मुंबई : बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) प्रारंभिक समभाग विक्री नववर्षांत जानेवारी-मार्चदरम्यान म्हणजे विद्यमान आर्थिक वर्षांतच होणे अपेक्षित आहे. एलआयसीने या भागविक्रीच्या माध्यमातून पॉलिसीधारकांना तिचे भागधारक बनण्याची संधी देऊ केली असून, त्यांच्यासाठी १० टक्के समभाग राखीव ठेवण्याचे प्रस्तावित केले आहेत. यामुळे या राखीव भागातून समभाग मिळविण्यासाठी एलआयसीला ‘पॅन’चा तपशील  पॉलिसीधारकांना द्यावा लागेल.

एलआयसीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक निवेदनात, राखीव हिश्शातून समभाग मिळविण्यासाठी पॉलिसीधारकांना त्यांचे प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक – पॅन तपशील नोंदविण्याचे आवाहन केले आहे. लवकरच या संबंधाने पॉलिसीधारकांमध्ये जागृतीसाठी जाहिरात मोहीमही तिच्याकडून सुरू केली जाणार आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एलआयसीची प्रारंभिक भागविक्री प्रस्तावित केली. आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण करून, जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान ही भागविक्री भांडवली बाजारात आणण्याचे अर्थमंत्रालयाचे नियोजन आहे. या माध्यमातून, एलआयसीतील सरकारी हिश्शाची आंशिक विक्री करून जवळपास एक लाख कोटींची सरकारच्या तिजोरीत भर पडेल. चालू आर्थिक वर्षांत र्निगुतवणुकीद्वारे १.७५ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची केंद्राची योजना आहे.

वैध डिमॅट खाते आवश्यकच!

पॉलिसीधारक असले तरी समभागांची मालकी मिळविण्यासाठी त्यांच्याकडे वैध डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते सध्या नसल्यास पॉलिसीधारकांनी ते स्व-खर्चाने लवकरात लवकर उघडावे, असे आवाहनही तिने केले आहे.

नोंदणी कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलआयसीचे संकेतस्थळ https://licindia.in/Home/Online-PAN-Registration वर जाऊन, ‘पॅन’ नोंदविण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि प्राप्त ‘ओटीपी’ पॉलिसीधारकांना नमूद करावा लागेल. त्यायोगे पॉलिसीधारकांकडे असणाऱ्या पॉलिसी आणि पॅन यांची स्थिती अद्ययावत केली जाऊ शकेल.