पतधोरणातून रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे व्याजदर वाढ होवो अथवा न होवो तुमच्याआमच्या घर, वाहनांवरील कर्ज अधिक महाग होण्याचा क्षण समीप येऊन ठेपला आहे. डॉलरच्या तुलनेत वधारणाऱ्या रुपयामुळे सरकारी रोख्यांवरील ९ टक्क्यांच्या पुढे गेलेल्या परताव्याने हा परिणाम साधला आहे.
अमेरिकन चलनापुढे दोनच सत्रांत ६२ वरून थेट ६४ असा नवा सार्वकालिक तळ गाठणाऱ्या रुपयामुळे सरकारी रोख्यांवर दिले जाणारे व्याजही ९ टक्क्यांपुढे गेले आहे. मंगळवारी चलनाने व्यवहाराच्या दशकातील सर्वात मोठी आपटी नोंदविली असतानाच रोख्यांवरील व्याज परतावाही गेल्या पाच वर्षांत सर्वात मोठय़ा टप्प्याला पोहोचले आहेत.
सामान्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँका या सरकारी रोख्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. १० वर्षे मुदतीच्या या रोख्यांसाठी त्यांना आता ९.५० टक्क्यांपर्यंत व्याज मोजावे लागणार आहे. अर्थातच हा भार बँकांच्या ग्राहकांवर (कर्जदारांवर) येणार आहे. अनेक बँकांनी त्यांचे आधार दर यापूर्वीच वाढविले आहेत. त्यामुळे अशा बँकांकडून घेतले जाणारे तरत्या व्याजदरावरील (फ्लोटिंग रेट) कर्ज अधिक महाग होत जाणार आहेत.
निधीची चणचण दूर करण्यासाठी (कर्नाटका, कॅनरा, आयसीआयसीआयसारख्या) अनेक बँकांनी त्यांच्या ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहेत. मात्र अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र, एचडीएफसी बँक, आंध्रा बँक अशा अनेक बँकांनी बरोबरीने कर्ज व्याजदरही वाढविले आहेत.
राष्ट्रीयीकृत ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एल. बन्सल यांनीही एका वृत्तवाहिनीजवळ रोख्यांवरील कर्ज व्याज वाढणे ही चांगली बाब नसल्याचे नमूद करून त्याचा परिणाम बँकांवर होऊन परिणामी कर्ज व्याजदर वाढविण्यावर होऊ शकतो, असे म्हटले आहे.