आजवर कर नंदनवन असलेल्या मॉरिशसमार्फत होणाऱ्या गुंतवणुकीतील लाभावर कर लादण्याच्या नव्या कराराने भांडवली बाजारात अत्यंत सावध पडसाद उमटले. प्रारंभी मोठय़ा घसरणीची प्रतिक्रिया दाखविणारा बाजार लवकरच सावरल्याचेही आढळून आले. तथापि एप्रिल २०१७ पासून ‘गार’च्या अंमलबजावणीचे येथील सरकारचे संकेतही बाजाराच्या दृष्टीने नकारार्थी ठरले.
दिवसअखेर १७५.५१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,५९७.०२ पर्यंत खाली आला, तर ३८.९५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८४८.८५ वर स्थिरावला.
मॉरिशस मार्फत होणाऱ्या बाजारातील समभाग उलाढीलद्वारे नफा सध्या करमुक्त आहे. मात्र एप्रिल २०१७ पासून अशा भांडवली लाभावर कर येणार आहे. यामुळे बुधवारी भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली. परिणामी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात अधिक घसरण नोंदली गेली.
मंगळवारच्या घसरणीनंतर बुधवारच्या सत्राची सुरुवातही काहीशा नरमाईने झाली. सेन्सेक्स या वेळी २५,५४८.९७ वर होता. सत्रात त्याने २५,५००चा स्तरही सोडला. व्यवहारात तो २५,४०९.२४ पर्यंत घसरला.
आधीच्या तीन व्यवहारांत सेन्सेक्सने तब्बल ५४४ अंशांची वाढ नोंदविली होती. युरोपीय बाजारातील घसरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरातील उतारही बाजाराच्या घसरणीवर परिणाम करणारे ठरले.
केवळ ७.५ टक्के दराने कर भरावा लागेल या एकमेव कारणाने तुम्ही फायदा देणारी गुंतवणूक टाळणे शक्य आहे काय? माझ्या मते, कर-दायित्वाचे प्रमाण जोवर वाजवी स्तरावर आहे, तोवर त्याचा गुंतवणुकीवर परिणाम दिसून येणार नाही. जेथे संधी दिसेल, तेथे गुंतवणूकदार आकर्षित होणारच. अमेरिकेत करवसुली केली जात नाही काय? म्हणून मग तेथील बाजार तेजी लुप्त झाली काय? जगभरात सर्वत्रच देशी-विदेशी गुंतवणूकदारांना करांसंबंधी समान पातळीवर आणण्याची रीत सुरू झाली आहे.
’ राकेश झुनझुनवाला, अग्रणी गुंतवणूकदार