. वित्तीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निश्चित रक्कम बाजूला ठेवल्यानंतर करावी लागणारी काटकसर ही भारतीय कुटुंबांतील व्यक्तींसाठी नेहमीचीच झालेली आहे. त्यामुळे एक निश्चित रक्कम नियमितपणे गुंतवणूक करण्याची पद्धत परिणामकारक आहे. त्यातून तुमच्या भविष्यातील वित्तीय उद्दिष्टे पूर्ण करता येते. किती रक्कम नियमित गुंतवायची हे ठरवण्याअगोदर तुम्ही तुम्हाला एकूण किती रक्कम हवी आहे हे निश्चित करा, त्यानुसार तुम्हाला नियमित गुंतवायची रक्कम ठरवावी लागेल.
फंडातील ही गुंतवणूक येत्या काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी असते. त्याचा विचार करून आपल्याला महागाईवर मात करून परतावा मिळणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जर तुमच्या पाल्याच्या लग्नासाठी ही गुंतवणूक करत असाल तर आजचा तो खर्च साधारणत: १० लाखांवरून ७ टक्के महागाई दराने येत्या दहा वर्षांत १० लाखांवर जाईल. त्यामुळेच समजा तुमच्या गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा मिळणार असेल तर दर महिन्याला एसआयपीद्वारे ४००० रुपये गुंतवणूक करावी लागेल. एसआयपीची रक्कम निश्चित करताना तुमच्या वित्तीय उद्दिष्टांचा विचार करण्यासह तुम्हाला महागाईच्या वाढत्या दराचाही विचार करावा लागतो.
हेही लक्षात असू द्या
योग्य एसआयपी रक्कम ठरवताना आपण कशासाठी गुंतवणूक करत आहोत, हा प्रश्न स्वत:ला विचारा. कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नांची जाण असेल आणि ती पूर्ण करण्याचे ध्येय असेल तरच ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) मध्ये गुंतवण्यात अर्थ आहे. हे सर्व निश्चित करण्यासाठी तुम्ही ‘एसआयपी कॅल्क्युलेटर’चा वापर करू शकता. तसेच वित्तीय सल्लागाराचीही भेट घेऊ शकता.
(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2014 रोजी प्रकाशित
मोठय़ा स्वप्नपूर्तीसाठी छोटी पावले..
तुमच्या आयुष्यात तुमची काही स्वप्नं असतील तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेने छोटी छोटी पावले उचलावी लागतात. स्वप्नपूर्तीच्या या मार्गावर चालताना आपल्या विविध गरजा आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासंबंधीचा विचारही आपल्याला करावा लागतो.

First published on: 23-09-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instead of investing in a mutual fund invest in sip plans