‘थेट लाभ हस्तांतरण’ योजनेंत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्य़ांतही १ जानेवारी २०१५ पासून आधार संलग्न बँक खात्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठीची अनुदानित रक्कम जमा होणार आहे. राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचे जवळपास १.८५ कोटी ग्राहक आहेत. पैकी सुमारे ८३ लाखांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर २०१३ पासून सहभागी ग्राहकांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसेल.

काय करावे लागेल?
आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे लागेल. त्याचबरोबर एलपीजी ग्राहक क्रमांकही द्यावा लागेल. आधार क्रमांक नसल्यास लाभार्थीला १७ आकडी एलपीजी क्रमांक खाते असलेल्या बँकेत अद्ययावत करावा लागेल. बँक खात्याची माहितीही आपल्या गॅस सिलिंडर विक्रेत्याला द्यावी लागेल.

लाभ कसा मिळेल?
योजना सुरू होताच ग्राहकाला आवश्यक प्रक्रिया पार पाडून त्यात सहभागी होता येईल. यानंतर एका सिलिंडरसाठी नोंदणी केल्यानंतर ५६८ रुपये अग्रिम रक्कम दिलेल्या बँक खात्यात जमा होईल. ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने मिळेल आणि अनुदान रक्कमच जमा होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहभाग न मिळाल्सास काय?
३१ मार्च २०१५ पर्यंत या योजनेत सहभाग न मिळवू शकलेल्या गॅस सिलिंडर ग्राहकांना सध्या मिळते त्याप्रमाणे सवलत दरात सिलिंडर मिळेल. त्यांची अनुदानित रक्कम ही गॅस वितरक कंपन्यांकडेच असेल. तीन महिन्यांत या योजनेचा लाभ घेतल्यास ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल. मात्र १ जुलै २०१५ नंतर या योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्राहकांना बाजारभावाप्रमाणेच सिलिंडर मिळेल व नंतरही अनुदान रक्कम त्यांना मिळणार नाही. त्यामुळे ३० जून २०१५ पर्यंत या योजनेत सहभागी होणे आवश्यक ठरणार आहे.