बँकांच्या धनादेश वटविण्यासाठीच्या सेवा शाखांच्या कर्मचाऱ्यांकडून सुटीच्या मागण्यासाठी टाकण्यात आलेल्या दोन दिवसांपूर्वीच्या कामकाज बहिष्कारानंतर अद्यापही अनेक सार्वजनिक बँकांतील धनादेश वटणावळ पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. बँक शाखातील कर्मचाऱ्यांप्रमाणे या सेवा शाखांनाही सार्वजनिक सुटी देण्याच्या मागण्यासाठी चालू वर्षांतील उर्वरित सुट्टय़ांच्या दिवशीही असेच आंदोलन होण्याची शक्यता आहे.
सुटीच्या दिवशी बँकांच्या शाखा बंद असल्या तरी धनादेश वटणावळीसाठी असलेल्या प्रत्येक बँकेच्या सेवा शाखा मात्र वर्षांतील ३६५ दिवस सुरू असतात. या प्रत्येक शाखेमध्ये एका अधिकाऱ्यासह काही कर्मचारी असतात. संबंधित बँक शाखेला सुटी असली तरी या सेवा शाखेचे कामकाज तीन पाळ्यांमध्ये चालते. या कर्मचाऱ्यांनाही अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्टय़ा असाव्यात, अशी मागणी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटना व्यासपीठाने बँक व्यवस्थापनांचे नेतृत्व करणाऱ्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’कडे पत्र लिहून केली होती.
आपल्या मागणीसाठी संघटनेने १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आणि ईद-ए-मिलादनिमित्त असलेल्या सुटीच्या दिवशी धनादेश वटणावळीच्या सेवा शाखांमधील व्यवहारांवर बहिष्कार टाकला होता. या घटनेला आता दोन दिवस उलटूनही अनेक सार्वजनिक बँकांमधील शनिवारी जमा करण्यात आलेले धनादेश अद्याप वटलेले नाहीत, असे चित्र आहे. हे सारे सुरळीत होण्यासाठी शनिवारअखेर उजाडेल, असेही बँकांच्या काही शाखांमार्फत सांगितले गेले. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, कॅनरा बँक, युनियन बँकेच्या धनादेशांना वटण्यास अधिक कालावधी लागत आहे.
सेवा शाखामधील कर्मचाऱ्यांनाही बँक हॉलिडेज् अर्थात सार्वजनिक  सुट्टय़ांचा लाभ मिळावा यासाठी संघटनेमार्फत गेल्या वर्षांतही मागणी करण्यात आली होती. मात्र नवे वर्ष सुरू होऊन एक सुटी झाल्यानंतरही सेवा शाखांबाबत त्याची अंमलबजावणी न झाल्याने उचलण्यात आलेले बहिष्काराचे हत्यार २०१४ सालात येणाऱ्या  १२ सार्वजनिक सुट्टय़ांमध्येही उगारले जाणार आहे.
सुट्टय़ांचा अधिकार हवा!
धनादेश व्यवहार पद्धतीवरील (सीटीएस) बहिष्कार हा अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागणीसाठीच असून या कर्मचाऱ्यांनाही सुट्टय़ांचा अधिकार मिळायला हवा. ‘सीटीएस’ पद्धती अमलात येण्यापूर्वीदेखील धनादेशांची वटणावळ दोन दिवसांत होत असे. नवी पद्धती विहित मुदतीत कार्यरत होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. व्यवहार बहिष्काराचे धोरण यापुढील सुट्टय़ांदरम्यानही अनुसरले जाईल.
विश्वास उटगी, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज असोसिएशन